आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Industrialists People Strike Issue At Aurangabad

वाळूजमधील रस्त्यासाठी उद्योजकांचे रस्त्यावर उपोषण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाळूज एमआयडीसीतील खराब रस्त्यांमुळे येथील उद्योगांवर परिणाम होत आहे. रस्ते दुरुस्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याच्या विरोधात मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या वतीने शुक्रवारी रेल्वेस्टेशन एमआयडीसी कार्यालयासमोर निदर्शनांसह लाक्षणिक उपोषण केले. या औद्योगिक नगरीत 2 हजार लघु, 500 मध्यम आणि काही मोठे उद्योग आहेत.

वर्षभरात पाच हजार कोटी रुपयांचा कर भरूनदेखील 15 कोटींचा रस्ता तयार केला जात नसल्यामुळे उद्योगमंत्र्यांच्या विरोधात उपोषण करण्यात आले. या वेळी ‘उद्योगमंत्री खाय खाय’ अशी नारेबाजी करण्यात आली. वाळूजमधील ओअँसिस चौक, सिएट टायर आणि व्हेरॉक कंपनीच्या समोरील 12 किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी मसिआकडून पाठपुरावा केला जात आहे.

यांचा सहभाग
या आंदोलनात मसिआचे अध्यक्ष सुनील भोसले, संतोष चौधरी, अर्जुन गायके, मिलिंद कंक, राघवेंद्र जोशी, सचिन मुळे, मुनीश शर्मा, र्शीराम शिंदे, अमित पाटील, राहुल मोगले, किरण जगताप, नितीन देशपांडे, रणजितसिंह गुलाटी, भारत मोतिंगे यांच्यासह शेकडो उद्योजक सहभागी झाले होते.

एक कोटी रुपये जमवू
आंदोलनादरम्यान कार्यालयातील उपअभियंते आमदार चव्हाण यांना भेटण्यासाठी आले. तत्काळ काम सुरू करण्यासाठी किमान एक कोटी रुपये लागतील, असे अभियंत्यांनी चव्हाणांना सांगितले. शासनाकडे पैसे नसतील तर अडीच हजार उद्योजकांकडून दहा मिनिटांत एक कोटी रुपये जमा करू, असा निर्धार मिलिंद कंक यांनी व्यक्त केला.

या आहेत समस्या..
औद्योगिक वसाहतीसाठी ओअँसिस चौक ते सिएट टायर हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. या भागात ऑटोमोबाइल कंपन्या आहेत. सुट्या भागांची मुख्य कंपन्यांपर्यंत वाहतूक करताना रस्त्यांमुळे सुटे भाग खराब होत असल्यामुळे ते भाग विदेशात पाठवता येत नाहीत.