आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्रीकर, प्रभू यांच्या उपस्थितीत आज औद्योगिक प्रदर्शनाचे होणार उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदर्शनात स्टॉल्स उभारणीचे काम गुरुवारी दुपारी सुरू होते. - Divya Marathi
प्रदर्शनात स्टॉल्स उभारणीचे काम गुरुवारी दुपारी सुरू होते.
औरंगाबाद - केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत ३ जुलैला ‘डेस्टिनेशन मराठवाडा फॉर मेक इन इंडिया’ या औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन होत आहे. याच वेळी वाळूज येथील मराठवाडा ऑटो क्लस्टरमधील सेंटर ऑफ एक्सलन्सचा लोकार्पण सोहळा सकाळी ११ वाजता होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार राजकुमार धूत यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी अडीच वाजता रेल्वे, संरक्षण तसेच एल अँड टी, सीमेन्सच्या वतीने त्यांच्या स्थानिक उद्योजकांकडून असलेल्या अपेक्षांबाबत सादरीकरण करणार आहेत.

या ठिकाणी भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात शंभरपेक्षा अधिक स्टॉल्समधून उद्योगांनी त्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगणारी यंत्रसामग्री ठेवली आहे. केवळ उद्योजकच नव्हे, तर या क्षेत्रात काम करणारे तंत्रज्ञ, मार्केटिंग क्षेत्रातील मंडळी, लहान उद्योजक, अभियांत्रिकी व एमबीएचे विद्यार्थी अशा अनेकांसाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. सहसा कुणाला पाहण्यास न मिळणारी अवजड यंत्रसामग्री, अत्याधुनिक तंत्रज्ञान येथे पाहण्यास मिळणार आहे. त्यात प्रामुख्याने व्हेरॉक, ग्राइंड मास्टर, एमआयटी ग्रुप, संजीव ऑटो ग्रुप, अँड्रेस हाऊजर, रुचा ग्रुप, मैन डिझेल, इंडो जर्मन टूलरूम, यशश्री ग्रुपचा समावेश आहे.

रेल्वे, संरक्षण क्षेत्रातील संधींविषयी आज सादरीकरण
संरक्षण, रेल्वे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या उद्योगांना लागणारी यंत्रसामग्री याबाबत ३ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता महत्त्वपूर्ण सादरीकरण एल अँड टी, सीमेन्सचे वरिष्ठ अधिकारी करणार आहेत. शनिवारी अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता नानासाहेब भोगले सभागृह, वाळूज येथे होणाऱ्या समारोप सत्रात भेलतर्फेही सादरीकरण होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...