आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरातील वसाहतींमध्येही वाळवीचा हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जंगले नष्ट होत असल्याने अन्नाच्या शोधार्थ वाळवीने मानवी वसाहती घेरायला सुरुवात केली आहे. वाळवीच्या भुयारांवर भारतीय मानांकन ब्युरोने (दिल्ली) खूप संशोधन केले. मात्र, अद्याप यश आलेले नाही. भारतातील पठारी भागात पहिल्या मोसमी पावसानंतर (यालाच वळवाचा पहिला पाऊस म्हणतात.) दमट व उबदार हवामानांत या किडीच्या भावी राजे व राण्या वारुळातून घोळक्याने बाहेर पडतात आणि आसपासच्या वसाहतीत आक्रमण करतात. रस्ते, बाजारपेठ, दिव्यांभोवती बहुसंख्येने घिरट्या मारतात. दिवसा तर झुंडीच्या झुंडी जमिनीतून बाहेर पडतात. वारूळ सोडण्यापूर्वी जननेंद्रिये कार्यक्षम असतात. यानंतर राण्या व राजांचा संयोग होतो. नंतर ही जोडपी शहरातील दमट, उबदार ठिकाणी वारुळे तयार करतात. शहरात लाकूड, कागद, फर्निचर असल्याने त्यांची अन्नाची गरज भागते. बेसमेंट, स्लॅब व भिंतींना असलेल्या तड्यांमधून 0.5 एमएमच्या छिद्रातून वाळवी घरात प्रवेश करते आणि सर्व लाकडी वस्तूंचा नायनाट करते.

डीबी स्टार तपास
डीबी स्टारच्या तपासात सर्व उद्यानांमध्ये वाळवी लागल्याचे आम्ही उघड केले. तेथूनच वाळवीने लोकांचे बंगले, घरेही गाठली आहेत. शहरातील सिडको एन-1, एन-3, बन्सीलालनगर, रामनगर, मुकुंदवाडी, सर्मथनगर, ज्योतीनगर, उल्कानगरी, आरेफ कॉलनी, दिल्लीगेट परिसर, हडको, शहानूरवाडी, टिळकनगर, दशमेशनगर, गारखेडा, जालाननगर, उस्मानपुरा, रेल्वेस्टेशन परिसर, विठ्ठलनगर, सिडको एन 6, मथुरानगर, संभाजी कॉलनी, टेलिकॉम सोसायटी, पारिजातनगर, सह्याद्री कॉलनी, साने गुरुजी हाउसिंग सोसायटी आदी परिसरात मोठय़ा प्रमाणात वाळवी असल्याचे नागरिकांनी दूरध्वनीवरून सांगितले.

काय आहेत वाळवीचे दुष्परिणाम
वाळवीचे तुलिर व साखर हे खाद्य आहेत. ज्या वनस्पतीत ते सापडतात. त्या सर्व वनस्पतींना वाळवी लागते. नवीन रोपेही वाळवीच्या ताबडतोब भक्ष्यस्थानी सापडतात. पूर्ण वाढ झालेल्या झाडांच्या मुळांना वाळवी लागल्यास जमिनीतून झाडांच्या वाढीस आवश्यक ती पोषकद्रव्ये मिळत नाहीत. परिणामत: झाडांची वाढ खुंटते व उत्पन्न कमी होते. वाळवी झाडांच्या मुळाजवळील माती भुसभुशीत करते. अशी झाडे वादळांत उन्मळून लगेच पडतात. इमारतीतील लाकडांत वाळवी शिरल्यास इमारतीतील किमती फर्निचर व त्यातील कागदी सामान होत्याचे नव्हते होते.


माजी कुलगुरूंच्या घरातील कागदपत्रे फस्त
सिडको एन-3 राहणारे मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या बंगल्यात 3 महिन्यांपूर्वी वाळवीने लाकडी फर्निचरमध्ये शिरून महत्त्वाच्या फाइल्स, कागदपत्रे खराब केली. पाटील यांनी शेजारी राहत असलेल्या माजी मंत्री शिवाजीराव पाटील यांच्या बंगल्यात अन्य कागदपत्रे हलवली. दोन महिन्यांत तेथेही वाळवी लागली.


माजी महापौरांच्या घरातील कपाट खाल्ले
माजी महापौर विजया रहाटकर यांच्या घरात मॅक्सिकन आंब्याचे झाड होते. आठ दिवसांत ते वाळले. पाने गायब झाली. उभे झाड जळाले. आंबेही वाळले. अचानक झालेला हा बदल पाहून त्यांना आश्चर्य वाटले. घरातील नव्या कोर्‍या कपाटात पांढरी वाळवी निघाली. कपाट जसजसे सरकवले. तसतसे प्रमाण वाढत गेले. कपाटाची मागची बाजू संपूर्ण खाल्लेली होती.


उपमहापौरांच्या दाराची चौकट फस्त
मलाही सोडले नाही
वाळवीचा शिरकाव घरात झाल्याचे लक्षात येताच मी पेस्ट कंट्रोलद्वारे तिचा नायनाट केला. मात्र वाळवीची गॅरंटी नाही.
संजय जोशी, उपमहापौर


काय म्हणतात तज्ज्ञ?
वारुळे नष्ट करावीत
इमारतीच्या आसपास वारुळे शोधून नष्ट करावीत. डीडीटी 5 टक्के व खनिज तेल मिसळून लाकडी वस्तूंवर लावावे. लाकडांच्या आतल्या भागात वाळवी दिसल्यास वारुळाचा नाश हाच अखेरचा उपाय.
डॉ. पी. एस. बोरीकर, कीटकशास्त्र तज्ज्ञ


वाळलेली झाडे नष्ट करा
लाकडापासून बनलेल्या सर्वच वस्तूंसाठी वाळवी धोकादायक असते. इमारतीच्या भिंतीवर वाळवी कितीही मजले चढू शकते. घराभोवताली वाळवीचा प्रसार रोखण्यासाठी वाळलेली झाडे, फळ व शोभिवंत झाडे नष्ट करावीत.
डॉ. अशोक रावदेव, कीटकशास्त्र तज्ज्ञ


जहाल औषधे वापरावीत
वारुळातील सर्वच किड्यांचा नाश करणे शक्य नाही. अशा वेळी काही कामकरी वारुळांत शिल्लक राहिल्यास ते राखीव प्रजोत्पादन वर्गापासून नवीन राजे व राण्या निर्माण करतात. तसेच नवीन वसाहती (वारुळे) निर्माण करतात. कायमचा बंदोबस्त करण्यासाठी वारुळाला 15 ते 20 सें.मी. खोल भोक पाडून त्यामध्ये 12 ते 18 औंस रॉकेल, पेट्रोल किंवा क्लोरोफॉर्म युक्त कार्बन डायसल्फाइड सारखे धुरीजन्य औषध ओतावे. म्हणजे या किडींचा बंदोबस्त होतो. जी वारुळे सहजासहजी नष्ट होत नाहीत अशा वारुळात सायनोगॅस पंपाच्या साहाय्याने सायनोगॅस भुकटीचा उपयोग करावा किंवा मिथिल ब्रोमाइड काचेच्या बाटलीत वारुळांत खोल खुपसून नंतर फोडल्यास धुरी वारुळात पसरते व वारुळातील कीड नष्ट होते.
डॉ. ए. डी. देशपांडे, कीटकशास्त्र तज्ज्ञ


शेणखताचा वापर टाळा
घरालगत बागेत शेणखताचा वापर टाळावा. मशागत करताना औषधांचा वापर करावा. पाण्यातून क्रुड ऑइलचा वापर करावा. बागेत अल्ड्रीन, पॅराथिऑन, बासुदीनचा वापर करावा. भिंती उभारण्यापूर्वी इमारतीच्या बैठकीवर 7.5 ते 15 सें.मी.जाडीची सिमेंटची लादी जमिनीच्या वरच्या पातळीपर्यंत द्यावी.
डॉ. पराग चांदेकर, कीटकशास्त्र तज्ज्ञ


वारुळांचा नाश हाच उपाय
वारुळांचा नाश हाच एकमेव रामबाण उपाय. जमिनीच्या वर वाढणारी व सहज दिसणारी वारुळे खोदून त्यातील राणीचा नाश करावा, हा एक उपाय आहे.
डॉ. वेदप्रकाश पाटील, माजी कुलगुरू, मराठवाडा कृषी विद्यापीठ


काय म्हणतात अधिकारी-पदाधिकारी
फर्निचर नियमित स्वच्छ करा
डॉ. जयश्री कुलकर्णी, मुख्य आरोग्य अधिकारी, मनपा
आरोग्य विभागाचा याच्याशी संबंध नाही. तरीही लोकांनी दर आठवड्याला फर्निचर स्वच्छ ठेवावे. ओलसर जागी लाकडी वस्तू ठेवू नयेत. फर्निचरमधील वस्तू बाहेर काढून पुसाव्यात. दमट व उबदार वातावरणाशी लाकडाचा संपर्क टाळावा.
नियंत्रण कक्ष स्थापन करणार
संजय जोशी,उपमहापौर
वाळवीवर नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र पेस्ट कंट्रोल यंत्रणा उभारणार. याशिवाय ना नफा ना तोटा या तत्त्वावर कीटक नाशक औषध कंपन्यांशी संपर्क करून शहरवासीयांना उपलब्ध करून देणार. याबाबत आरोग्य विभाग, उद्यान विभाग, प्रभाग अधिकारी, सहायक नगररचना विभाग, मुख्य अभियंता यांनी बैठक घेऊन याबाबत चर्चा करणार.
लवकर पावले उचलणार
विजय पाटील, उद्यान अधीक्षक, मनपा
या प्रकरणी मुख्य अभियंत्यांना सर्व अडचणी सांगतो. वाळवीच्या या गंभीर प्रकाराबाबत चर्चा करून त्यांना सविस्तर माहिती देणार आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन मी लवकरात लवकर पुढील पावले उचलतो.
किटकनाशके सोडावीत
वारुळाच्या मध्यभागातून 6 ते 12 इंच खोल छिद्र पाडावे आणि अँल्युमिनियम फॉस्पाईड व डायक्लोरिफॉस हे विषारी धुरीजन्य किटकनाशके सोडावीत.
डॉ. बी. बी. भोसले, मराठवाडा कृषी विद्यापीठ


यांनाही झाला त्रास
माझ्या घरातही वाळवी
कुलगुरूंच्या घरालगतच माझे घर आहे. माझ्या घरातही हाच प्रकार झाला. त्यामुळे मला झेरॉक्सवर मॅटर चालवावे लागले. आजही माझ्या घरात वाळवी दिसते.
अँड. वसंत साळुंखे
रेशन कार्ड खराब केले
माझ्या घरात वाळवीने लायसन्स, रेशन कार्ड, गॅस कार्ड व बँके ची कागदपत्रे खराब केली आहेत. माझ्या घरालगत असलेले बदामाचे झाडही वाळले.
अंबादास साळवे, मुकुंदवाडी
लाकडी दरवाजे पोखरले
रामनगरातील भक्ती चौकात माझे घर आहे. घराच्या लाकडी दरवाजांना वाळवीने खिंडार पाडले आहेत. यातून माती निघत आहे.
अरुणा चव्हाण, रामनगर