आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग मन शुद्ध करणारे शास्त्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- योग साधना हे सुरुवातीला शरीराला आणि नंतर मनाला शुद्ध करणारे शास्त्र आहे. यामध्ये जाती-धर्माचा संबंध नाही. सध्याच्या विलक्षण ताणतणावाच्या आयुष्यात काही क्षण थांबून स्वचिंतन, शारीरिक-मानसिक साधना करणे प्रत्येकासाठी नितांत गरजेचे झाले आहे, असे मार्मिक मत योगसाधक शेख निलोफर हिने मांडले. हजारोंच्या साक्षीने एमजीएम स्पोर्ट््स क्लबवर रविवारी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात योगवर्गाला सुरुवात झाली अन् पाहता पाहता जमलेल्या सर्वांनी योगोत्सव साजरा केला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण शहरातील विविध ठिकाणी योगसाधना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्वसामान्य आणि स्वयंसेवी संस्था, शाळांनी प्रतिसाद दिला. तितक्याच उत्साहाने तरुणाईही मैदानावर आली. अनेकांनी सकाळी फेसबुक, व्हॉट्सअॅपवर "हॅपी योगा' स्टेटस अपलोड केले. काहींना योगा करताना सेल्फीचा मोह आवरला नाही. योगसाधना सुरू असतानाच अनेकांच्या सोशल साइट अकाउंटला त्यांचे सेल्फी अपलोडही झाले होते. योगासाठी खास कपडे खरेदी केल्याची प्रतिक्रियाही अनेकांनी दिली. बच्चे कंपनीने शास्त्रोक्त पद्धतीने योग केला. शाळांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या योग प्रशिक्षणातून प्रत्येक आसनाचा शरीरावर कसा परिणाम होतो, याची माहिती मुलांना देण्यात आली होती. कला, साहित्य, संस्कृती, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. गोपाळ कुलकर्णी, श्रीकांत पत्की, डॉ. जयंत बरिदे, स्मिता दीक्षित, संकेत गवळी यांनी पतंजली योग समितीच्या वतीने योगसाधना करवून घेतली. या वेळी शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.
योगा केला की नाही?, असे दररोज विचारा : बागडे
योग शिबिराचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, योगसाधना ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली देण आहे. ही चळवळ कायम सुरू ठेवा. एका दिवसापुरती तिला मर्यादित करू नका. योगा केला की नाही? असे दररोज एकमेकांना विचारा म्हणजे योग चिरंतन सुरू राहील.
यांची होती उपस्थिती
यावेळी एमजीएमचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एन. गायकवाड, डॉ. सुधीर देशमुख, डॉ. गिरीश गाडेकर, जी. एम. कुलकर्णी, बलवंत विटेकर, नंदकुमार गुरुडे, सुभाष वेदपाठक, उदय कहाळेकर, शिवाजी कवडे, गंगाप्रसाद खरात, स्मिता दीक्षित, डॉ. रेखा शेळके, अपर्णा पांडव, पार्वती दत्ता यांची उपस्थिती होती.
योगाला ग्लॅमर आले
- योग हे भारताचे अतिप्राचीन शास्त्र आहे. पंतप्रधानांच्या पुढाकाराने याला जगभरात ग्लॅमर आले आहे. आपल्या देशाचा पुढाकार यामध्ये आहे म्हणून आम्ही योगा सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालो.
सायली मते, विद्यार्थिनी
योगा कीप अस हेल्दी
- आम्ही यापूर्वीही योगा केला आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योगा करणे अधिक महत्त्वाचे वाटते. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे.
शाहीन खान, विद्यार्थिनी
एफबीवर स्टेटस् केले अपडेट
- आमच्या एमबीए कॉलेजच्या सर्वांनीच योगामध्ये सहभाग घेतला. खूप मजा आली. पंतप्रधानांच्या अावाहनाला प्रतिसाद द्यायचाच असे आमचे ठरले होते. खूप उत्सुकता होती. सकाळी झोपेतून उठल्यावर आमच्यापैकी अनेकांनी एफबी, ट्विटरवर स्टेटस अपडेट केले.
मितल पटेल, विद्यार्थिनी
इतर "डे" प्रमाणे हादेखील महत्त्वाचा
- आपण तरुण मंडळी वेगवेगळ्या प्रकारचे सर्व डे उत्साहाने साजरे करतो. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे साजरा करताना उत्साह असतो. मग योगा डे का सेलिब्रेट करू नये? उलट आपल्या देशाने यासाठी पाऊल टाकले त्याला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यायला हवा.
सुरभी मुकादम, विद्यार्थिनी
बातम्या आणखी आहेत...