आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...त्या पाच वर्षांत प्रथमच हसल्या, हेच माझे यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक अभिनेता आपल्या भूमिकांतून प्रेक्षकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करत असतो. जास्त चित्रपट, मालिका किंवा नाटक करून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या अभिनयाने वेगळे काही करू शकलो तर त्याला अधिक महत्त्व आहे. ‘फू बाई फू’ मध्ये काम करताना अशाच एका अनुभवाने मी धन्य झालो. माझ्या सादरीकरणामुळे एक बाई 5 वर्षांत पहिल्यांदाच हसल्या. हेच मी माझे यश समजतो, असे मत अभिनेता अंशुमन विचारे याने मांडले. दिव्य मराठी उत्सवानिमित्त आयोजित ‘ए चल असं नसतं रे’ नाटकाच्या प्रयोगासाठी तो शहरात आला होता. त्या वेळी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी रोशनी शिंपीने त्याचा अभिनयप्रवास जाणून घेतला. तो त्याच्याच शब्दांत...

मला मनापासून इच्छा होती कुक होण्याची. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातच पुढचे करिअर करायचे मी ठरवले. मात्र, जेव्हा प्रत्यक्ष प्रवेशाची वेळ आली तेव्हा खर्चाचा आकडा परवडणारा नव्हता. मग ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनात नाटकाशी संबंध आला. कॉलेजच्या नाटकांत काम करताना त्यात गोडी निर्माण झाली. तेव्हा बोरिवलीच्या एका नाटक कंपनीमध्ये ‘मृगजळ’ नावाचे नाटक केले. त्यामध्ये मला फक्त उभे राहण्याचा अभिनय देण्यात आला होता. आता आठवून हसू येते, पण फक्त उभे राहण्याचे पात्र मिळवण्यासाठीही मी धडपड केली होती. यानंतर मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. 10 वर्षे विविध व्यावसायिक नाटकांतून छोट्या-मोठ्या भूमिका करत राहिलो.

‘टूरटूर’ हे व्यावसायिक रंगभूमीवरील माझे पहिलेच नाटक होते. यामध्ये मकरंद अनासपुरे, श्रेयस तळपदे हे दोघे होते. दिग्दर्शक सतीश राजवाडे, मी आणि मकरंद अशी उत्तम भट्टी जुळून आली. यानंतर एका लग्नाची गोष्ट, अधांतरी यासारखी नाटके करत असताना मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली. ती म्हणजे अभिनेत्याला तांत्रिक कौशल्यांची उत्तम जाण असायलाच हवी. म्हणून बासू चटर्जी यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम स्वीकारले. यादरम्यान आम्ही लघुपटांची निर्मिती केली.

त्या बाई हसल्या
‘फू बाई फू’ हा शो करीत असताना आम्ही अनेक नवनवे प्रयोग प्रेक्षकांपुढे सादर केले. त्याला भरभरून प्रतिसादही मिळत गेला. मात्र, माझ्या यशाची खरी पावती म्हणजे एका वकिलाच्या भूमिकेतील विनोदी पात्र मी सादर केले त्या भूमिकेने दिली. ती भूमिका केल्यानंतर खेड गावाहून आम्हाला अभय कान्हेरे यांचा फोन आला. त्यांच्या आई गेल्या 5 वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. हा काळ अतिशय वेदनादायी असल्याने त्या कधीच हसल्या नव्हत्या. हास्याची पुसटशी रेष त्यांच्या चेह-यावर कुणी पाहिली नाही. मात्र आमचा त्या भागातील अभिनय पाहून त्या हसल्या. कान्हेरे यांनी आम्हाला फोन करून हे सांगितले तेव्हा डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

अँकरिंगने मिळाली ओळख
चटर्जींसोबत काम करताना विपुल वाचन झाले. ‘सह्याद्री’वरील एका शोसाठी अँकरिंगची संधी मिळाली. ती स्वीकारताना वाटले, हे काय, सोपे आहे. मात्र प्रत्यक्षात अँकरिंग करण्यासाठी किती प्रचंड वाचन लागते याचा अनुभव आला. कारण विपुल वाचनाने मला शब्दसंग्रह मिळाला. त्याचा वापर अचूकपणे करण्याचे कौशल्य आपसूकच मला आल्याने अँकरिंगच्या अनेक संधी उत्तरोत्तर मिळत गेल्या. यातूनच अनेकांना माझा चेहरा ओळखीचा झाला. साम, मी मराठी, ई टीव्ही अशा अनेक वाहिन्यांवर अँकरिंगनंतर चित्रपटांतून भूमिका केल्या. स्वराज्य, भरत आला परत आणि श्वास चित्रपटांतील भूमिका यशस्वीरीत्या करू शकलो. मात्र मालिका मी केल्याच नाहीत. कारण तो माझा पिंड नाही.