आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International Women\'s Day Special Sanitary Napkin Issue

सॅनिटरी नॅपकिनच्या व्हेंडिंग मशीन लावा; सोलापूरने केली राज्यात सुरुवात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"काळ बदलला, परिस्थिती बदलली, पर्यावरण बदलले, जीवनपद्धती बदलली. मात्र, सुविधा आणि माहिती जुनाटच. काही विषय जिभेवर आणायलाच परवानगी नाही. त्यामुळे अज्ञान वाढले. मासिक पाळीबाबतही असेच आहे. ग्रामीण भागात माहिती आणि पैशांअभावी पारंपरिक पद्धतीनेच मासिक पाळीदरम्यान काळजी घेतली जाते, तर शहरी भागात सॅनिटरी नॅपकिनच्या सहज उपलब्धतेचा प्रश्न आहे. यावर तोडगा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे 5 वर्षांपूर्वी व्हेंडिंग मशीन बसवण्यात आले. बचत गटांना प्रोत्साहित करण्यात आले. इतर राज्यांनी आपल्याकडून प्रशिक्षण घेतले. मात्र, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरांतदेखील व्हेंडिंग मशीन बसवण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. अशावेळी महिला संघटनांनी पुढाकार घेतला तर मोठी समस्या सुटू शकेल."

शहरांमध्ये महिलांना कामानिमित्त वेळी-अवेळी घराबाहेर राहावे लागते, बाहेरगावी जावे लागते. याशिवाय इतर महिलांनाही प्रवास करावा लागतो. अशा वेळी मासिक पाळीदरम्यान त्यांची कुचंबणा होते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन 24 तास उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

सार्वजनिक ठिकाणी असावे उपलब्ध
रेल्वेस्थानक, बसस्थानक, विमानतळ, सिनेमागृह, इस्पितळ, मुलींचे वसतिगृह, कॉलेज अशा ठिकाणी 24 तास सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध असायला हवे. त्यासाठी व्हेंडिंग मशीनचा वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारचे मशीन्स इतर उत्पादने विकण्यासाठी विविध कंपन्यांकडून वापरले जात आहेत. दुसरीकडे औषधी दुकानांमध्ये ही उत्पादने विकण्यासाठी महिला कर्मचारी असावे.

सोलापूर जिल्ह्याचा आदर्श
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत येणार्‍या महिला सक्षमीकरण विभागाने राज्यात क्रांतिकारी प्रयोग केला. अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे 2008 मध्ये पहिले व्हेंडिंग मशीन बसवण्यात आले. सुरुवातीला बचत गटाला नॅपकिनची निर्मिती आणि महिलांच्या आरोग्याविषयी जागरूक करण्यात आले. 13 महिलांच्या बचत गटाने छोटीशी सुरुवात केली. ती आज वर्षाला 5 लाख पाकिटांपर्यंत पोहोचली आहे. आता हा प्रकल्प महिला आर्थिक विकास महामंडळाशी जोडलेला आहे.

धक्कादायक आकडे
विभागाने या कामाला सुरुवात करण्यापूर्वी ग्रामीण भागांचे सर्वेक्षण केले. त्यात धक्कादायक माहिती उघड झाली. ग्रामीण भागात सॅनिटरी नॅपकीन वापरणार्‍यांची टक्केवारी फक्त 0.2 इतकी होती. तर सोलापूर शहरात फक्त शाळकरी मुली ते वापरत असल्याचे पुढे आले. याशिवाय अंधर्शद्धा आणि चुकीच्या पद्धतींचा वापर होत असल्याची माहितीही समोर आली. त्यामुळे महिलाच्या आधी पुरुषांना याविषयी संवेदनशील बनवण्यासाठी जागरूकता अभियान राबवण्यात आले. बचत गटांनीही निर्मिती आणि समुपदेशनावर जोर दिला. मोहिमेने वेग घेतल्याने फक्त एक वर्षात जिल्ह्यात सॅनिटरी नॅपकिन वापरणार्‍या महिलांचे प्रमाण 70 टक्क्यांपर्यत गेल्याचे प्रकल्पाचे प्रमुख सिद्धराम मासाळे यांनी सांगितले.

तामिळनाडूत झाली सुरुवात
तमिळनाडूमध्ये 2008 ला क्रिशनगिरी तालुक्यात याची सुरुवात झाली. तेथील ग्रामीण भागातील शाळेमध्ये युनिसेफ आणि तमिळनाडू सरकारने करार करून व्हेंडिंग मशीन बसवल्या. किशोरवयीन मुलींना फायदा मिळावा या उद्देशाने ही सुरुवात करण्यात आली. याची किंमत फक्त दोन रुपये ठेवण्यात आली आहे. त्यानंतर 2010 मध्ये चेन्नईत काही सार्वजनिक स्थळ आणि सरकारी रुग्णालयातील लेबर वॉर्डमध्ये वेंडिंग मशीन आणि त्याची विल्हेवाट लावणारी मशीन लावण्यात आली. महाराष्ट्राने तामिळनाडूकडून प्रशिक्षण घेतले.

पुरोगामी महाराष्ट्र मागे
महिला सक्षमीकरण विभागाने पुढे आपल्या अनुभवाच्या जोरावर कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश या राज्यांना प्रशिक्षण दिले. सोलापूर जिल्ह्यातही प्रयोग यशस्वी झाला. त्यानंतर महाराष्ट्रात सगळीकडे व्हेंडिंग मशीन्स लावण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला देण्यात आला. मात्र, पुरोगामी महाराष्ट्र या महत्त्वाच्या मुद्दय़ावर मागे राहिला.

सवलतीच्या दरात पुरवावेत
शहरांमध्ये उपलब्धतेचा प्रश्न आहे तर ग्रामीण भागात अज्ञानाचा. एका सर्वेक्षणानुसार मासिक पाळीदरम्यान स्वच्छता न बाळगल्यामुळे देशातल्या साधारणत 50 टक्के महिला अनेक आजारांना बळी पडतात. देशभरातील 81 टक्के ग्रामीण महिला अजूनहीकपड्याचा वापर करतात, तर 68 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन विकत घेण्यात असर्मथ असतात. 35.50 कोटी रजस्वला महिलांपैकी फक्त 12 टक्के महिलाच सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. ही आकडेवारी धक्कादायक आहे. याआधी पारंपरिक साधनांचा वापर होत होता. मात्र बदलत्या काळाबरोबर अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. कर्नाटकमध्ये 2009 मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात 94 टक्के ग्रामीण महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करत नव्हत्या. त्यामुळे तेथील समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेत ही सुरुवात केली आहे.

तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा
आज प्रत्येक ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. तर मग महिलांना याचा फायदा का मिळू नये. स्त्रियांचा संकोच घालवेल अशा तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. माझ्या मते, हा स्त्रियांचा हक्क आहे. जर सरकारकडून हे होत नसेल तर त्यांनी रेशनच्या दुकानावर गरीब स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत.
-हेमलता कुलकर्णी, प्राचार्या, कॉलेज ऑफ सोशल वर्क

सर्वत्र सुविधा मिळावी
पुरोगामी महाराष्ट्रात स्त्रियांच्या बाबतीत विविध क्षेत्रांतल्या आरक्षणासह अनेक बाबतीत गवागवा असला तरी आरोग्याच्या दृष्टीने मात्र त्यांची फरपटच सुरू असते. शहरातल्या मध्यमवर्गीय महिलांसह ग्रामीण भागात असलेला मोठा वर्ग आरोग्याच्या सोयीसुविधापासून कोसो दूर असतो. त्यामुळे ही सुविधा जर आम्हाला शहरात मिळाली तर चांगले होईल.
-वैशाली पाटील, गृहिणी

राज्यात सोय उपलब्ध व्हावी
आज देश प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. महिलांही प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. तर मग याच बाबतीत आपण का मागे आहोत. या मशीनचा फायदा जर इतर राज्यात महिलांना होत असेल तर महाराष्ट्रातही व्हायला हवा. देशाच्या प्रत्येक शहरात या तंत्रज्ञानाचा वापर झाला तर यातून जगाला आधुनिकीकरणाचा संदेश जाईल.
- सुमन कुलकर्णी, गृहिणी

जागरूकतेची सुरुवात शाळांपासून करावी
मासिक पाळीवेळी हायजनिक सॅनिटरी नॅपकिनचा वापर करणे सगळ्यात उत्तम आहे. आजही अनेक महिला जुन्या पद्धतीचा वापर करतात. त्यामुळे वारंवार इन्फेक्शन होतात. सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन शहरात लागल्या पाहिजेत. या मशीनची सुरुवात शाळेपासून व्हायला हवी आणि शाळेतूनच जागरूकता व्हायला हवी.
-डॉ. कानन येळीकर, प्राध्यापक, घाटी रुग्णालय

स्वच्छ कापडाचा वापर

गर्भपिशवीचे आजार होण्याची शक्यता
मासिक पाळीदरम्यान स्वच्छता बाळगणे अतिशय गरजेचे असते. थोडेही दुर्लक्ष केले तर यामुळे इन्फेक्शन होतात. शिवाय गर्भपिशवीचे आजार होण्याची शक्यता असते. ग्रामीण भागातील काही महिला एकाच कपड्याचा वापर अनेकदा धुऊन करतात, असे दिसून आले आहे. नंतर तेच दुसर्‍या महिन्यात वापरतात.असे करणे खूप धोकादायक असते. ज्यांना नॅपकिन परवडत नसेल त्यांनी दर महिन्याला नवीन आणि स्वच्छ कॉटन कापड वापरावा.
-डॉ. शालिनी मिश्रा, मिश्रा मॅटरनिटी अँड चिल्ड्रन हॉस्पिटल

बचत गटांना द्यावी ही सुविधा
खरं तर ग्रामीण भागात महिलांना आरोग्यविषयी जागरूक करण्याची फार गरज आहे. मात्र, या मशिनींचा गावात वापर होणार नाही. गावामध्ये महिलांचे बचत गट असतात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतात. त्या बचत गटांना किंवा आरोग्य केंद्राच्या सेविकांना जर सरकारकडून कमी पैशात या नॅपकिनची सुविधा पुरविली गेली तर याचा सगळ्यांनाच फायदा होईल.गावातील गरजू महिलांनासुद्धा याचा फायदा मिळेल.
-डॉ. जयश्री तायडे, वैद्यकीय अधिकारी, अंधारी, सिल्लोड

येथे ही संकल्पना यशस्वी होणार नाही
शहरात किंवा महाराष्ट्रात सेनेटरी नॅपकिनच्या वेडिंग मशीनी लावण्याची संकल्पना अतिशय चांगली आहे. मात्र ग्रामीण महिलांच्या आरोग्याचा विचार करायचा असेल तर हे नॅपकिन सरकारने आरोग्य केंद्राच्या सेविकेकडे पुरवावेत. त्या महिलांना पुरवतील. किंवा आशा वर्करकडे हे काम सोपविले जाऊ शकते. खरं तर स्वच्छता हाच विषय ग्रामीण महिलांवर बिंबवणे गरजेचे आहे.
-अजय माने, स्त्री रोग संघटेनेचे अध्यक्ष