आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईमुळे सर्वसामान्यांची डाळ शिजणे कठीण!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बाजारात डाळी आणि इतर कडधान्यांची आवक घटल्यामुळे उन्हाबरोबरच महागाईचा चटका बसण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात किराणा महाग झाला असून शेंगदाणे, गहू, तांदूळ आणि सर्वच डाळींच्या दरात वाढ झाली आहे.
फेब्रुवारीच्या तुलनेत डाळीला व इतर किराणा मालात भाववाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना "अच्छे दिन'ची प्रतीक्षा लागून आहे. गेल्या महिन्यात शेंगदाणे ७५ रुपये प्रतिकिलो असा दर असताना आज चालू महिन्यात ८० ते ८१ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केले जात आहेत. तांदळाचेही भाव वधारले असून साधा तांदूळ २० वरून २५ रुपये किलो असा झाला आहे. किराणा मालातील बहुतेक वस्तू महागल्या असताना दिलासा देणारी बाब म्हणजे साखर चार रुपयांनी स्वस्त झाली आहे. ३० रुपये किलोने विकली जाणारी साखर आता २६ रुपयांपर्यंत खाली आली आहे.

अवकाळीचा गव्हाला फटका
अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा गव्हाच्या पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे गव्हाचे भाव वाढले आहेत. डाळी आणि कडधान्यांची आवक घटल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे. तूरडाळ होलसेलमध्ये फेब्रुवारी महिन्यात ८० रुपये प्रतिकिलो विक्री होत असताना तिची किरकोळ विक्री ९० ते ९५ रुपयांनी केली जात आहे. मसूर डाळ ७५ वरून ८०, उडीद डाळ ८० वरून ९० , चणा डाळ ४५ वरून ५०, शेंगदाणा तेल १०० रुपये प्रतिलिटरवरून १०८ रुपये अशी दरवाढ झाली आहे.

पाऊस पडेपर्यंत महाग
सद्य:स्थितीत डाळींचे भाव मागील दोन महिन्यांच्या तुलनेत वाढलेले आहेत. बाजारात डाळींची आवक घटली असल्यामुळे दुकानदारांनाही भाव वाढवावे लागत आहेत. तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ यांचे दर पावसाळ्यापर्यंत जास्तच राहण्याची शक्यता आहे.

हंगामापर्यंत महागाई
डाळींचे भाव मागील दोन महिन्यांच्या तुलनेत वाढले आहेत. आवक घटल्यामुळे दुकानदारांनाही भाव वाढवावे लागले. तूर डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळीचे भाव येत्या हंगामापर्यंत उच्चांकी राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सामान्य नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.

आवक घटली
बाजारात आवक घटल्यामुळे डाळींचे भाव वाढलेले आहेत. माल येत नसून कडधान्येही महाग होत चालली आहेत. येत्या पावसाळ्यापर्यंत भाव कमी होणार नाहीत.
वर्धमान ललवाणी, व्यापारी

महागत जाणार
दररोज लागणाऱ्या मालाचे भाव वाढलेले आहेत. तेल, कडधान्ये महाग होत जाणार आहेत.
पारस ललवाणी, व्यापारी