आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलाखत: टपऱ्यांचे अतिक्रमण हटवून फुटपाथ मोकळे करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासह फुटपाथवरून लोकांना नीट चालता यावे यासाठी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे थाटलेल्या टपऱ्या हटवणे हेच माझे पुढील लक्ष्य आहे, असे मत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केले. पोलिस आयुक्तांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी हाती घेतलेल्या धडाकेबाज मोहिमेचे शहरवासीयांकडूनही स्वागत होत आहे. या पार्श्वभूमीवर "दिव्य मराठी'ने आयुक्तांशी संवाद साधला असता त्यांनी अभ्यासपूर्ण शैलीत वाहतूक समस्येवरील उपायांबाबत मतप्रदर्शन केले.

प्रश्न : पहिले पोलिस आयुक्त ए. एन. राय यांच्यापासून आतापर्यंत कुणीही वाहतुकीच्या प्रश्नाकडे इतके गांभीर्याने बघितले नव्हते. तुम्ही पदभार स्वीकारल्यापासूनच वाहतुकीचा प्रश्न हाताळत आहात. याचे गुपित काय आहे?
*उत्तर : गुन्हे रोखणे किंवा कायदा सुव्यवस्था राखणे हे आमचे पहिले काम आहे. मी नागपूर, अमरावतीला वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्तपदी काम केले आहे. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावण्यास मी प्रथम प्राधान्य दिले आहे.
प्रश्न : वाहतुकीचा प्रश्न एवढ्या गांभीर्याने का घेतला?
*उत्तर : शहरात वाहतूक चांगली असेल तर रस्त्यांची अवस्थाही चांगली असते. रस्ते चांगले असतील तर वाहतूक चांगली असते. या दोन्ही गोष्टी चांगल्या असल्या तर शहराची प्रतिमा चांगली दिसते म्हणून मी हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे.
प्रश्न : ट्रॅव्हल्स बसच्या मार्गात बदल केलेत. यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडेल असे वाटत नाही का?
*उत्तर : शहरात पुलांची कामे चालू आहेत. ट्रॅव्हल्स बस आकाराने मोठ्या असतात. त्यांना रस्त्यावर जागाही अधिक लागते. त्यामुळे तसा निर्णय घेतला आहे. ट्रॅव्हल्स बससाठीही स्थानके असायला पाहिजेत. ते काम मनपाने केले पाहिजे. प्रवाशांना ट्रॅव्हल्स बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी काही छोट्या गाड्यांची व्यवस्था ट्रॅव्हल्स एजन्सीजतर्फे केली जाणार आहे.
प्रश्न : काळी-पिवळी, ट्रॅव्हल्स बस आणि रिक्षांवर यापुढे कारवाई होणार आहे का?
*उत्तर : काळी-पिवळी, ट्रॅव्हल्स बसनंतर ऑटोरिक्षांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर दुचाकी, चारचाकी वाहनधारकांनाही शिस्त लावली जाईल. पूर्वी पुढे पोलिस चौकी िकंवा पोलिस उभा असल्यास वाहनधारक घाबरायचे. आता कुणीही घाबरत नाही. वाहतूक िनयमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कारवाई करू.
प्रश्न : तुमच्या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये चांगली चर्चा सुरू आहे?
*उत्तर : अशा कामामुळे काही जण खुश होतील, तर काही नाराजही होतील; परंतु काही निर्णय घ्यावेच लागतात. आमच्याकडूनही लोकांच्या अपेक्षा वाढत जातील. या सर्व मोहिमा कशा चालू ठेवायच्या याबाबत काही एनजीओंशी, माध्यमांशी आम्ही चर्चा करणार आहोत.
प्रश्न : वाहनांवरील कारवाईनंतर पुढेच मिशन काय?
*उत्तर : फुटपाथवरील टपऱ्या हटवण्यात येणार आहेत. या टपऱ्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते. एक मार्ग येण्याचा आणि एक मार्ग जाण्याचा असतो. दोन्ही बाजूंना दुकाने थाटली गेलीत. माणसांना चालण्यासाठी जागाच नाही. सरकारी रस्त्यांवर कोणतेच अतिक्रमण चालणार नाही.
बातम्या आणखी आहेत...