लासूर स्टेशन- येथे सोमवारी सर्वपक्षीय सर्वधर्मीय आणि संघटनेच्या वतीने लासूरगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मूकमोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. त्यानंतर निवेदन देण्यात आले.
लासूरगाव येथे चार दिवसांपूर्वी ३ वर्षीय मुलीवर ढेकूथडी शेतवस्तीवर राहणाऱ्या शाहरुख जाफर शेख या नराधमाने बलात्कार करून शारीरिक, मानसिक छळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी लासूर स्टेशन येथील सर्वपक्षीय, नागरिकांनी निषेध व्यक्त करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सोमवारी सकाळी १० वाजता आनंद दिघे चौक, डोणगाव रोड ते नागपूर-मुंबई महामार्गावरील सावंगी चौकात शांततेत मूकमोर्चा ते प्रतीकात्मक रस्त्यावर येऊन निषेध नोंदवण्यात आला आणि आंदोलकांनी निवेदन दिले.
याबाबत सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पोलिस, महसूल यांना निवेदन देऊन आरोपीला पोस्का या कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा व्हावी, या घटनेची बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्याअंतर्गत चौकशी व्हावी, १५ दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करावी, खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा व पीडितेला न्याय मिळावा, अशा मागणीचे निवेदन पोलिस व महसूल अधिकाऱ्यांना आंदोलकांनी दिले. या निषेध मोर्चात सर्वपक्षीय तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, वैजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, नायब तहसीलदार बेलसरे, मंडळ अधिकारी रिता पुरी, शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलिस उपनिरीक्षक संदीप काळे, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.