आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी कलावंतांनी जाणून घेतले नृत्याचे बारकावे, दत्ता यांना बीजिंगचे निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महागामी संस्थेच्या नृत्य क्षेत्रातील कार्याची दखल कला क्षेत्रात कायम घेतली जाते. जगभरातील विविध नृत्य संस्था महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांना मार्गदर्शन आणि सादरीकरणासाठी आमंत्रित करतात. सोमवारी चीनच्या बीजिंगमधील सेंटर ऑफ इंटरनॅशनल को-ऑपरेशनच्या संचालिका झांग पिंग व सहकाऱ्यांनी महागामीला भेट देऊन दत्तांना चीनमध्ये कार्यशाळेसाठी आमंत्रित केले.

पिंग यांच्यासह झांग जिंग आणि झ्युई लेई या नृत्य शिक्षकांची उपस्थिती होती. या कलावंतांनी महागामी परिसरात सोमवारी सकाळी दोन तास घालवून गुरुकुल शिक्षण पद्धतीची माहिती घेतली. या वेळी महागामीच्या विद्यार्थिनींसह वेळ घालवत त्यांनी कथ्थक आणि ओडिसी नृत्यातील बारकावे जाणून घेतले. नृत्यातील हस्तमुद्रा, पदन्यास, भावमुद्रा यांच्या प्रात्यक्षिकांसह त्यामागील शास्त्र जिज्ञासूवृत्तीने त्यांनी जाणून घेतले. त्यानंतर दत्ता यांनी बीजिंग येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण द्यावे, तेथील ३ हजार नृत्य कलावंत-शिष्यांशी संवाद साधून भारतीय नृत्याचा गाभा समजावून सांगावा, अशी विनंती करून चीन भेटीचे आमंत्रण दिले.
हा तर आपल्या कलेचा सन्मान
चीनच्या कलावंतांनी महागामीत येऊन इथली इत्थंभूत माहिती घेणे तसेच मला आमंत्रित करणे हा माझा गौरव नसून आपल्या समृद्ध अभिजात कलेचा हा सन्मान आहे, असे मी मानते. - पार्वती दत्ता, संचालिका, महागामी गुरुकुल.