औरंगाबाद- जपान व भारत देशाअंतर्गत पर्यटन व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी औरंगाबाद येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत जपानमधील वाकायामा राज्याच्या आंतरराष्ट्रीय कार्यालयाचे उद्धाटन जपानच्या प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार कार्यकारी संचालक हिरोयुकी त्स्युई यांच्या हस्ते झाले.
गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व वाकायामाचे राज्यपाल यांच्या उपस्थितीत मुंबई येथे वाकायामा व महाराष्ट्र राज्य यांचा पर्यटन व अन्नप्रक्रिया उद्योग या क्षेत्रात परस्पर सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार वाकायामा प्रांतिक शासन व महाराष्ट्र राज्य शासन यांनी प्रचलित धोरण पद्धतीचा अवलंब करून पर्यटनाद्वारे परस्परांच्या आर्थिक विकासास चालना द्यावयाची आहे. कराराचा एक भाग म्हणून अजिंठा- वेरूळ पर्यटक अभ्यागत केंद्राचे प्रचलन जपानमध्ये वाकायामा प्रांतिक शासन करत आहे. जपानमधील वाकायामा, कोयासान व टोकियो येथे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. कोयासान या बुद्धिस्ट स्थळाच्या ठिकाणी वाकायामा प्रांतिक शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनास जागा उपलब्ध करून दिली असून तेथे महाराष्ट्र शासनातर्फे फेब्रुवारी ते मे २०१५ पर्यंत पुतळा स्थापित केला जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.
महाराष्ट्रात २० ठिकाणी गरम पाण्याचे झरे व तीर्थस्थळे आहेत तसेच मासे बाजार भरणारी मोठी ठिकाणे आहेत, अशा स्थळांना जपानने महत्त्व दिले असून गरम पाण्याचे झरे व मासे बाजार विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला वाकायामा प्रांतिक शासन आर्थिक मदत करण्यास इच्छुक असल्याचे कार्यकारी संचालक हिरोयुकी त्स्युई यांनी या वेळी सांगितले.
या कार्यालयासाठी वाकायामाने
नोबुओ मियामोटो यांची नियुक्ती केली आहे. एमटीडीसीच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास वाकायामाचे अधिकारी नोबुओ मियामोटो, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थानपक पांडुरंग कुलकर्णी, कार्यकारी अभियंता शैलेंद्र बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.