आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअत्यंत कठीण अशा बौद्धिक आणि शारीरिक चाचण्यांच्या दिव्यातून जात सैन्यात प्रवेश मिळतो. मात्र, मराठी तरुण या परीक्षांना सामोरे जाण्यात काही प्रमाणात कमी पडत होता. ही तफावत दूर करण्यासाठीच 1977 पासून हडको एन-12 परिसरात ही सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एसपीआय) चालवली जात आहे. यूपीएससीद्वारे घेतल्या जाणार्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेची तयारी येथे करून घेतली जाते. येथील कॅडेट्स सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) परीक्षेसाठीही तयार होतात.
अशी झाली सुरुवात
पुण्यातील खडकवासला येथील एनडीएच्या पासिंग आऊट परेडसाठी एकदा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील प्रमुख अतिथी म्हणून गेले होते. अँडमिरल एम. पी. औटी हे एनडीएचे कमांडंट होते. या वेळी 500 उत्तीर्ण कॅडेटमध्ये केवळ 10 मराठी मुले कशी काय? असा सवाल त्यांनी केला. ही संख्या वाढवण्यासाठी त्यांच्या आदेशानुसार लेफ्टनंट जनरल एस. पी. पी. थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एका आढावा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने मराठी तरुणांनी लष्करात अधिकारी पदावर येण्यासाठी लागणारी तयारी करून घेणार्या एका संस्थेची स्थापना करण्याचा निष्कर्ष काढला. त्यातूनच 1977 मध्ये हडकोतील या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची (एसपीआय) स्थापना करण्यात आली.
चारपैकी एकच सुरू
लेफ्टनंट जनरल थोरात यांच्या अहवालात औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर या चार शहरांत ही संस्था सुरू करण्याची शिफारस केली होती. औरंगाबाद हे अन्य शहरांच्या तुलनेत मागासलेले असल्यामुळे येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून हे केंद्र सुरू करण्यात आले, नंतर शासनाचे योजनेकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अन्य तीन संस्था सुरू झाल्याच नाहीत. सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत या संस्थेचे काम चालते.
एसपीआयमध्ये नेमके काय ?
येथे लष्करी शिस्तीतील अत्यंत खडतर अशा प्रशिक्षणाला सामोरे जावे लागते. येथील दिवस सकाळी 5:30 वाजता सुरू होतो. प्रातर्विधी आटोपून 6 ते 6:45 पर्यंत पीटी आणि शारीरिक कसरती चालतात. 8 ते 9:30 पर्यत एनडीएचे तयारी वर्ग होतात. तर 10:30 ते 4:15 पर्यंत ही मुले बाहेर महाविद्यालयात जातात. संध्याकाळी 5 ते 6 पर्यंत पुन्हा मैदानी खेळ खेळल्यांनतर 7 ते 9 वाजेपर्यंत पुन्हा एकदा एनडीएचे तयारी वर्ग चालतात. रात्री 11 वाजता मुले झोपी जातात.
अन्य तयारीबाबत
संस्थेने दिलेल्या माहितीनुसार येथे पुढील बाबींची तयारी करून घेतली जाते..
बारावी परीक्षा : एनडीए प्रवेश परीक्षेसाठी बारावी ही पात्रता आहे. दहावी उत्तीर्ण होऊन आलेली येथील मुले 11 वी आणि 12 वी येथेच एनडीएच्या अभ्यासासोबत पूर्ण करतात. आतापर्यंत शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात त्यांना प्रवेश दिला जात होता. दोन वर्षांपासून स्टेपिंग स्टोन्सच्या ज्युनियर कॉलेजमधून ही मुले बोर्डाची परीक्षा देतात.
यूपीएससीची तयारी : एनडीएच्या प्रवेश परीक्षेची तयारी येथे करून घेतली जाते. सकाळी व संध्याकाळी यूपीएससीचे वर्ग चालतात. तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करतात. येथील दोन वषरांत प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑगस्ट व एप्रिलमध्ये होणार्या यूपीएससीच्या दोन परीक्षा देण्याची संधी मिळते.
इंग्रजी संभाषण कला : फाड-फाड इंग्रजी बोलण्यापेक्षा आवश्यक आणि मोजकेच इंग्रजी संभाषण आपली छाप सोडून जाते. या विद्यार्थ्यांच्या इंग्रजीवर विशेष भर दिला जातो.
एसएसबीची मुलाखत : येथील अभ्यासक्रम अशा प्रकारे तयार केला आहे की, विद्यार्थी आपोआपच एसएसबीच्या मुलाखतीस तयार होतो. यासाठी नियमितपणे वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व , समूह चर्चा, सामान्यज्ञान स्पर्धा आदी उपक्रम घेतले जातात.
शारीरिकची तयारी : रोज हे विद्यार्थी फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, हॉकी, क्रॉस कंट्री, अँथलेटिक्स, ऑब्स्टेकल, बॉक्सिंगचा सराव करतात. अलीकडेच येथे फायर रेंजही उभारण्यात आले आहे.
संस्थेत या आहेत सुविधा
विद्यार्थ्यांच्या सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती संस्थेने दिली.
पोषक आहार : प्रत्येक कॅडेट्सच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येकाला रोज 3200 कॅलरीजचा संतुलित आहार दिला जातो.
निवास सुविधा : सुसज्ज वसतिगृहात मुलांच्या राहण्याची सुविधा आहे.
डॉक्टरांची व्यवस्था : विद्यार्थ्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी होते. त्यासाठी एक कायमस्वरूपी डॉक्टर येथे आहे.
व्यायामशाळा : घाम गळेपर्यंत व्यायाम करण्यासाठी येथे अद्ययावत जीम आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला युनिफॉर्म, बूट आदी पुरवले जातात.
इंटरनेट लॅब : विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट सुविधायुक्त संगणक प्रयोगशाळा आहे.
ग्रंथालय : सुसज्ज ग्रंथसंपदा असणारे ग्रंथालय येथे आहे. लष्कर, विज्ञान, इतिहास यासह नामवंतांची आत्मचरित्रे तसेच देशभरातील वृत्तपत्रे आणि मासिकेही घेतली जातात.
शैक्षणिक सहल : या विद्यार्थ्यांना कुलाबा येथील नेव्ही डॉकयार्ड, पुण्यातील एअरफोर्स स्टेशन, नगरचे आर्टिलरी स्टेशन, देवळाली कँप या ठिकाणी खास भेटीसाठी नेले जाते. वर्षातून एकदा ही मुले कळसूबाईचे शिखर सायकलिंग करत सर करतात हे विशेष.
आपल्याकडे खूप क्षमता
महाराष्ट्रातील मुलांमध्ये खूप क्षमता आहे. मुलांना लष्करात येण्याची खूप इच्छा असते, पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. पालकही पारंपरिक डॉक्टर, इंजिनिअर या क्षेत्रांपलीकडे काहीच बघत नाहीत. हे टाळण्यासाठी आपल्या विचारांच्या कक्षा रुंद करायला हव्यात. या क्षेत्रातील करिअरकडे गांभीर्याने घ्यायला हवे. मातृभाषेसह इंग्रजी आणि हिंदीवर पकड निर्माण करायला हवी. भरपूर वाचन आणि सामान्यज्ञान वाढवण्याची गरज आहे. तरच आमच्याकडे प्रवेश मिळतो आणि विद्यार्थी एनडीएसाठी तयार होऊ शकतो.
- मेजर (निवृत्त) चंद्रसेन कुलथे, संचालक, एसपीआय
15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा
1 जानेवारी 1997 ते 31 डिसेंबर 1998 दरम्यान जन्मलेल्या मुलांना आणि 7 वी, 8 वी आणि 9 वीत किमान 60 टक्के मार्क असलेल्या मुलांना यंदाच्या वर्षासाठी अर्ज करता येतील. याबाबत अधिक माहिती 0240-2381370 या क्रमांकावर संपर्क साधावा. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2013 आहे.
अधिकार्यांची देखरेख
संस्थेच्या गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन निवृत्त एअर चीफ मार्शल डॉ. एस. कुलकर्णी आहेत, तर लेफ्टनंट जनरल बी. टी. पंडित, एस. डी. सोहोनी, व्ही. जी. पाटणकर व कमांडर बी. एस. करपे सदस्य आहेत. निवृत्त मेजर चंद्रसेन कुलथे 3 वर्षांपासून संचालकपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. रवींद्र बुरचंडी अधीक्षक, आर. एस. मानकर गृहरक्षक म्हणून कार्यरत आहेत. विविध तज्ज्ञ व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून ज्ञानदानाचे कार्य करतात.
असा मिळतो प्रवेश
दरवर्षी साधारणपणे साडेतीन ते चार हजार मुले या एसपीआयच्या प्रवेश परीक्षेला बसतात. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या आणि 7 वी, 8 वी आणि 9 वीत 60 टक्के मार्क असणारे विद्यार्थीच या परीक्षेला पात्र ठरतात. दरवर्षी एप्रिल महिन्यात औरंगाबादसह पुणे, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये इंग्रजीतून ही परीक्षा घेतली जाते. यात गणित आणि विज्ञान विषयांवरील प्रश्नांचा समावेश असतो. यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची त्याच केंद्रावर आयक्यू टेस्ट होते, तर दुसर्या दिवशी तोंडी परीक्षा घेतली जाते. यात यशस्वी ठरलेल्यांना महिनाभरात क ॉल पाठवले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.