आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Information About Someshwar Temple Of Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निसर्गाच्या कुशीत लपलेले सोमेश्वर मंदिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लांब डोंगररांगा, नागमोडी वळणाचा घाट आणि हिरव्यागार शेतांच्या कुशीत वसलेले मंदिर. हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम, कलात्मक सभामंडप. काळ्या पाषाणातील हे सोमेश्वर मंदिर म्हणजे घारदोन या गावाचे भूषण..औरंगाबादपासून अवघ्या 20 किमी अंतरावरील ही वास्तू, पण फार थोड्या लोकांना त्याची माहिती आहे. गावकर्‍यांनी जीर्णोद्धार केला त्यामुळे सोमेश्वराचे वैभव पुन्हा उदयाला आले.


मनाच्या उदात्ततेचे प्रतीक म्हणजे मंदिर होय. त्यात महादेवाचे मंदिर म्हटले की, बारव, दगडी खांब आणि खोलवर असलेला गाभारा. या गाभार्‍यात घटकाभर बसले की मनाचा सारा शीण कुठल्याकुठे निघून जातो. तसाच अनुभव आणि मांगल्याचा शिडकावा करणारे हे घारदोन गावातील मंदिर.. मंदिरापर्यंत पोहोचायचे म्हणजे निसर्गाचे सौंदर्य आणि प्रशासनाची उदासीनता असा संमिश्र अनुभव शहरापासून 17 किमीच्या प्रवासात येतो.

देवळाई परिसराच्या डोंगरांगांतून, पाण्याचे छोटे झरे ओलांडत आपण साई मंदिराजवळ पोहोचतो. तेथून एक किमी अंतराच्या नागमोडी वळणाच्या घाटाला सांभाळून जाण्याचे आश्वासन देत पुढे जावे लागते. रस्ते विकास महामंडळाने सिंदोन -भिंदोन गावापर्यंत सुंदर डांबरी रस्ते केले आहेत. पुढे डावीकडे मग अत्यंत खडतर प्रवास सोमेश्वराची भेट सोपी नसल्याची साक्ष देतो. अर्धवट डांबरीकरण असलेली तीन किमीची बिकट वाट एका चौफुलीवर सोडते. तेथून तीन शेतांतून जाणारी पाऊलवाट, दुरूनच काळ्या पाषाणातील पांढराशुभ्र कळस असलेले विलोभनीय सोमेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घडवते. मंदिराजवळ पोहोचल्यानंतरही शिव भेट, सुंदर वास्तू आणि त्याची पडझड असा संमिर्श अनुभव येतो.

भव्य सभामंडप
मंदिराकडे जाण्याआधी दगडी कमान स्वागत करते. मध्यभागी भव्य सभामंडप आहे तो खूप उंच असून वर घुमट आहे. त्यावरचे नक्षीकाम टॉर्चच्या उजेडातच दिसते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिंरात आल्यासारखाच भास होतो. गाभारा खोलात असून वेरूळप्रमाणेच भव्य शिवलिंग आहे. समोरच्या गाभार्‍यात नंदादीप शांतपणे तेवत असतो. गाभार्‍यात एक कप्पा आहे. तेथे पूर्वी बारवाचे पाणी यायचे. तेच पाणी महादेवाच्या पिंडीवर पडत असे, असे गावकरी सांगतात.

वास्तूची भयंकर पडझड
हे मंदिर कोणी व कधी बांधले याची माहिती गावकर्‍यांनाही नाही. मंदिराचा परिसर साडेचार एकरांचा आहे; पण चहुबाजूंनी शेती जवळ आली आहे. मंदिराचा परिसर पूर्वी औंढा नागनाथसारखा होता. चारही बाजूंनी दगडी भिंतींचा अभेद्य कोट व वीस ते पंचवीस फूट खोल पायर्‍या होत्या. त्या उतरून खाली जावे लागे. तेथून पुन्हा मंदिरात वर येऊन मुख्य प्रवेशद्वाराची रचना होती; पण भिंती आता नामशेष झाल्या. मंदिराचे खंदक पूर्ण बुजवल्याने मंदिर जमिनीवर आले आहे. आता फक्त पडके प्रवेशद्वार शिल्लक आहे.