आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळग्रस्त भागासाठीची अन्नधान्य सुरक्षा योजना बंद करण्याचे संकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यातील १४  जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या अन्न सुरक्षा योजनेसंदर्भात पुनरावलोकन करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने त्याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगत  एक प्रकारे ही योजना बंद करण्याचे संकेत  अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत. दरम्यान, ई-पॉस मशीनमुळे राज्यात ३ हजार कोटींची बचत झाल्याचे या वेळी बापट यांनी सांगितले.   ऑगस्ट २०१५ पासून  दुष्काळामुळे हतबल झालेल्या राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शासनाने अन्न सुरक्षा दिली होती.  दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळालेला आहे.    

 

योजनेबाबत आढावा घेऊन निर्णय
याबाबत बापट यांनी सांगितले की,  या योजनेचा आढावा  टप्प्याटप्प्याने घेत धान्य बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.  राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील परिस्थिती पाहता, मराठवाड्यातील आठ व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा दिली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना स्वस्त दरात धान्य देण्यात येत आहे. मात्र आता दुष्काळी परिस्थिती नाही. अनेक ठिकाणी आता शेतकरी हे धान्य घेत नसल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे ही योजना सुरू ठेवावी की नाही, याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी १४ जिल्ह्यांचा आढावा घेण्यात येईल. किती धान्य उचल होते, याचा विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.    


ई-पॉसच्या माध्यमातून तीन हजार कोटींची बचत
राज्यात ५२ हजार ८०० रेशन दुकानांपैकी ५१७०० दुकानांवर ई-पॉस मशीन आहेत. त्यामुळे तीन हजार कोटींच्या धान्याची बचत झाली आहे. ईपीओएस प्रणालीला आधार लिंक केलेले असल्याने धान्याचा काळाबाजार बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागात नवीन लाभार्थींची नावे  समाविष्ट करून त्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  


३६ लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेचा लाभ   
मराठवाड्यात ३६ लाख शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत धान्य मिळत आहे. या शेतकऱ्यांना दरमहा ८९१५ मेट्रिक टन गहू आणि ६०४० मेट्रिक टन तांदूळ असे एकूण १४५९६ मेट्रिक टन धान्य वाटप केले जाते. मराठवाड्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी ८३ टक्के शेतकरी हे धान्य घेतात.  

बातम्या आणखी आहेत...