आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Internationally Known Analyst Dr. Ashok Kelkar Died At 83

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भाषाशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक केळकर यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - डॉ.अशोक केळकर
औरंगाबाद - भाषातज्ज्ञ डॉ. अशोक रामचंद्र केळकर (वय 85) यांचे शनिवारी औरंगाबाद येथे सकाळी नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते औरंगाबादेतील त्यांची कन्या रोशन रानडे यांच्याकडे राहत होते. केळकर यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले. भाषाशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, सांस्कृतिकशास्त्र जीवशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये त्यांचा मूलगामी व्यासंग होता.
डॉ. अशोक केळकर यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली होती. विविध विषयांच्या गाढ्या अभ्यासातून मिळवलेली भाष्य करण्याची ताकद आणि स्वतंत्र विचार मांडण्याची बौद्धिक क्षमता यामुळे भाषाक्षेत्रात डॉ. केळकर यांचा शब्द प्रमाण मानला जाई. हिंदी, इंग्रजी आणि मराठीमध्ये त्यांनी निर्माण करुन ठेवलेली विपुल ग्रंथसंपदा याची साक्ष देणारी आहे. भाषा विषयातील कार्याबद्दल भारत सरकारने डॉ. केळकर यांना 2002 मध्ये ‘पद्मश्री’ने गौरविले.
डॉ. केळकर यांचा जन्म सन 1929 मध्ये पुण्यात झाला. 1953 मध्ये पुणे विद्यापीठातून इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतून ‘एम.ए.’ची पदवी घेतली. उच्चशिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. तेथील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी भाषा, विज्ञान व मानववंशशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. अमेरिकेतून आल्यानंतर डॉ. केळकर आग्रा विश्वविद्यालयात काही काळ सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होते. पुढे 1962-67 या काळात पुणे विद्यापीठात भाषा विज्ञानाचे प्रपाठक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजात भाषा विज्ञान प्रगत अध्ययन केंद्रातून उपयोजित भाषा विज्ञान प्राध्यापक म्हणून ते अध्ययनाचे काम करीत राहिले.
पुढे 1989 ला शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुर्णवेळ संस्थात्मक कार्याला झोकून दिले. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परीसंवाद, परिषदा, संशोधनपर कार्य यात ते बुडून गेले. अनेक देशांमधल्या जागतिक विद्यापीठांमध्ये व्याख्यानासाठी त्यांना निमंत्रणे येत असत. भारतीय भाषा संस्थान (मैसूर), मराठी अभ्यास परीषद (पुणे), राज्य मराठी विकास संस्था यांची स्थापनेमागे डॉ. केळकर आहेत. मराठी अभ्यास परीषदेचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. परीषदेच्या ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाचे पहिले संपादक डॉ. केळकर होत.
डॉ. केळकर यांच्या ‘रुजवात’ या पुस्तकाला 2008 मध्ये साहित्य अकदामी पुरस्काराने गौरविण्यात आले. आस्वाद मीमांसा, चिन्ह मीमांसा, सांस्कृतिक मानव विज्ञान यासारखे त्यांचे अनेक समिक्षात्मक ग्रंथ उल्लेखनीय मानले जातात. त्रिवेणी, कवितेचे अध्यापन, वैखरी, मध्यमा, मराठी भाषेचा आर्थिक संसार, भेदविलोपन एक आकलन, प्राचिन भारतीय साहित्य मीमांसा एक आकल ही मराठीतील त्यांचे पुस्तके विशेष गाजली. ‘प्राचिन भारतीय साहित्य मीमांसा एक आकलन’ या पुस्तकाच्या हिंदी अनुवादाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. द फोनॉलॉजी आणि मॉरफॉलॉजी ऑफ मराठी, स्टडीज इन हिंदी-उर्दू लॅंग्वेज इन अ सेमियॉटीक पर्सपेक्टीव्ह, फ्रॉम अ सेमियॉटीक पॉंईट ऑफ व्ह्यू : कलेक्शन बुक ऑफ स्टोरीज इत्यादी संशोधनात्मक ग्रंथसंपदा त्यांनी इंग्रजीतही लिहिली आहे.
अर्थातच भारतीयांना आणि त्यातही मराठी माणसाला डॉ. केळकरांची थोरवी फार उशीरा समजली. “डॉ. केळकर हे आधी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेले. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर त्यांची दखल घेतली आणि शेवटी स्थानिक पातळीवर त्यांचे कार्य माहिती झाले,” असा उल्लेख काही वर्षांपुर्वी डॉ. केळकर यांच्या पत्नीने पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना केला होता; तो पुरेसा बोलका आहे. कोणतेही पुरस्कार, मान-सन्मान यापेक्षा ‘आपण काय लिहिलेय, मी काय म्हणतोय हे जिज्ञासूंनी वाचावे,’ अशी डॉ. केळकरांची इच्छा होती.