आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी स्तरावर स्वस्ताई, किरकोळ बाजारात महागाई; मोदींच्या राज्यात दलालांचे फावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मार्चमध्ये ठोक महागाईचा दर उणे पातळीत, तर किरकोळ महागाई तीन महिन्यांच्या नीचांकावर अशा बातम्या या आठवड्यात झळकल्या. सरकारदरबारी कागदावर ठोक महागाई शून्याखाली आहे, तर किरकोळ महागाई झपाट्याने घसरत असल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र वेगळेचे चित्र आहे. सर्वसामान्य ग्राहकाला लागणाऱ्या दैनंदिन व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जास्त दाम मोजावे लागत आहेत. वर्षानुवर्षे मध्यस्थांकडे जाणारा लाभाचा मोठा वाटा नरेंद्र मोदी सरकारच्या काळातही कायम आहे.

यासंदर्भात बप्पा चालक या किराणा साहित्य विक्रेत्याने सांगितले, वार्षिक तुलनेत मोजक्या जिनसा वगळल्या तर डाळ, तेल, ज्वारी, बाजरी, गहू आदींसह इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी महिन्याचा किराणा भरताना सध्या वर्षभरापूर्वीपेक्षा जास्त पैसे ग्राहकांना द्यावे लागत आहेत. सरकारदरबारी किरकोळ महागाई मार्चमध्ये ५.१७ टक्के आहे. हा तीन महिन्यांचा नीचांक असल्याचे केंद्रीय सांख्यिकी विभागाचे मत आहे.
विशेष म्हणजे मार्चमध्ये ठोक महागाईचा दर शून्याखाली उणे २.३३ टक्क्यांवर गेल्याची सरकारकडे नोंद आहे. सलग पाचव्या महिन्यात हा दर शून्याखाली आहे. प्रत्यक्षात मात्र अन्नधान्य महागले आहे. भाजीपाला व फळांच्या किमती कडाडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या वस्तू खरेदीसाठी जास्त दाम मोजावा लागत आहे.
मध्यस्थांच्या वाट्याला सर्वाधिक लाभ
घाऊक बाजार ते ग्राहक यात धान्यांच्या किमतीत भरमसाट वाढ झालेली दिसते. उत्पादक ते ग्राहक यामधील मध्यस्थांना मोठा वाटा मिळतो, अशी माहिती जाणकारांनी दिली. त्यामुळे वाढत्या किमतीतील नफ्यात सर्वाधिक वाटा मध्यस्थांच्या खिशात जातो. औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजारात गहू वर्षभरात क्विंटलमागे १४०० ते २१०० रुपयांत (१४ ते २१ रुपये किलो) राहिला. मात्र, किरकोळ बाजारात किमान २६ रुपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. त्याचप्रमाणे ज्वारी वर्षभरात सरासरी क्विंटलमागे १५५० ते २४०० रुपयांच्या कक्षेत राहिली. मात्र, त्याच वेळी किरकोळ बाजारात ज्वारी २८ रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. उत्पादक ते ग्राहक या सर्व प्रवासात मध्यस्थ, आडते, कमिशन एजंट, हाताळणी, वाहतूक, हमाली, तोलाई, कटाई, चाळणी, साफसफाई इतके टप्पे असतात, अशी माहिती औरंगाबाद उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब अधाने यांनी दिली.

आकर्षक पॅकिंगच्या गव्हाला मागणी :
औरंगाबादेत शेतकऱ्याकडील गहू, ज्वारी, मका यांची आवक वर्षभर बऱ्या प्रमाणात असते. मात्र, आकर्षक पॅकिंगमधील गव्हाला जास्त मागणी असल्याचे निरीक्षण बाजार समितीचे सचिव नानासाहेब अधाने यांनी नोंदवले. ते म्हणाले, शेतकऱ्यांकडील गहू शेतातून थेट बाजारात आणला जातो. त्यात काडी-कचरा, मातीचे खडे वगैरे असतात. या गव्हाला मागणी कमी असते. मात्र, आकर्षक पॅकिंगमध्ये येणारा गहू स्वच्छ असतो आणि त्याची किंमतही जास्त असते.
डाळी, धान्य कडाडले :
वर्षभरात सर्व डाळी, गहू, ज्वारी, बाजरी आदी धान्याच्या किमती कडाडल्या आहेत. मार्च २०१४ मध्ये मूग डाळ ९० रुपये किलो होती, ती सध्या ११५ रुपयांवर पोहोचली आहे. ज्वारी वर्षभरापूर्वी २० रुपये किलो होती, आता २८ रुपये किलो झाली आहे. हरभरा डाळ ४६ रुपये किलोवरून ५५ रुपये, तर तूर डाळ ७० रुपये किलोवरून ९४ रुपयांवर पोहोचली आहे.

साखर, गूळ, तांदळाचा दिलासा :
वर्षभरात साखर, गूळ, तांदळाच्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. वर्षापूर्वी साखर ३२ ते ३३ रुपये किलोवरून आता २७ ते २८ रुपयांवर आली आहे. गुळाचा गोडवाही वर्षभरात वाढला आहे. गूळ ४० रुपयांवरून ३२ रुपयांवर, तर तांदूळ किलोमागे २ ते ४ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

सर्व मदार पावसावर :
आगामी काळात महागाईचे सर्व गणित पावसावर अवलंबून आहे. खरीप हा शेतीचा मुख्य हंगाम पावसावर विसंबून असतो. पाऊस चांगला झाला तर अन्नधान्याची महागाई काही प्रमाणात आटोक्यात राहील, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. बी. पवार यांनी व्यक्त केले.

गहू, डाळीचे उत्पादन घटले :
अवकाळी पाऊस, गारपिटीने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर परिणाम झाला आहे. त्यांचे उत्पादन घटणार असून त्यामुळे डाळी महागण्याची शक्यता आहे. : डॉ. एस. बी. पवार, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद.
पुढील स्लाइडवर पाहा, बाजारातील दरांचे सध्याचे चित्र...
बातम्या आणखी आहेत...