आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Conference In Babasaheb Ambedkar Univercity

बुद्ध धम्म खऱ्या अर्थाने लोकशाहीवादी, प्रा. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ब्रिटिशराजवटीनंतर देशात लोकशाही आली अन् हिंदू धर्मातील जातीय विषमतेमुळे अस्पृश्यांचे हक्क हिरावले गेले. हिंदू अस्पृश्यांना स्वीकारत नाहीत, त्यामुळे त्यांना स्वाभिमान मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करताना लोकशाहीचा विचार केला होता. बुद्ध धम्म हा लोकशाहीवादी असल्याचा ठाम विश्वास असल्यामुळेच त्यांनी तो स्वीकार केला, असे मत प्रसिद्ध लेखक तथा माजी संमेलनाध्यक्ष प्रा. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उदारकला (लिबरल आर्टस) विभाग, अमेरिकेतील महाराष्ट्र स्टडीज ग्रुपतर्फे "महाराष्ट्र : समाज आणि समाज' या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला शुक्रवारी प्रारंभ झाला. उद्घाटकीय सत्रात प्रा. मोरे यांचे बीजभाषण झाले, त्यावेळी ते बोलत होते. सिडनी विद्यापीठाचे प्रा. जिम मेसेलोस, उदारकला विभागाचे संचालक डॉ. वि. ल. धारूरकर, वित्त लेखा अधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. मोरे म्हणाले, १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला येथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली होती. त्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ पर्यंत हिंदूंनी किंवा हिंदूंच्या तत्कालीन पुढाऱ्यांनी त्यांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. त्यामुळे देशात विषमतेचे प्रश्न अधिक जटिल होत गेले. बाबासाहेबांच्या मते त्यावेळी अस्तित्वात असलेल्या धर्मांपैकी एकही धर्म लोकशाही मूल्यांचे समर्थन करणारा नाही. हिंदू धर्म तर नाहीच नाही, त्यामुळे त्यांनी समस्त हिंदूंनाच धर्मांतराची साद घातली होती. बौद्ध धम्म एक तर जागतिक होता लोकशाहीचे तत्त्वत: समर्थन करणारा होता. त्यामुळेच त्यांनी धर्मांतर करून बौद्ध धम्माचा स्वीकार केला. अध्यक्षीय भाषणात प्रा. जिम मेसेलोस यांनी परिषदेची भूमिका विशद केली. डॉ. धारूरकर यांनी संत वाङ््मयाचे दाखले देऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची ओळख करून दिली. समन्वयक डॉ. बिना सेंगर यांनी सूत्रसंचालन केले. संकेत कुलकर्णी यांनी आभार मानले.

‘स्पेसेस अँड प्लेसेस ऑफ लिटरेचर अँड रिलिजन' या विषयावरील परिसंवादात अमेरिकेतील अँड फेल्डहाउस, जर्मनी येथील दीप्रा दांडेकर, स्लोव्हाकियाचे प्रा. डॉ. दुशान डीक, कोलकोटा येथील प्रा. प्राची देशपांडे यांनी सहभाग घेतला. दुसऱ्या सत्रात ‘स्पेसेस ऑफ हिस्टॉरिकल मेमरीज, राइटिंग्ज अँड मॉन्यूमेंट्स' या विषयावर कोलंबिया येथील डॉमिनिक वेंडेल, अमेरिकेतील पुष्कर सोहोनी, रशियाच्या इरिना ग्लुश्कोवा, हैदराबाद येथील औदिशरानी बावा, इंग्लंड येथील शैलेंद्र भांडारे आदींनी सहभाग घेतला. ‘मराठा संस्थान : स्पेसेस अँड प्लेसेस इन महाराष्ट्र' या विषयावरील तिसऱ्या परिसंवादात अमेरिकेतील डॅनियल जास्पर, जपान येथील मिशिहिरो ओगा, अमेरिकेतील नवीना नक्वी, प्रा. बिरींदरपाल सिंग, लॉरी मॅकमिलिन हे मान्यवर सहभागी झाले होते.

आज तीन सत्रांत तज्ज्ञांची व्याख्याने
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (९ जानेवारी) सकाळच्या सत्रात प्रा. अना फ्लेल्डस् यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होईल. प्रा. दुसान डिक, पार ऐलिशसन, जाशन श्वार्टझ सहभागी होतील. पुढील सत्रात जेष्ठ अभ्यासक डॉ. सुहास पळशीकर अध्यक्ष असून प्रा. गीता थाटरा, प्रा. शैलेंद्र भंडारे, प्रा. राहूल सरवते, प्रा. सुजा शाकिर मार्गदर्शन करणार आहेत. ‘महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे ऐतिहासिक वारसा’ या विषयावर प्रा. इरिना ग्लुश्कोवा, लुरी मॅकमिलन, लक्ष्मण सत्या, किरण शिंदे, प्रा. दुलारी कुरेशी यांचा सहभाग राहणार आहे. अखेरच्या सत्रात अंजली नेरळकर, सचिन केतकर, जयंत लेले, प्रा. सतीश बडवे, प्रा. डॉ. मेबल फर्नाडिस भाषण करणार आहेत.