आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Actor Sachin And Daughter Shirya Pilgaonkar

भावस्पर्शी, नि:स्वार्थ प्रेमाची कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वडील-मुलीच्या नात्याची भावस्पर्शी आणि नि:स्वार्थ प्रेमाची कहाणी सांगणारा सचिन पिळगावकर आणि श्रिया पिळगावकर यांचा ‘एकुलती एक’ हा चित्रपट येत्या 23 मे ला प्रदर्शित होतो आहे. व्‍हर्च्‍युअल प्रीमियरच्या माध्यमातून पहिल्याच दिवशी थेट प्रेक्षकांशी संवाद साधणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचे सचिन यांनी यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ही पिता-पुत्र जोडी शहरात आली होती. चित्रपटाबद्दलअधिक माहिती देताना सचिन म्हणाले, यंदाचा हा महिना माझ्यासाठी विलक्षण योगायोगाचा आहे. कारण, माझ्या कारकीर्दीला या महिन्यात 50 वर्षे पूर्ण होत आहेत, चित्रपट सृष्टीला 100 वर्षे होत आहेत तर याच महिन्यात माझी मुलगी श्रिया पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटातून स्वराच्या रूपात ती सर्वांना दिसेल. बाप आणि मुलीची ही कहाणी समाजाच्या प्रत्येक स्तराच्या आणि वयोगटाच्या व्यक्तीला आपल्याला एक मुलगी असायलाच हवी असा विचार देणारी आहे. मुलीच्या असण्याने आयुष्यात होणारे वैविध्यपूर्ण बदल आणि भावनिक आधार याभोवती खिळलेली ही कहाणी आहे. अशोक सराफ आणि मी अनेक वर्षांनी या चित्रपटात एकत्र दिसणार आहोत. परस्परांना अनोळखी असलेली बाप-लेकीची ही जोडी सुसंस्कृत आणि निर्मळ विनोदाची पर्वणी देणार आहे. पहिल्यांदा मला कथानक सुचले आणि मग यासाठी श्रियालाच घ्यावे हा विचार आला. तिचा होकार आल्यानंतर मी संहिता लिहायला घेतली. जितेंद्र कुलकर्णी यांचे सूर चित्रपटाला लाभले आहेत. चित्रपटात एकूण तीन गाणी आहेत त्यापैकी दोन सोनू निगम यांनी गायली आहेत, तर एक ड्यूएट गाणे सचिन आणि योगिता गोडबोले यांनी गायलेले आहे.

श्रिया आपल्या भूमिकेबाबत म्हणाली, माझी भूमिका एका मॉडर्न मात्र प्रगल्भ विचारांच्या मुलीची आहे. अवघ्या 80 दिवसांत बनलेला हा चित्रपट माझ्यासाठी अनमोल अनुभव होता. याआधीही लघुपट केलेले आहेत. दिग्दर्शकाचा दृष्टिकोन मला अवगत असल्याने बाबांना नेमकं काय करून हवं आहे याचा अंदाज मला लवकर येत होता.