आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Television And Film Actor Vinay Apte No More

भारदस्त आवाज हरपला;विनय आपटे यांच्या निधनाने हळहळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या आवाजाने कलाकृतींना वेगळी ओळख देणार्‍या विनय आपटे यांचे शनिवारी संध्याकाळी मुंबई येथे निधन झाले. चित्रपट आणि छोट्या पडद्यावर लीलया वावर असणार्‍या या हरहुन्नरी कलाकाराने रंगभूमीवर नि:स्वार्थ प्रेम केले. आपली छाप सोडणार्‍या या कलावंताने कायमची एक्झिट घेऊन आपल्या चाहत्यांना अनपेक्षित धक्का दिला.

पोकळी भरणे अशक्य
नाटक आणि सिनेमा क्षेत्रात आपली हुकुमत गाजवणारा एक अष्टपैलू कलावंत, ज्याने सुरुवातीच्या काळात नाट्यक्षेत्रात अनेक प्रयोग केले. कुसुम मनोहर लेलेंसारख्या नाटकाचे दोन शेवट करून प्रेक्षकांची दाद मिळवली. नाट्य आणि अभिनय क्षेत्रात पडलेली ही पोकळी भरून काढणे अशक्य आहे. दिलीप घारे, ज्येष्ठ रंगकर्मी

उत्तम मार्गदर्शक
प्रकृती बरी नसतानादेखील विद्यार्थ्यांशी संवाद साधता येईल म्हणून ते विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात आले होते. अगदी कळकळीने त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उत्तम कलाकाराबरोबरच ते एक उत्तम माणूस होते. त्यांना भावपूर्ण र्शद्धांजली. शशिकांत बर्‍हाणपूरकर, विभागप्रमुख, नाट्यशास्त्र विभाग, विद्यापीठ

आमचे पालक
छोट्या गावातून मुंबईसारख्या शहरात स्ट्रगल करण्यासाठी जाणार्‍या कलावंतांचे ते पालक होते. मी संवाद लिहिलेल्या ‘4 इडियट्स’ या सिनेमाला त्यांनी व्हाइस ओव्हर दिला होता. ‘येड्याची जत्रा’च्या वेळीदेखील त्यांनी मला खूप सांभाळून घेतले. एकदा व्हॅनिटीत बोलावून त्यांनी मला असे डायलॉग लिहितात का, म्हणून झापले होते. मी रडकुंडीला आलो. मग त्यांनी बोलावून कशी गंमत केली ते सांगितले. आपण लिहिलेल्या लिखाणावर विश्वास हवा, ही शिकवण त्यांनी दिली. प्रकाश भागवत, चित्रपट संवादलेखक

मनमोकळा कलावंत
सामान्य प्रेक्षकांशीदेखील दिलखुलास गप्पा मारणारा हा कलावंत अनेक वेळा नाटकासाठी शहरात आला असताना त्यांच्याशी भेट झाली; पण आपण खूप मोठे कलावंत आहोत याचा त्यांनी आव आणला नाही. कलावंताबरोबरच एक चांगला माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. राजू परदेशी, नाट्य व्यावसायिक

कलाकार कार्यकर्ता
कलाकारांसाठी कायम झटणारा कार्यकर्ता म्हणजे आपटे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण करणारे अष्टपैलू कलावंत. आयुष्यभर तत्त्वावर जगणारा हा कलावंत नवोदित कलावंतांसाठी आदर्श आहे. त्यांचे जाणे धक्कादायक आहे. जयंत शेवतेकर, सदस्य, सेन्सॉर बोर्ड