आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Railway News In Marathi, Railway Engineering Division, Divya Marathi

रेल्वे विभागाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पोटूल ते दौलताबाद रेल्वे रुळादरम्यान शंभर मि. मि. पडलेली भेग रेल्वे विभागातील कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे निदर्शनास आल्याने शनिवारी (12 एप्रिल) रात्री मोठा अपघात टळला. रात्री उशिरापर्यंत रेल्वे रूळ दुरूस्त करण्याचे काम रेल्वे इंजिनिअरिंग विभागातर्फे करण्यात आले. या घटनेची चौकशी केली जाईल, असे नांदेडचे विभागीय अतिरिक्त व्यवस्थापक प्रकाश निनावे यांनी सांगितले.


पोटूळ ते अंकाईदरम्यान रेल्वे रुळाखालील स्लीपर बदलण्याचे काम सुरू आहे. स्लीपर्स घेऊन जाणारी वीस रॅकची गाडी परत येत असताना रेल्वेच्या चालकास अखंड रुळास भेग गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस औरंगाबादहून रात्री 9.30 वाजता गेली होती. स्लीपर टाकायला गेलेल्या चालकाच्या सूचनेवरून औरंगाबादचे वाहतूक निरीक्षक एल. के. जाखडे यांनी रेल्वेच्या सेक्शन इंजिनिअरला यासंबंधी माहिती दिली. इंजिनिअर विभागाचे बी. बी. सिंग हे तत्काळ आपल्या सहकार्‍यांना घेऊन पोटूळकडे रवाना झाले. वाहतूक निरीक्षक जाखडे त्यांच्यासमवेत पोटूळकडे गेले.
गाड्यांना घेतले थांबवून : रात्री 10.30 वाजता पुणे-निजामाबाद पॅसेंजर आल्यानंतर रेल्वेच्या चालकाने रुळात दोष असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिल्याने या मार्गावरून जाणार्‍या गाड्यांना काही काळ थांबवून घेण्यात आले. सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेसला औरंगाबाद स्थानकावर थांबवण्यात आले. मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्स्प्रेसला पोटूळ स्थानकावर तर मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेसला लासूर स्टेशन येथे थांबवून घेतले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गाड्या सोडण्यात आल्या. या ठिकाणावरून जाणार्‍या गाड्यांची गती ताशी 2 ते 3 कि. मी. इतकीच ठेवण्यात आली.


का दुभंगतात रूळ ?
मनमाड ते नांदेड दरम्यानच्या रुळांची क्षमता चोवीस तासांत 17 गाड्या धावण्याची आहे. प्रत्यक्षात मात्र प्रवासी रेल्वे व मालगाड्यांची संख्या वाढल्याने 195 टक्के भार रेल्वे रुळांना सहन करावा लागत आहे. आज रेल्वेची संख्या प्रतिदिन 70 इतकी झाली आहे. यामुळे रुळांवर अतिरिक्त भार पडत आहे.


रूळ बदलण्यात यावेत
जुनाट झालेले रेल्वे रूळ बदलण्यात यावेत. प्रवाशांनी रेल्वे विभागास सहकार्य करावे. रेल्वेच्या वतीने रूळ व स्लीपर बदलण्याचे काम सुरू केल्यानंतर गाड्यांना उशीर होतो. संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना


घटनेची चौकशी होणार
पोटूळ ते दौलताबाद दरम्यानचा रेल्वे रूळ दुभंगल्याच्या प्रकाराची चौकशी केली जाणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमके कारण समजेल. रेल्वेचे लोकोपायलट व गार्डच्या सावधानतेमुळे मोठी दुर्घटना टळली. प्रकाश निनावे, अतिरिक्त व्यवस्थापक, नांदेड विभाग