आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिकल स्फोट : कामगाराच्या हाताचा पंजा छिन्नविछिन्न, आवाजाने महिलेला भोवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोट झालेल्या ठिकाणची पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केली. - Divya Marathi
स्फोट झालेल्या ठिकाणची पोलिस अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
वाळूज - वाळूज औद्योगिक परिसरात रांजणगाव दत्तनगर फाटा ते घाणेगाव रोडवरील एका कॉम्प्लेक्ससमोर केमिकलचा स्फोट झाला. यात कामगार गंभीर जखमी झाला असून त्याचा हाताचा पंजा छिन्नविछिन्न झाला आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता दुकानातील कचरा आगीत टाकताना ही भीषण घटना घडली. इम्रान इसाक पठाण (२२, रा. कमळापूर, ता. गंगापूर) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी दुकानमालक राम पंढरीनाथ गवळे, भागवत विठ्ठल गवळे यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

के सेक्टरमध्ये रांजणगाव शेणपुंजी येथील विष्णू सवई यांच्या मालकीच्या कॉम्प्लेक्समध्ये दहा वर्षांपासून भागवत विठ्ठल गवळे यांच्या मालकीचे ‘आर. बी. एंटरप्रायजेस रिवाइंडिंग अँड रिपेअरिंगचे दुकान आहे. सोमवारी सकाळी दुकानाबाहेरील मोकळ्या जागेत कचरा टाकून त्याला जाळले जात होते. इम्रानने त्याच्याजवळील कचरा आगीत टाकताच मोठा स्फोट झाला. यात इम्रानच्या उजव्या हाताचा पंजा पूर्णत: छिन्नविच्छिन्न झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, त्याच्या हाताचे मांस ४० ते ५० फूट उंच उडाले. मोठ्या आवाजामुळे राम बळी गवळेसह दुकानात काम करणारे इतर दोन ते तीन कामगार त्याच्या मदतीला धावले. राम गवळे यांनी इम्रानला तत्काळ पंढरपूरच्या नेहा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिस प्रशासनासह विविध पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर स्फोटाचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी सांगितले.

वर्षभरातील दुसरी घटना
कंपन्या उघड्यावर केमिकल टाकत असल्याने वारंवार स्फोटाच्या घटना घडत आहेत. गेल्या वर्षी चिकलठाण्यात उघड्यावर केमिकल टाकल्यामुळे मोठा स्फोट होऊन कचरा वेचणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता. कंपन्यांनी केमिकलची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवण्याची गरज त्यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.

पोलिसांचा फौजफाटा
घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेशकुमार तेथे आले. त्यांच्यापाठोपाठ १० ते १२ वाहनांतून तब्बल २०० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच क्यूआरटीच्या जवानांनी धाव घेतली. गंगापूरच्या नायब तहसीलदारांनीही येथे भेट दिली. फॉरेन्सिक लॅब, श्वान आर्यासह श्वानपथक, बॉम्ब नाशक शोधक पथक, एटीएसचे पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, कशी घडली स्‍फोटाची घटना..