आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध अन् संपन्न अनुभव देणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 16 पैकी 8 मराठी चित्रपटांचे प्रदर्शन सिनेरसिकांसाठी सुखद धक्का होता. आशयसंपन्न आणि जीवन समृद्ध करणारी अनुभूती या महोत्सवातून तरुणाई व रसिकांना आली.

महोत्सवाच्या माध्यमातून विविध देशांतील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसिक स्थिती यांचा अभ्यास तरुणाईला करता आला. विविध देशांचे दर्शनही घडले. संदेश भंडारे दिग्दर्शित ‘म्हादू’ आणि शांतनू रोडे दिग्दर्शित ‘जयजयकार’ या चित्रपटांतून मन हेलावणार्‍या, सुन्न करणार्‍या कथांसोबतच आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक प्रश्नांविषयी आपण अनभिज्ञ आहोत याची प्रखर जाणीव करून देण्यात आली. शिवाय आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘द सी’, ‘द मॅसेंजर’, ‘मि. मुरगन्स लास्ट लव्ह’ या चित्रपटातून मानवी संवदेना मांडण्यात आल्या. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्याकडे सतत 4 ते 5 वष्रे पाठपुरावा करून नाथ ग्रुपचे सर्वेसर्वा नंदकिशोर कागलीवाल यांनी हा महोत्सव घडवून आणला. तर प्रोझोनचे अध्यक्ष अनिल इरावणे यांनीही याला उत्तम साथ दिली.

पुढील वर्षी सर्व स्क्रीन महोत्सवासाठीच
16 चित्रपट घेऊन आम्ही आलो, वेळही कमी होता. मात्र, पुढील वर्षी 100 ते 110 चित्रपट आणि 4 ते 5 स्क्रीन आम्ही घेऊ यातून अधिक चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध होईल. औरंगाबादेत नाट्य चळवळी सशक्त आहेत, पण चित्रपट क्षेत्रातील पडद्यामागीलही सशक्त फळी यातून निर्माण होईल. तसेच सर्वांचा अनुभव समृद्ध करून मानसिक, सामाजिक उंची वाढवण्याचेही काम यातून होईल. - संतोष जोशी, उपाध्यक्ष नाथ ग्रुप.


शहराच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा
हा महोत्सव औरंगाबादच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. जोवर जागतिक दर्जाचा चित्रपट पाहत नाही तोवर समग्र अनुभव मिळू शकत नाही. चित्रपट केवळ मनोरंजन करण्यासाठी किंवा संदेश देण्यासाठी असतात, अशा भाबड्या कल्पनेला भेदून काढण्याचे काम या महोत्सवातून होणार आहे. आत्मचिंतन करायला लावत आयुष्याच्या उद्देशाबाबत अधिक जागरूक करण्याचे काम यातून होणार आहे. मराठी चित्रपटांना दर्जा नाही असाही समज आपल्याकडे रूढ आहे. मात्र, चित्रपट महोत्सवात हजेरी लावलेल्या मराठी चित्रपटांनी हा समज नक्कीच खोडून काढला आहे. जयर्शी गोडसे, रंगकर्मी.

पडद्यामागील आव्हाने पेलणेही महत्त्वपूर्ण
आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या माध्यमातून विविध देशांच्या संस्कृतीचे दर्शन येथील रसिकांना घडले. आपल्या भागात चित्रपट पाहण्याची कल्पकता अजून रुजलेली नाही, त्यामुळे काही चित्रपट बोल्ड वाटले. पण जागतिक स्पध्रेत आपल्याला जायचे असेल तर ते काय करत आहेत, ते आपण पाहायलाच हवे. आपल्याकडे पडद्यावर दिसण्यात युवा कलावंतांना स्वारस्य असते मात्र पडद्यामागील आव्हाने पेलणेही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. याची जाणीव यातून युवा कलावंतांना झाली. आगामी काळात चित्रपटासाठी आपल्याकडे उत्तम कलावंतांची फळी यामुळे निर्माण होईल, अशी आशा या महोत्सवामुळे पल्लवित झाली आहे. -अजित दळवी, लेखक, नाटककार.

रसिकांसाठी पर्वणी
महोत्सवाच्या माध्यमातून विविध देशांतील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि मानसिक स्थितीचा तरुणाईला करता आला अभ्यास; रंगकर्मींनी केले कौतुक