आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inspirants Disppointed Over Banks Account Coditions

मनपा निवडणूक: बँक खात्याच्या अटीमुळे इच्छुक झाले हवालदिल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉर्ड आरक्षण, हद्दी निश्चित करण्यावरून सहारियांसमोर बाजू मांडताना माजी उपमहापौर प्रशांत देसरडा आक्रमक झाले होते. छाया : मनोज पराती
औरंगाबाद - निवडणुकीसाठी स्वतंत्र नवीन बँक खात्याची अट टाकण्यात आल्याने अनेक इच्छुक हवालदिल झाले आहेत. त्यात पुन्हा तीन दिवसांच्या सुट्यांमुळे बँकाही बंद राहणार आहेत. यावर तोडगा म्हणून राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी मनपा आयुक्तांना बँकांच्या अधिका-यांची तातडीने बैठक घेऊन त्यांना सूचना देण्याचे आदेश दिले आहेत.

मनपा निवडणुकीच्या तयारीचा प्रशासकीय आढावा व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी निवडणूक आयुक्त आज औरंगाबादेत आले होते. मौलाना आझाद संशोधन केंद्रात आज सायंकाळी या दोन्ही बैठका पार पडल्या. आधी अधिका-यांच्या बैठकीत त्यांनी तयारीचा आढावा घेत सूचना केल्या, तर नंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले. या बैठकीला विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, उपायुक्त किशोर बोर्डे यांची उपस्थिती होती.

बँक खात्यांचा तिढा
राजकीय पक्षांच्या बैठकीत प्रशांत देसरडा व राजू अहिरे यांनी नवीन बँक खाते उघडण्याच्या सक्तीचा विषय काढला. त्यांच्या म्हणण्यानुसार लगेच नवीन खाते सुरू होत नाही. त्यासाठी किमान आठवडा लागतो. चेकबुकही नंतर मिळते. अशा स्थितीत उमेदवारी अर्जावर खाते क्रमांक लिहिताच येणार नाही. नवीन खाते नसेल तर उभेही राहता येणार नाही. शिवाय २ व ३ एप्रिल रोजी महावीर जयंती व गुड फ्रायडेच्या सुट्या आहेत. मध्ये एकटा शनिवार आहे. नंतर पुन्हा रविवारची सुटी आहे. त्यामुळे खाते उघडता येणार नाही. यावर आधी मनपा आयुक्त महाजन म्हणाले, "निवडणुकीचा खर्च करण्यासाठी नवीन खाते आवश्यक आहे. त्यातूनच सारे व्यवहार करायला हवेत. यासाठी ही अट आहे. फक्त राष्ट्रीयीकृतच नव्हे तर शेड्युल्ड बँकेतही खाते उघडता येईल.' त्यावर नंतर निवडणूक आयुक्त सहारिया यांनी ही अडचण ध्यानात घेत उद्याच बँकांच्या अधिका-यांची बैठक बोलावून त्यांना तातडीने खाते उघडण्याच्या सूचना द्या, असे निर्देश मनपा आयुक्तांना दिले.

राजू अहिरे यांनी जात वैधता प्रमाणपत्राची अट सहा महिने शिथिल केल्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली तरी येथे ते मागतच आहेत असे सांगितले. त्यावर सहारिया यांनी वैधता प्रमाणपत्राबाबत देण्यात आलेली सहा महिन्यांची सूट फक्त ग्रामपंचायत निवडणुकांसाठीच आहे. ती नगर परिषद व महापालिका निवडणुकांना लागू नाही, असे सांगत वैधता प्रमाणपत्र सादर करावेच लागेल, असे स्पष्ट केले.

राजकीय पक्षांच्या शंका : देसरडा यांनी उन्हाळा असल्याने मंडप लावू द्या, मतदान केंद्र १२०० ते १४०० मतदारांचे करण्याऐवजी एका केंद्रात ७०० मतदान असल्यास मतदानही वाढेल असा मुद्दा मांडला. रवींद्र देशमुख यांनी १०७, १०८ व १०९ या तीन वॉर्डात दुबार नोंदणी झाल्याचा आरोप केला. तसेच बोगस मतदान रोखण्यासाठी व्हीव्हीपॅड यंत्रणा वापरण्याची सूचना केली. तसेच महिला मतदारांची ओळख पटवण्यासाठी महिला कर्मचा-यांची संख्या वाढवण्याचीही सूचना त्यांनी केली. खडकेश्वर वॉर्डात समावेश नसलेल्या अझीम कॉलनीचे २४८८ मतदार घुसवण्यात आल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला. या वेळी अवधूत शिंदे, दिनेश शिंदे, मीर हिदायत अली यांनीही आपले आक्षेप व सूचना मांडल्या.

आयुक्त म्हणाले, आम्ही तयार आहोत
सहारिया म्हणाले की, वॉर्डरचना अंतिम झाली आहे. न्यायालयाचाही निकाल आला आहे. आता त्यात काही होणार नाही. मतदार याद्यांत आता फक्त वॉर्ड चुकीचा असेल तरच बदल केला जाऊ शकेल. लोकसभा व विधानसभेला एका मतदान केंद्रावर १२०० ते १४०० मतदार असे नियोजन केले होते. ते योग्यच आहे. नियमात बसत असेल, तर मतदान केंद्राबाहेर उन्हापासून बचाव करण्यासाठी राजकीय पक्षांना मंडप टाकण्याची परवानगी देऊ. आमची तयारी पूर्ण झाली आहे. निष्पक्ष व दबावमुक्त वातावरणात निवडणुका घेण्यात येतील.