आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inquiry Committee Formed For Broke Down Bridge Of Godawari

गोदावरीवरील खचलेल्या पुलाच्या चौकशीसाठी समिती, वाळूमाफियांवरच प्रथमदर्शनी संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोदावरी नदीपात्रावरील खचलेल्या त्या पुलाची चौकशी करण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी विशेष चौकशी समिती नेमली असून महावितरणसह सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि बेकायदा वाळू उपसा होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणा-या पोलिस यंत्रणेचीदेखील चौकशी होणार आहे. त्यासाठी चार वेगवेगळ्या चौकशी समित्या नेमण्यात आल्या असून लवकरच जिल्हाधिका-यांना त्यांचा अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान, महावितरणने पुलाच्या खचण्याबाबतचा आरोप वैयक्तिकपणे घेऊ नये, अशी पुष्टीही जिल्हाधिका-यांनी जोडली.
पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवरील बेसुमार वाळू उपशाने खचलेल्या पुलाचे छायाचित्र वर्तमानपत्रात झळकले आणि एकच खळबळ उडाली. याची तत्काळ दखल घेत जिल्हाधिका-यांनी महावितरण, सार्वजनिक बांधकाम, महसूल विभाग यांना जबाबदार धरून या घटनेमागे या विभागांचा संबंध आहे की नाही याचा अहवाल मागवला. प्रथमदर्शनी नदीिकनारी असलेल्या शेतक-यांनी पाणी उपशासाठी बेकायदा वीज कनेक्शन घेऊन पात्रातील पाणी उपसा केला. यामुळे वाळू उघडी पडली. वाळू तस्करांनी याचाच फायदा घेत रात्रीच्या वेळी नदीपात्रातील बेसुमार वाळू उपसली. रात्रीच्या वेळी वाळू उपशाचे काम करताना लागणारी वीज वाळू तस्करांनी चोरून वापरल्याने अप्रत्यक्षरीत्या या घटनेला महावितरणच जबाबदार असल्याचे जिल्हाधिका-यांनी म्हटले होते. त्यावर महावितरणने या घटनेशी आमचा संबंध नसल्याचे एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळवले आहे. पूल खचल्याबाबत "दिव्य मराठी'ने यंत्रणेचे पितळ उघड करणारे वृत्त १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित केल्यानंतर प्रत्येक विभाग जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर बीडचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले की, पुलाचे बांधकाम सदाेष तर नाही ना, म्हणून कार्यकारी अभियंता चौकशी अहवाल सादर करणार आहेत.

पुलाच्या खांबांजवळ २० फूट खड्डे
गोदावरी नदीवरील कुरणपिंप्री ते आपेगाव दरम्यानचा पूल का कोसळला, याची चौकशी करण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडून करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत पुलाच्या खांबांजवळ करण्यात आलेले २० फुटांपर्यंतचे खड्डे त्यास कारणीभूत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाळूमाफियांनी हे खड्डे करून वाळूचा उपसा केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत आहे.

२०१२ नंतर या परिसरातील वाळूपट्ट्याचा लिलावच झाला नाही, तरीही येथून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करण्यात आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. येथील वाळूपट्टा हा औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांचा संयुक्त वाळूपट्टा आहे. २०१२ ला येथे शेवटचा वाळूपट्टा झाला होता. त्यानंतर दोन वर्षे येथील पट्ट्याचा लिलावच झाला नाही, तरीही वाळूचा उपसा सुरूच होता. अवैधपणे वाळू उपसा करणा-यांविरुद्ध बीड प्रशासनाने गुन्हेही नोंदवले होते. त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे औरंगाबादचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले.

१२० पैकी ४३ खांब खचले
या पुलाला १२० खांब आहेत. त्यातील ४३ खांब खचले असल्याचे समोर आले असून या पुलाची दुरुस्ती शक्य आहे, काय याची चाचपणी करण्यात येत आहे. तातडीने दुरुस्ती करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे विक्रमकुमार यांनी म्हटले असले तरी शक्य असेल तरच दुरुस्ती होईल, अन्यथा नवा पूल बांधावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चौकशी करण्यात आली असली तरी त्रयस्थ समिती म्हणून जिल्हाधिका-यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड केली आहे. या महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाचे तज्ज्ञ दोन दिवस पुलाची पाहणी करून जिल्हाधिका-यांना अहवाल देणार आहेत.
असा आहे संशय
खड्डे खोदताच पूल कोसळत नाही. याचा अर्थ हे खड्डे काही वर्षांपूर्वीच खोदण्यात आले आहेत. जायकवाडीतून पात्रात पाणी सोडल्यानंतर ते या परिसरातून वाहत जाते. त्यामुळे खड्डे बुजतात. बुजलेले खड्डे पुन्हा खोदण्याचे काम वाळूमाफियांकडून झाले असण्याची शक्यता आहे. एकाच वेळी जास्त खांबांजवळ खड्डे खोदण्यात आल्याने ते खचले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. कशामुळे पूल खचला हे आधी शोधले जाईल आणि त्यानंतरच दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही विक्रमकुमार यांनी म्हटले आहे. वाळूसाठी खड्डे खोदताना खांबांचा पायाच निसटल्याची शक्यता आहे.