आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview शिवसेनेने फक्त गोतावळ्याचीच घरे भरली- गंगाधर गाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे. आता विविध राजकीय पक्षांचे उमेदवार अथवा नेत्यांकडून प्रतिस्पर्ध्यांवर टीकाटिप्पणी केली जाईल. प्रचार जसजसा शिगेला जाईल तसतसा आरोप-प्रत्यारोपांचा वेग वाढेल. नेतेमंडळी त्यांची व्यूहरचना, मोर्चेबांधणी जाहीर करतील. तत्पूर्वी त्यांचे डावपेच काय आहेत, त्यांच्या पक्षाची नेमकी भूमिका काय, हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे ‘गप्पा डावपेचाच्या’ हे सदर सुरू करण्यात आले आहे. त्यात काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या. शनिवारी (११ एप्रिल) आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते, पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांनी संपादकीय सहकाऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. तो असा :
श्रीकांत सराफ : विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपशी चर्चा, मग एमआयएमशी युती, त्यानंतर आता मनपा निवडणुकीत सेनेसोबत जाण्याचा प्रयत्न, हे कसे घडत गेले..?
गंगाधर गाडे : ते काही फार विशेष असे घडलेलेच नाही. त्यात कोणतेही गांभीर्य नाही. लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड माझे मित्र आहेत. दिल्लीत एका कामानिमित्त मी गेलो होतो, त्या वेळी त्यांची भेट झाली. वर्तमानपत्रात तसा फोटोही प्रसिद्ध झाला होता. मात्र त्यांच्यासोबत माझी राजकीय चर्चा झालीच नव्हती. भाजपतर्फे आपण पश्चिम औरंगाबादमधून इच्छुक असल्याच्या वावड्या उठल्या, त्यामध्ये अजिबात तथ्य नव्हते. गोपीनाथ मुंडे यांनी मागेच मला विधानसभेची ऑफर दिली होती, पण ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यानंतर विधानसभेत आम्ही एमआयएमशी केलेली आघाडी केवळ राजकीय नव्हती. काँग्रेसने मतांसाठी वापरून दलित व मुस्लिम समाजाला अक्षरश: लुबाडले आहे. त्याबद्दल दोन्ही समाजात तीव्र नाराजीचा सूर होता. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी या तात्त्विक मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो होतो. आता दुर्दैवाने आम्ही निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकलो नाही.
सतीश वैराळकर : विधानसभेत उमेदवारी घेतली, पण त्यांचे चिन्ह घेतले नाही त्याचे कारण काय..?
गंगाधर गाडे : हे बघा, एमआयएम हा स्वतंत्र राजकीय पक्ष असून त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे. आमचा पक्ष स्वतंत्र असून आम्ही बुद्ध-फुले-शाहू आंबेडकरी विचारांचे पाईक आहोत. दोन्ही समाज मागासलेले असून प्रश्न समान आहेत, म्हणून आम्ही युती केली होती. त्यामुळे त्यांच्या निवडणूक चिन्हावर लढणे म्हणजे आमच्या विचारधारेशी प्रतारणा केल्यासारखे होईल. त्यामुळे स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढलो. आपण निळी मशाल घेऊन निघालेलो आहोत. काहीही झाले तरी अखेरपर्यंत विचारधारा सोडणार नाही.
शेखर मगर : दलितांच्या झोपडपट्ट्या जैसे थे ठेवायच्या आणि विकास निधी उच्चभ्रू वसाहतींवर खर्च करायचा असा प्रकार युतीने केला आहे का?

गंगाधर गाडे :हा मुद्दा खरा अाहे. मागील २५ वर्षे ज्यांच्या हाती मनपाची सत्ता होती, त्यांनी फक्त घर, कुटुंबांचा स्वार्थ पाहिला. फक्त गोतावळ्यातील लोकांची घरे शिवसेनेने भरली. मनपाला शिवसेना-भाजपने भ्रष्टाचाराचे कुरण करून ठेवले आहे. भूखंड कमी पडताहेत म्हणून सेनेने नाल्यावर बांधकामे केली आहेत. वास्तविक पाहता नाले अडवता येत नाहीत. पण औरंगपुरा येथे अनधिकृत बांधकाम केले आहे. सत्तेच्या जोरावर सर्वसामान्य जनतेचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे दिले सोडून, यांनी फक्त स्वत:ची घरे भरली आहेत. स्वत: पुढारी, त्यांचे कुटुंब आणि जातीचा विचार केला जातोय. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांकडे कोण पाहणार..? खरे तर औरंगाबादला एक ऐतिहासिक परंपरा आहे. हजारो देशी-विदेशी पर्यटक येथे येतात आणि किती घाणेरडे शहर आहे हे, असे म्हणत निघून जातात. अजिंठा आणि वेरूळसारख्या जगप्रसिद्ध लेणींचे हे शहर बकाल अवस्थेत आहे. त्याला पूर्णपणे युतीच जबाबदार आहे.
मंदार जोशी : शहरातील प्रमुख दहा राजकीय नेत्यांपैकी आपण एक आहात. मागील तीन-चार दशकांत सर्वांकडूनच धर्मांध राजकारण केले गेले. याकडे आपण कसे बघता..?

गंगाधर गाडे : धर्मकारण आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात धर्माचा वापर केला जातोय ही खरी गोष्ट आहे. मात्र लोकशाहीच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. ज्यांच्याकडे सांगण्यासारखे अन् करण्यासारखे काहीच नाही अशांकडून जात, धर्माचा वापर केला जातो. राजकारणाचा संबंध विकासाशीच जोडला गेला पाहिजे. जात, धर्म केले तर विकासाला बगल दिली जाते. लोकांनीही आता शहाणे झाले पाहिजे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान केले पाहिजे. त्याशिवाय धर्मांध पक्षांचे डोके ठिकाणावर येणार नाही. आम्ही मात्र घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सैनिक आहोत. हाती समतेचा निळा झेंडा घेऊन मार्गक्रमण करत आहोत. आमच्या या भूमिकेत जातीयवादाचा लवलेशही नाही.
हरेंद्र केंदाळे : आपला पक्ष किती जागा लढवतोय?
गंगाधर गाडे : आमच्या पक्षातर्फे अनेकांनी लढण्याची तयारी केली होती. मुलाखती घेण्यात आल्या. मात्र ज्या ठिकाणी निवडून येण्याची खात्री आहे अशा ८-९ जागा आम्ही लढत आहोत. त्यामध्ये तीन तरुणांना संधी दिली आहे.
रोशनी शिंपी : नोकरी मिळाली, व्यवसायात यश मिळाले की आंबेडकरी समाजाकडे पाठ करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आंबेडकरी चळवळीला खीळ बसली असे वाटते का..?

गंगाधर गाडे : आंबेडकरी चळवळ पूर्वीप्रमाणे आता गतिमान
राहिलेली नाही हे खरे आहे. पूर्वी आंबेडकरी चळवळीत राजकीय परिवर्तन करण्याची ताकद होती. आता मात्र चळवळीची गती कमी झाली असे म्हणता येईल, मात्र खीळ बसली असे अजिबात नाही. या चळवळीला फुले-शाहू-आंबेडकरांचा वारसा आहे. नोकरी मिळणे म्हणजे पाठ फिरवणे नव्हे. सर्वजण आपापल्या कर्तृत्वावर मोठे होतात. ऐपतीप्रमाणे काम, धंदा बघतात. त्यांनी पाठ
फिरवलेली नाही. त्यांच्या आवडीनुसार ते चळवळीशी जोडले गेले आहेत. कुणी कवितांतून डॉ. आंबेडकरांचे महत्त्व विशद करतो. कुणी लेख लिहून वैचारिक बाजू मांडतोच आहे. अर्थात पूर्वीसारखे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे थोडे कमी झाले आहे. त्याचा अनुभव मलाही अनेकदा आला आहे. तरीही नजीकच्या काळात पुन्हा उभारी घेऊन चळवळ उभी राहू शकते.
सुमीत डोळे : सत्तेच्या मोहापायी एमआयएमसारख्या धर्मवेड्या पक्षासोबत युती करण्याचा निर्णय योग्य वाटतो का..?

गंगाधर गाडे : कसे आहे, सत्तेत बहुसंख्याकांचे प्रभुत्व असल्यामुळे त्यांच्याकडून दलित आणि अल्पसंख्याक समाजाची प्रतारणा होते. सत्तेतील पुढारी - मग काँग्रेस असो की भाजप-सेनेचे - त्यांनी कायम दोन्ही समाजाची उपेक्षा केली आहे. मुस्लिम आणि दलितांचे प्रश्न समान आहेत. दोघांनाही विशिष्ट वर्गाला कायम गावकुसाबाहेर ठेवले आहे. विकासाची कामे दोन्ही समाजाच्या वसाहतींमध्ये पोहोचलेली नाहीत. त्यामुळे विधानसभेत आम्ही युती केली होती. आता मात्र आम्ही वेगळे-वेगळे लढत आहोत.

हरेेंद्र केेंदाळे - काँग्रेसचा काय अनुभव आहे?
गंगाधर गाडे : दलित समाज कायम काँग्रेससोबत राहिला. एक प्रकारे दलित म्हणजे काँग्रेससाठी हक्काचे मतदान होते. मात्र या हक्काच्या मतदारांना काँगर्ेसने अपेक्षेप्रमाणे न्याय दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा किंवा त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद््भवत नाही.
प्रवीण ब्रह्मपूरकर : एमआयएमपासून वेगळे होण्याचे काय कारण? त्यांच्या नेतृत्वाकडून तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही का?

गंगाधर गाडे : नेतृत्वाकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला. दलित, मुस्लिम एकत्र आल्यास सत्ताकारण बदलू शकते, असेच त्यांना वाटते. दोन्ही ओवेसी बंधूंना युती व्हावी असे वाटत होते. मात्र त्यांच्यात खिलाडूवृत्तीचा अभाव दिसून आला. स्थानिक नेत्यांच्या इच्छेप्रमाणे आम्हाला त्यांच्या निवडणूक चिन्हावर लढण्यास सांगण्यात येत होते. पण आम्ही आमचा पक्ष गुंडाळून ठेवू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांची साथ सोडली. गंगाधर गाडे आपल्यासोबत आले तर पुढील काळात त्यांचे महत्त्व वाढेल, असे एमआयएमच्या स्थानिक नेत्यांना वाटले. त्यामुळेच मी त्यांच्यापासून दूर झालो.
विद्या गावंडे : निवडणुका बिनविरोध करणे म्हणजे मतदानापासून वंचित ठेवणे नव्हे काय..?
गंगाधर गाडे : लोकशाही व्यवस्थेत निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे झाल्याच पाहिजेत. मात्र कुणी सत्ता, संपत्तीचा दुरुपयोग करत निवडणुका बिनविरोध करत असतील तर ते लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. लोकशाहीचा गळा घोटल्याप्रमाणेच आहे ते. तुमचे मत बरोबर आहे.
रोशनी शिंपी : महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव आहेत, किती महिलांना उमेदवारी दिली..?
आमच्याकडे महिलांनी उमेदवारी मागितली होती, मात्र प्रत्येकाचे आम्ही समाधान करू शकलो नाही. सध्या चार महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सतीश वैराळकर : सत्ताधाऱ्यांच्या मते इतर शहरांच्या तुलनेत आम्ही मुबलक पाणी देतोय, हे शिवसेनेचे म्हणणे किती खरे आहे?

गंगाधर गाडे : साफ खोटे आहे. लातूर, उस्मानाबाद, जालन्यासोबत काय तुलना करताय..? तुलना करायचीच असेल तर शेजारच्या नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांशी का करत नाही..? विकसित भागात पिण्याचेच काय, उसालाही मुबलक पाणी दिले जाते. येथे मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण करून ठेवला आहे. शिवसेनेने का नाही औरंगाबादच्या पाण्यासाठी आंदोलन केले? का नाही कधी रस्त्यावर उतरले? का नाही जनतेचा आवाज उठवला? का नाही कधी "औरंगाबाद बंद'चा इशारा दिला?
शेखर मगर : बसपच्या मतांची टक्केवारी पाहता रिपब्लिकन गटांना बसप पर्याय ठरतो आहे..?
गंगाधर गाडे : कसे आहे, दलित नेत्यांनी आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी बाजार मांडला आहे. दूरगामी विचार करणे गरजेचे असताना त्यांनी ‘शॉर्टकट’ मारत काहीतरी पदरात पाडून घेण्याला महत्त्व दिले आहे. त्यामुळे रिपब्लिकन चळवळीची वाताहत झाली. त्यामुळे आंबेडकरी जनता बसपला पसंती देत आहे. कांशीराम असेपर्यंत बसप चांगला पक्ष होता. आता तशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे रिपब्लिकन पक्षांना बसप पर्याय नाही.
संतोष देशमुख : सर्व जाती-धर्मांच्या लोकांना आपण सोबत का नाही घेत..?
गंगाधर गाडे : हा प्रयत्न होणे गरजेचे आहे. रिपब्लिकन चळवळ किंवा पँथर्स म्हणजे केवळ विशिष्ट जातीचा, धर्माचा पक्ष अशी प्रतिमा योग्य नाही. त्यासाठी आम्ही सतत मेहनत घेत आहोत, पण प्रस्थापित पक्षांमध्ये काम करण्यासाठी सर्वजण इच्छुक असतात. आम्ही सामान्यांच्या प्रश्नांवर भांडत असतो. जो पीडित, शोषित, गरीब आहे - मग तो कोणत्याही जातीचा असेल - त्याला आपल्यासोबत घेतलेच पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.
विद्या गावंडे : सेनेसोबतचा कडवटपणा काही अंशी कमी झाला का..?
गंगाधर गाडे : होय, आधी नामांतराच्या काळात पँथर आणि सेनेमुळे खूप कडवटपणा निर्माण झाला होता. मागील दहा वर्षांत थोडाफार कडवटपणा दोन्ही समाजातील कमी झाल्यासारखे वाटते आहे. मात्र पूर्णपणे मनोमिलन झालेले नाही. कारण शिवसेनेला चातुर्वर्ण्य व्यवस्था टिकवायची आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था संपवावी असे त्यांना अजिबात वाटत नाही.
रवी खंडाळकर : मनपाच्या शालेय शिक्षणाची काय स्थिती आहे..?
गंगाधर गाडे : मनपाच्या शाळांमध्ये दलित-गरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये शिक्षकांना राज्य सरकारकडून पूर्ण पगार मिळतो. पण मुलांची गुणवत्ता काय आहे, याचे अकॅडमिक ऑडिट झाले पाहिजे. शाळांमध्ये पायाभूत सुविधा नाहीत, प्रयोगशाळा नाही. योग्यतेचे शिक्षक नसल्यामुळे दलित मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. येथील शिक्षकांची मुले मात्र खासगी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये गुणवत्तेचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे.
सुमीत डोळे : महापालिकेचा निकाल काय असेल असे वाटते?
गंगाधर गाडे :युतीच्या विरोधातील मतांची विभागणी झाली आहे. त्यामुळे परिस्थितीत फारसा बदल होणार नाही, असे वाटते. मात्र, कुणाच्या घरात गुलालाचे पोते ठेवायचे हे आम्हीच ठरवणार आहोत. शब्दांकन : शेखर मगर,