आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा फूट ओव्हरब्रिज !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यात अडचण येऊ नये यासाठी जालना रोडवर एसएफएस शाळेसमोर आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्वयंचलित फूट ओव्हरब्रिज उभारण्यात येणार आहे. यावर अभ्यास करून रेखांकन तयार करण्याचे काम पुणे येथील कन्सल्टंटला देण्यात आले आहे. येत्या मेपासून ब्रिज उभारणीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.

वेरूळ, अजिंठा लेण्यांमुळे औरंगाबाद शहर पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. शहरात वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ तत्त्वावर रस्ते विकास योजनेचा 2001 मध्ये प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यात क्रांती चौक, टाऊन हॉल व रेल्वेस्टेशन उड्डाणपुलांचे काम झाले आहे. संग्रामनगर पुलाचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

आता फूट ओव्हरब्रिजचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठी 5 मार्च 2013 रोजी पुण्याच्या क्रिएशन डिझायनर कंपनीला प्रकल्प सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. देश-विदेशांतील ब्रिजच्या धर्तीवर नकाशे आणि येणारा खर्च याचा अहवाल कंपनी तीन महिन्यांत महामंडळाला देणार आहे.

दरम्यान, फूट ओव्हरब्रीजबाबत अधिकार्‍यांशी चर्चा झाली आहे. योजनेत महापालिकेचे 4 कोटी रुपये आहेत. शहरात प्रथमच होणार्‍या ब्रिजची योग्य देखभाल केली जाईल, असे मनपाचे शहर अभियंता एम. डी. सोनवणे यांनी म्हटले आहे.

स्वयंचलित पायर्‍या
ब्रिजचे काम नवीन तंत्राद्वारे मेपर्यंत सुरू होईल. खुल्या जागेवरील ब्रिजला स्वयंचलित पायर्‍या बसवण्यात येणार आहेत. पुणे येथील कन्सल्टंटला अभ्यास करून अहवाल देण्याच्या सूचना आहेत. - शरद अष्टपुत्रे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी.

पुढे काय
पुणे येथील क्रिएशन डिझायनर कंपनी जागेचे सर्वेक्षण करून ब्रिजचे वेगवेगळे डिझाइन तयार करील.

डिझाइननुसार प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च आणि कामासाठी लागणारा कालावधी याचा अहवाल ही कंपनी तीन महिन्यांत महामंडळाला सादर करील.

डिझाइन मंजूर झाल्यानंतर कामाच्या निविदा काढण्यात येतील.

कंत्राटदार एजन्सीसोबत क्रिएशन डिझायनर प्रकल्प सल्लागार राहील.

तयार ब्रिज महापालिकेकडे हस्तांतरित केला जाईल. पुढे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची राहील.