आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाच्या घसरणीने महागली विदेशवारी; अनेकांनी मनसुबे पुढे ढकलले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू झालेली घसरण विदेशवारीचे इरादे असलेल्या औरंगाबादकरांचा खिसा हलका करणारी ठरत आहे. साठ रुपयांपर्यंत पोहोचलेल्या डॉलरमुळे पर्यटनासाठी आणि शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणार्‍यांना आजघडीला किमान 10 ते 12 टक्के अधिक रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे रुपयाची घसरण थांबण्याची वाट पाहत अनेकांनी आपले मनसुबे काही काळासाठी पुढे ढकलले आहेत.

विदेशी चलन बाजारात डॉलर झपाट्याने उसळी घेऊ लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेतही घडामोडी वाढल्या. रुपया घसरल्याचा फटका पर्यटनासाठी विदेशात जाणारे आणि उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना बसत आहे.

यंदा मे महिन्यापासूनच डॉलरची चढती कमान सुरू राहिल्याने पर्यटकांच्या खर्चात वाढ होत गेली. मात्र, गेल्या आठवड्यात डॉलर साठ रुपयांच्या जवळ पोहोचल्याने विदेश पर्यटनाचे पॅकेज थेट 10 ते 12 टक्क्यांनी महागले आहे. या संदर्भात अभिर्शी ट्रॅव्हल्सचे महेश चौधरी म्हणाले, आठवडाभरात ही वाढ झाल्याने या काळात बुकिंग करणार्‍यांचा खर्च निश्चितच वाढला आहे. 90 हजार रुपयांचे पॅकेज एक लाखाच्या आसपास गेले आहे. पर्यटन तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डॉलर महागल्याने आताच बुकिंग करणार्‍यांनी सावध होत, डॉलर आटोक्यात येईपर्यंत पर्यटनाचा प्लॅन आखडता ठेवला आहे. परदेशात जाणार्‍यांना प्रवास अत्यावश्यक असल्याने त्यांना मात्र ही वाढ सहन करावी लागत आहे.

विद्यार्थ्यांचेही गणित बिघडले
ऑगस्ट महिन्यात परदेशी विद्यापीठांत शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना या काळात बुकिंग करावे लागत असल्याने त्यांच्या खर्चात ही वाढ होणार आहे. अमेरिकेतील विद्यापीठांत ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत एक सत्र सुरू होत असल्याने तिकडे जाणार्‍यांची धावपळ सुरू असते. त्यांच्या पालकांना आता दहा ते बारा टक्क्यांचा फटका बसणार आहे.