आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा-वेरूळ महोत्सवात केवळ पैशांचा विचार -तबलावादक मंगेश कुलकर्णी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीत ही मोठी साधना आहे. कलेला अंत नाही, त्यामुळे कितीही शिक्षण घेतले तरी ते कमी पडते; पण किमान १२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्याला थोडेफार ज्ञान प्राप्त होते. तबल्याचे बेसिक ज्ञान समजण्यासाठीच ४ वर्षे लागतात, अशा शब्दांत शहरातील प्रसिद्ध तबलावादक मंगेश कुलकर्णी यांनी तबलावादनाबाबत आपली भूमिका मांडली. 

या क्षेत्रात कसे आलात?
माझी आई मालती मधुकर कुलकर्णी हिचा आवाज सुरेख आणि गोड होता. अार्थिक परिस्थितीमुळे तिला पुढील शिक्षण घेता आले नाही. तिच्यातील अानुवंशिक गुण माझ्यात आले आणि मला तबल्याची आवड निर्माण झाली. कला ही निसर्गदत्त देणगी आहे. ती प्रत्येकात कमी-जास्त प्रमाणात असते. त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता असते. माझी तबलावादनाची आवड लक्षात घेऊन मला घरच्यांनी १९७८ मध्ये तबल्याचे शिक्षण घेण्यासाठी गुरूंकडे पाठवले.

तुमचे गुरू कोण?
(कै.) पं. रमेश सामंत यांच्याकडून मी १५ वर्षे तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांच्या निधनानंतर पं. योगेश सामसी, पं. सुरेशदादा तळवळकर यांच्याकडून मी आजही तबलावादनाचे मार्गदर्शन घेत आहे.

तबलावादनात तुम्ही घेतलेल्या या  शिक्षणाबद्दल तुम्ही काय सांगाल?
मी तबलावादनात अलंकारपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. १९९६ पासून मी आकाशवाणी येथे मान्यताप्राप्त बी हायग्रेड कलाकार म्हणून काम करत आहे. तसेच सध्या सरस्वती भुवन प्रशालेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

या क्षेत्रात रियाजाला खूप महत्त्व आहे, याबाबत काय सांगाल?
या क्षेत्रात रियाज ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तबलावादनाचा रियाज वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. ‘एक चिल्ला बांधणे' या पद्धतीमध्ये रियाज केल्याने फायदा होता. यामध्ये एक तबल्याचा बोलसमूह घेऊन ठरावीक वेळ तो एकच बोल प्रकार सलग ४० दिवस वाजवायचा असतो. यामुळे तबलावादनात निपुणता येते.
 
तबला नीट वाजवता येण्यासाठी साधारणत: किती दिवस शिक्षण घ्यावे लागते?
कलेला अंत नाही, त्यामुळे कितीही शिक्षण घेतले तरी ते कमी पडते; पण किमान १२ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्याला थोडेफार ज्ञान प्राप्त होते. तबल्याचे बेसिक ज्ञान समजण्यासाठीच ४ वर्षे लागतात.

या क्षेत्रात प्रत्येकालाच यश मिळत नाही याची कारणे काय?
आज आमच्या क्षेत्रात अनेकांना फक्त मार्केटिंग करायची सवय लागली आहे. प्रत्येकासमोर वाकायची आणि वाहवा करायची सवय लागल्याने तसेच परखड मत व्यक्त न करता उगीच बडेजावपणा मिरवायचा यामुळे अनेकांना यश मिळत नाही. कारण यश मिळण्यासाठी स्वत:मधील चुका तरी दिसायला पाहिजेत; पण त्याही कोणी स्पष्टपणे सांगत नाहीत. म्हणून यश मिळाले तरी ते तात्पुरतेच असते.

शहरात सध्या रॉकबँडची क्रेझ वाढत आहे याबाबत काय सांगाल?
मला असे काही जाणवत नाही, रॉकबँडमध्ये ऱ्हिदम असल्याने तो सगळ्यांना आपल्याकडे ओढतो. पण तो क्षणिक आनंदाचा भाग आहे. शास्त्रीय संगीतातील एखादा राग विस्तारपूर्वक सादर करायला सव्वा तास लागतो, तेवढी सहनशीलता प्रेक्षकांमध्ये पाहिजे.

तुम्ही शाळेव्यतिरिक्त तुमच्या क्लासेसच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम कधीपासून करत आहात?
१९९४ मध्ये मी श्रुती संगीत अकॅडमी सुरू केली. तेव्हापासून मी आजपर्यंत क्लासेसच्या माध्यमातूनदेखील ज्ञानदानाचे काम करत आहे.

गुरू-शिष्य परंपरेबद्दल तुमचे मत काय?
गुरू-शिष्य परंपरेनेच शिक्षण झाले पाहिजे, कारण शिष्याला गुरूचा सहवास जास्तीत जास्त लाभतो. कला दिवसातून एखाद्या तासात प्राप्त होणारी गोष्ट नाही. आज गुरू-शिष्य परंपरा शहरातील मोजक्याच लोकांकडे टिकून आहे. या परंपरेमुळे एकमेकांचे स्वभाव लक्षात येतात.

या क्षेत्रात करिअर करण्यासंदर्भात काय सांगाल?
ज्या मुलांमध्ये वयाच्या ५ व्या ६ व्या वर्षी एखादी मैफल करण्याचे टॅलेंट असते त्यांच्या पालकांनीच मुलांना या क्षेत्रात करिअरसाठी पाठवावे. अथवा ज्यांची अार्थिक परिस्थिती खूप चांगली आहे त्यांनीच आपल्या मुलाला या क्षेत्रात पाठवावे. कारण या क्षेत्रात फक्त श्रीमंत आणि गरीब असे दोनच वर्ग येतात. एकतर उच्चकोटीचा तबलावादक जो गरीब आहे तो श्रीमंत होऊ शकतो, जो मुळात श्रीमंत आहे त्याने शिक्षण घेऊन कुठेही तबला वाजवत फिरावे.

या संगीत क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नव्या पिढीला  काय मार्गदर्शन कराल ?
तुम्ही कोणत्या गुरूंकडे शिक्षण घेत आहात हे तपासून पाहावे. गुरूंनीदेखील शिष्याला कोणत्याही प्रकारे अंधारात ठेवू नये. पालकांनी आपल्या पाल्याला कशाची आवड आहे हे पाहूनच या क्षेत्रात शिक्षण द्यावे. अनेक पालक मुलाला क्रिकेटची आवड असते आणि त्यांच्या आवडीसाठी तबल्याचे शिक्षण घ्यायला पाठवतात हे चुकीचे आहे. कलेचा बाजार होता कामा नये, कला ही कलाच राहिली पाहिजे.

या क्षेत्रात काम करत असताना कोणकोणती पथ्ये पाळावीत?
या क्षेत्रात चांगल्या लोकांचा सहवास मिळवावा. सगळ्या कलाकारांच्या मैफली ऐकून त्यातील चांगले घ्यावे, वाईट मुद्द्यांची चर्चा करू नये ही पथ्ये पाळावीत.

आपल्याकडे होणाऱ्या अजिंठा-वेरूळ महोत्सवाबद्दल तुमते मत काय ?
कलाकारांनी आपल्या कलेशी प्रामाणिक राहायला हवे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कार्यक्रमाचे आयोजन करत असताना एखाद्या नि:स्वार्थी कलावंताला घेणे गरजेचे आहे. शासन बाहेरील कलाकाराला अवाढव्य मानधन देते, त्यालादेखील यामुळे चाप बसले. हा महोत्सव मूळ शास्त्रीय संगीतासाठी सुरू झाला, पण आता फक्त या महोत्सवातून पैसा कसा मिळेल हे पाहिले जात आहे.

या क्षेत्रात शिक्षण आणि सर्टिफिकेट याला किती महत्त्व आहे?
सर्टिफिकेट म्हणजे उदरनिर्वाहासाठी गरजेचे साधन म्हणून बघितले जाते; पण तसेही शासनाकडून कोणत्याही सरकारी कार्यालयात संगीताचे सर्टिफिकेट असलेल्याला नोकरीत राखीव जागा नाही, कारण शासनाची असलेली उदासीनता. शासन शास्त्रीय संगीताची अजिबात दखल घेताना दिसत नाही. एखाद्याने एम.ए. म्युझिकचे शिक्षण घेतल्यानंतर त्याचे भवितव्य अंधारात आहे. ज्यांना खरी कला शिकायची आहे आणि या क्षेत्रात काम करायचे आहे त्यांनी गुरुकुल पद्धतीने शिकावे.

स्थानिक कलावंतांना त्यांच्याच शहरात किंमत दिली जात नाही, पण इतर शहरात खूप मानसन्मान मिळतो हे खरे आहे का?
हो हे खरे आहे, कारण संगीत क्षेत्र हे दिसायला जेवढे चांगले आहे, तेवढेच बरबटलेलेही आहे. कलावंतांमधील आपसातील हेवेदावे खूप आहेत. असे कलाकारांनी करू नये, यामुळे स्थानिक कलाकारांना किंमत मिळत नाही. मुळात काही गुरूच शिष्यांना याच्या मैफलीला जाऊ नको, याच्या मैफलीला जा असे सांगतात. गुरूंनी असे शिष्याला सांगू नये, उलट एखाद्या शिष्याची विद्वत्ता खूप असेल तर त्याला दुसऱ्या चांगल्या गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवले पाहिजे.

भविष्यात तुम्हाला या क्षेत्रासाठी काय करावेसे वाटते?
या क्षेत्रात व सामाजिक योगदान म्हणून एक गाव दत्तक घेऊन त्याचा सांस्कृतिक विकास करायची माझी खूप इच्छा आहे. संगीतामुळे सामाजिक सलोखा वृद्धिंगत होईल, शास्त्रीय संगीत म्हणजे एक जादू आहे. आज देवगड येथील प्रसिद्ध अांब्यांना दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी शास्त्रीय संगीत ऐकवले जात असल्याने तेथील आंब्यांची वाढ उत्कृष्ट होत असल्याचे निदर्शनास आले, त्याला म्युझिक थेरपी असे म्हणतात. शास्त्रीय संगीत प्राण्यांनादेखील ऐकवल्याने गायी-म्हशींचे दूध देण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच शास्त्रीय संगीतात किती ताकद आहे याची ही उदाहरणे आहेत. मला आजही खेड्यापाड्यातून एखादा किशोर कुमार, भीमसेन जोशी, एखादी लता मंगेशकर मिळेल अशी खात्री आहे.

तुम्ही पहिली मैफल कधी केली आणि आजवर कुणा-कुणासोबत काम केले ?
माझी पहिली मैफल १९९२ मध्ये केली. मी आजवर पं. विकास कशाळकर, पं. चारुदत्त आफळे, पं. शुभदाताई पराडकर, माधुरी ओक, पं. विजय कोपरकर यांच्याबरोबर अनेक मैफली केल्या. माझा ओढा शास्त्रीय संगीताकडे असल्याने मी ऑर्केस्ट्राकडे गेलो नाही. १९८६ मध्येच मी माझ्या गुरुजींना तसे सांगितल्याचे मला आठवते.

पाश्चिमात्य संगीत टीव्हीवर अनेक चॅनेलवर दाखवले जाते, पण शास्त्रीय संगीत दाखवले जात नाही याबद्दल काय वाटते?
जसे आकाशवाणीवर दररोज रात्री १० ते १०.३० शास्त्रीय संगीत वाजवले जाते, त्याप्रमाणे प्रत्येक चॅनेलवर किमान अर्धा तास तरी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दाखवला पाहिजे. शास्त्रीय संगीत ऐकणाऱ्यांची, सादरीकरण बघणाऱ्यांची लोकसंख्या खूप आहे, पण टीव्हीवर ते दाखवले जात नसल्याने प्रेक्षकांकडे पर्यायच नाही.
 
पुढील स्लाइडवर वाचा श्रुती मंच आणि कीर्तन महाविद्यालयाची स्थापना...
बातम्या आणखी आहेत...