आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन किलोमीटर अंतरासाठी पथकाला लागला अडीच तासांचा कालावधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- अवैध वाळू चोरीला सिल्लोड तहसील कार्यालयाचा पाठिंबा असून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदारांना दिल्यानंतर दोन किलोमीटरवर असलेल्या ठिकाणी वाळूचोरीविरोधी पथक अडीच तासांनी पोहोचले. अवैध वाळू चोरी व वाहतूक थांबवण्यासाठी  तहसीलदार संतोष गोरडसह पथक फारसे गंभीर नसल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून येते.  वेळकाढूपणाचे धोरण अवलंबून वाळूमाफियांना पाठीशी घालण्यात येत आहे. वरिष्ठ पातळीवरून विचारणा झाल्यास पथक स्थापन केल्याचे साचेबंद उत्तर देऊन तहसीलदार मोकळे होतात. कारवाईची वेळ आल्यास मंडळ अधिकारी व तलाठ्यावर कारवाई करून  नामानिराळे राहता येते.  

आंखों देखी....  
शहरातील सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ घरमोडे यांनी सोमवार, ८ रोजी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास तहसीलदार गोरड यांना फोन करून माहिती दिली की, शहरालगत असलेल्या खोडकाई येथील नदीपात्रातून वाळू उपसा सुरू आहे. त्यानंतर तहसीलदार गोरड यांनी नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना वाळू चोरीविरोधी पथक नदीपट्ट्यात पाठवा, असे आदेश दिले. तहसीलदार गोरड यांनी नियुक्त केलेले जुने पथक रद्द करून नवीन पथक  १ मेनंतर स्थापन केल्याची माहिती मिळण्यास पंधरा मिनिटे लागली. कर्मचारी अमित बावस्कर यांनी दिलेल्या यादीवर  कशा पद्धतीने काम करायचे याची  माहिती नसल्याने पुन्हा पंधरा मिनिटे चर्चा रंगली. त्यानंतर बावस्कर यांनी संबंधित मंडळातील मंडळ अधिकारी व तलाठी यांनी त्यांच्या मंडळात काम करायचे, अशी तहसीलदारांनी माहिती दिल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधितांची शोधाशोध सुरू होऊन शेवटी दोन वाजता मंडळ अधिकारी एम. जी. काझी व तलाठी अभिलाषा म्हस्के, नारायण कटारे कसेतरी दुचाकीवर वाळूपट्ट्यात पोहोचले. तेव्हा नदीपट्ट्यात सामसूम झाली होती. तहसील कार्यालयाची प्रक्रिया सुरू असताना माफियांनी त्यांचे  ट्रॅक्टर नदीपट्ट्यातून वर आणून एका संबंधिताच्या शेतात उभे केले. ट्रॅक्टरमालक व त्यांचे खबरे वाळू वाहतुकीच्या रस्त्यावर म्हसोबा महाराजांच्या मागच्या बाजूला असलेल्या एका घरात बसले. 

पथक निघून गेल्याचा व कोण आले होते याची माहिती त्यांच्यातील एका म्होरक्याला दिली गेली. तहसील, पोलिस व वाळूमाफियांच्या समन्वयक असलेल्या या म्होरक्याने सर्वांशी संपर्क करून पुन्हा वाळू उपसा करण्याचे आदेश दिल्याने वाळू चोरी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास  पुन्हा  सुरू झाली. वाळू उपसा सुरू झाल्याची माहिती पुन्हा मंडळ अधिकारी एम. जी. काझी यांना देण्यात आली. परंतु ‘तेथे जातो’ असे सांगून ते गेले  नाहीत.  

ट्रॅक्टर व वाहनांच्या आवाजाने झोप होत नसल्याची व्यथा 
वाळू वाहतुकीच्या रस्त्यावर शहरालगत असलेली खोडकाईवाडी आहे. रात्रंदिवस वाळू वाहतूक सुरू असल्याने ट्रॅक्टरच्या अावाजाने झोप होत नसल्याचे तेथील शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासमोर सांगून हे थांबविण्याची विनंती केली.  

होणारा बेसुमार वाळू उपसा थाबवण्याचे निवेदन 
दुष्काळाची छाया पडू नये यासाठी बेसुमार वाळू उपसा थांबला पाहिजे यासाठी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ घरमोडे व विष्णू काटकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना माहिती देऊन कारवाईची मागणी केल्याचे घरमोडे यांनी सांगितले.  

कारवाई सुरू राहील
आम्ही २४ तास वाळू उपसाविरोधी पथक पट्ट्यात उभे करून ठेवू शकत नाही. माहिती मिळाल्यास पथक पाठवण्यात येते. आमच्या स्तरावर योग्यरीत्या कारवाई सुरू राहील. 
- संतोष गोरड, तहसीलदार
बातम्या आणखी आहेत...