आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ ठरावाची चौकशी : फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मला समांतरचे सारे माहीत आहे. लोकांसाठी चांगले असेल ते करा, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने ऐनवेळी घुसडून मंजूर केलेल्या एचडीपीई पाइपच्या ठरावाची चाैकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. १५३ कोटी रुपये वाचतात, असे सांगत मंजूर करण्यात आलेला हा ठराव संशयास्पद असल्याने त्यावरून शिवसेनेला घेरण्याची सोन्यासारखी संधी साधण्याच्या भाजपच्या हालचालींचा एक टप्पा यशस्वी झाला आहे. सेनेचा ठराव विखंडित करावा, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
१५३ कोटी रुपये वाचवण्यासाठी करारातील डीआय पाइपची तरतूद बदलून एचडीपीई पाइपची करण्याचा विषय जानेवारीपासून गाजत अाहे. आपला करार आपणच मोडीत काढत कंपनीचे पैसे वाचावे यासाठी मनपा प्रशासन काही मंडळी जाणूनबुजून प्रयत्न करीत असल्याचा भाजपचा आरोप आहे. जानेवारीत शिवसेनेसह सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी एकमुखाने करारानुसार डीआय पाइपच वापरावेत, असा निर्णय घ्यायला लावला. पण त्याची अंमलबजावणी तर दूरच, उलट गुपचूप या कानाचा त्या कानाला पत्ता लागू देता एचडीपीई पाइपचा ठराव घुसवण्यात आला. हा विषय उघडकीला आल्यानंतर भाजपला समांतरविरोधासाठी नवीन हत्यार मिळाले.
त्यांनी सर्वसाधारण सभेत शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाल्यावर स्थायी समितीत मात्र फक्त डीआय पाइपच वापरावेत असा ठराव मंजूर करून घेण्यात आला.
सेनेच्या पुढाकाराने मार्चमध्ये घुसडण्यात आलेला ठराव विखंडित करण्यासाठी भाजप चवताळून कामाला लागला आहे.
१५ मिनिटे चर्चा : भाजपचे गटनेते भगवान घडामोडे, सभापती दिलीप थोरात, उपमहापौर प्रमोद राठोड, माजी महापौर डाॅ. भागवत कराड, शिरीष बोराळकर यांच्यासह भाजपची स्थानिक नेत्यांची पलटणच मुंबईला गेली थेट मुख्यमंत्र्यांना भेटली. कालची टळलेली भेट आज दुपारी झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या शिष्टमंडळाला १५ मिनिटे वेळ दिला.
तक्रारींचा पाढा
समांतरचे नाव पाहूनच मुख्यमंत्र्यांनी मला हा विषय चांगला माहीत आहे असे सांगितले. समांतरमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, मनपा प्रशासन आयुक्तांची संशयास्पद भूमिका याबाबत भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगत केले. त्यावर फडणवीस यांनी लोकांसाठी जे चांगले असेल ते करा अशा सूचना करून शिवसेनेने मंजूर करून घेतलेल्या ठरावाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले तशा सूचना लिहून निवेदन सचिवांकडे सुपूर्द केले. ठराव विखंडित करण्याबाबत मात्र नंतर निर्णय घेतला जाईल असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेच्या ‘इंटरेस्ट’वरही चर्चा
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नेत्यांनी समांतर योजनेत शिवसेनेला असणारा रस, त्यातून करण्यात आलेले काही प्रकार जनतेचा रोष असताना शिवसेनेने चालवलेले योजनेचे समर्थन यामुळे समांतरबाबत जनमत वाईट असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून यावर ते काही बोलले नाहीत, पण सगळे बारकाईने ऐकून घेतल्याचे समजते.
बातम्या आणखी आहेत...