आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक पाऊल पुढे जात इच्छुकांनी चक्क दोन दोन पक्षांकडे मुलाखती दिल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिकिटे वाटताना बेरकीपणा करणा-या राजकारण्यांच्या एक पाऊल पुढे जात इच्छुकांनी चक्क दोन दोन पक्षांकडे मुलाखती दिल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात शिवसेनेच्या तिकिटासाठी मुलाखत देणा-यांपैकी जवळपास ३० इच्छुकांनी भाजपच्या मुलाखती दिल्या आहेत. डबल गेम करणा-या या इच्छुकांवर दोन्ही पक्षांनी नजर ठेवत त्यांची माहितीही एकमेकांना दिल्याचे समजते.

मनपा निवडणूक लढवण्यासाठी अनेकांना तिकिटाचे डोहाळे लागले आहेत. त्यात पुन्हा शिवसेना व भाजप यांचे युतीचे घोडे अडलेलेच आहे. अशा स्थितीत कोणता वाॅर्ड कोणाला सुटेल याची खात्री नसल्याने तिकीट मागायचे कोणाकडे हा संभ्रम आहेच. शिवाय युती झालीच नाही तर दोन्ही पक्षांना सर्व ११३ वाॅर्डांत उमेदवार लागणार आहेत, त्यामुळे दोन्हीकडे आपला दावा असलेला बरा असा चतुर विचार करून अनेकांनी आधी शिवसेनेच्या व नंतर भाजपच्या इच्छुकांच्या मुलाखतींनाही हजेरी लावली.

३० जणांची दुहेरी नीती
शिवसेना व भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पक्ष सारख्याच विचारसरणीचे असल्याने या नाही तर त्या पक्षाकडे तिकीट मागण्यासाठी ते पुढे आले आहेत. अशांची संख्या ३० च्या आसपास असली तरी त्यात शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांचे सदस्य असणारे इच्छुक आहेत.

इकडेही, तिकडेही
> हा प्रकार शिवसेनेच्या मुलाखतीच्या वेळी समोर आला होता. काही वाॅर्डांच्या मुलाखती सुरू असताना भाजपशी संबंधित काही इच्छुक मुलाखतीला आले होते. त्यांनी रीतसर अर्ज घेऊन मुलाखती दिल्या. वाजत-गाजत मोहीमच घेतली नसताना आलेल्या या भाजप समर्थकांमुळे काहींच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या.
> भाजपच्या मुलाखती सुरू असताना तेथेही यापैकी काही इच्छुक दाखल झाले. काहींनी दोन्हीकडे तिकीट मागितल्याचा दगाफटका होऊ शकतो हे ध्यानात घेऊन मागच्या दाराने तिकीट मागण्याचेही प्रयत्न केल्याचे समजते.
पक्षांना माहिती मिळाली
शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युतीसाठी बोलणी सुरू असली तरी आपापल्या पक्षांचे कोण इकडे तिकडे जात आहे यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांना माहितीही शेअर केल्याचे समजते.

दानवे म्हणतात, आमची नजर आहे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही भाजपच्या मुलाखतीवरही नजर ठेवून होतो. आमच्याकडे मुलाखती देऊनही जे कोणी तिकडे गेले त्यात शिवसेनेचे कोणी पदाधिकारी अथवा नाव घ्यावे, असे लक्षणीय कोणी नाही. या उपरही कोणी पक्षाचा सदस्य त्यात असला तर आम्ही त्यावर शिस्तभंगाची कारवाई करूच.