आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of Marathi Sahitya Samelen President F M Shinde

पुढारी माणसेच आहेत, त्यांनीही संमेलनांना यावे- फ. मुं. शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला कोणीच वर्ज्‍य नाही, कोणीही अस्पृश्य नाही. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांनी येण्यात गैर नाही, कारण तीही माणसेच आहेत! अशी स्पष्ट भूमिका घेत अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांनी आपली वैचारिक भूमिका स्पष्ट केली. ज्याला पाठमोरा माणूस आणि पाठकोरा कागद वाचता येतो तो पुढच्या कवितेपर्यंत पोहोचतो, असे विधान करत एक संवेदनशील कवी म्हणून फ. मुं. व्यक्त झाले. ‘दिव्य मराठी’च्या औरंगाबाद येथील कार्यालयास सदिच्छा भेट देऊन त्यांनी साधलेला मुक्त संवाद..

प्रश्न : संमेलनाध्यक्षपदी निवडून आल्याचा अनुभव कसा आहे?

फमुं : मी पहिल्यांदा पाहिले की संपूर्ण महाराष्ट्रातून, सगळ्या प्रदेशातून, मुख्य म्हणजे खेड्यापाड्यातून अंत:करणपूर्वक कौतुक केले. खूप फोन आले. मी म्हणतो, मी जगावर प्रेम करतो, जगाने माझ्यावर प्रेम केले पाहिजे. ते केले सर्वांनी. आणि कुठेही कटुता येऊ नये, अशी माझी भूमिका राहिली. मुळात आम्ही सगळे करुणावादी आहोत. त्यामुळे कटुतेचा प्रश्न नाही. हा सन्मान वाट्याला आला, तेव्हा मी एकटा सन्मानासाठी आहे, असे वाटत नाही. माझ्या वाट्याला आलेला हा सन्मान आहे तो मी सगळ्या मराठी मुलखाला वाटला. तो त्यांचा आहे. माझ्याजवळ काही राहिलेले नाही, त्यामुळे एक सामूहिक जाणीव आली आहे. ‘मी सामील समूहात’ अशी आपली कायम भूमिका आहे. त्यामुळे वैयक्तिक आनंद, तोही कोणत्याही चांगल्या गोष्टीचा, सद्भावनेच्या अधिष्ठानातून कोणालाही आनंद होतो; पण हा मला एकट्याला आनंद झालेला नाही. मराठीचे अन्य तीन प्रतिनिधी- प्रतिस्पर्धी नाहीत- या प्रक्रियेत सहभागी होते. माझ्या मनातला आनंद हा त्यांच्या मनातला आनंद आहे. त्यामुळे आम्ही चौघेही येथे आहोत, असे मला वाटते. काही प्रतिक्रिया उमटल्या, लोकप्रियता जिंकली, अंतर्मुखता हरली अशी प्रतिक्रिया दिली, त्यासंबंधी मी प्रतिक्रिया देत नाही. त्यावर माझे स्वतंत्र विधान आहे. मी आतापर्यंत जी कविता लिहिली, 27 कवितासंग्रहांतून अंतर्मुख करणारे जे लेखन केलेले आहे, त्याला मी लोकप्रिय केले, तेव्हा अंतर्मुखताही लोकप्रिय होऊ शकते हा वेगळा मुद्दा आहे. मी माझी कविता समाजासमोर ठेवतो. सादरीकरण करतो. प्रेमकविता, गंभीर, राजकीय विनोदी कविता सादर करतो; पण तुम्ही समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसाल तर तो तुमच्या मानसिकतेचा भाग आहे.

प्रश्न : निवडणूक लढवताना तुम्हाला शंका अशी वाटली नाही का कधी?

फमुं : मी एवढेच सांगत आलो की, मी जरी मराठवाड्यात जन्मलो, ज्या जातीत जन्मलो त्या जातीला चिकटून राहायचे की नाही याचा विवेक मला आहे. माझ्यावर लहानपणापासून ते संस्कार आहेत. त्यामुळे मी काही एका प्रदेशाचा कवी नाही. तमाम मराठी मुलखाचा कवी आहे. कवी केशवसुतांनी जसे सांगितले की, प्रदेश साकल्याचा ही सकलता आम्ही कधीही सोडली नाही. त्याच विचाराने मी सातत्याने लिहीत आलो, बोलत आलो आणि समाजासोबत वागतही आलो.

प्रश्न : प्रचाराच्या दरम्यान तुम्हाला काही जाणवले का, इतर निवडणुकांत जसे होते तसे..

फमुं : नाही, ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले. जे प्रतिनिधी होते, तेही समंजस होते. मला जेव्हा मराठी साहित्य परिषदेतून कळवण्यात आले की तुमची निवड झाली आहे तर मी पहिल्यांदा सातार्‍याचे अरुण गोडबोले आहेत, त्यांना मी दादा म्हणतो, त्यांचे आशीर्वाद घेतले. माझ्या दृष्टीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी भाषेचा अखिल भारतीय वार्षिक उत्सव असतो. तो दरवर्षी होत असतो; पण आयुष्याचे ऋणानुबंध एका निवडणुकीने, एका प्रक्रि येने जर संपत असतील तर माझ्या दृष्टीने त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी पत्र लिहितानासुद्धा आपलं पहिल्या पसंतीचं मत माझ्या नावे नोंदवून मला जन्माचं उपकृत करावे, असे म्हटले. माणसाला माणसाकडं माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी दिली. ज्ञानेश्वरांनी दिली, सर्मथांनी दिली, म्हणजे संतांनी ही दृष्टी दिली. एकूण या सगळ्याच्या पलीकडे माणूस म्हणून एक अस्तित्व असतं या दृष्टीने मी सगळ्याकडे पाहत आलो. त्यामुळे कुठे कटुता नाही किंवा चुकूनसुद्धा अपशब्द नाही. मला असे विचारले की, राज ठाकरे म्हणाले की, ज्याच्या पुस्तकांचा जास्त खप तो अध्यक्ष झाला पाहिजे. तुमचे मत काय ..मी म्हणालो, प्रक्रियेसंबंधी वेगवेगळी मते असू शकतात; पण राज ठाकरे यांची ही प्रतिक्रिया म्हणजे माझ्यासंबंधी व्यक्त केलेली सद्भावना आहे, असे मला वाटते. त्याचे कारण असे आहे की माझी कवितांची पुस्तके असूनसुद्धा खूप वाचली जातात, विकली जातात. म्हणून अध्यक्ष झाला आहे. मी राज ठाकरे यांचा खूप आभारी आहे.

प्रश्न : यंदाच्या निवडणुकीत वाद झाले नाहीत. ते तुमच्या स्वभावामुळे का?

फमुं : माझं समजून घेणं फार महत्त्वाचं. पाडगावकरांनी कवितेत म्हटले आहे की, ग्लासातील अर्धे पाणी कसे पाहता यावर सारे अवलंबून आहे. अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते आणि अर्धा सरला आहे, असेही. तर मी भरल्या अंगाने सगळे वागत आलो. त्यामुळे कसला वादच नाही.

प्रश्न : साहित्यात कंपूशाही आहे, असे आपण नेहमी ऐकतो. तुम्हाला काय अनुभव आला?

फमुं : मी तर असे म्हणतो की, साहित्यात जेवढे राजकारण आहे, म्हणजे मी अनुभवत आलो तेवढे सत्तेच्या राजकारणात नसेल, असा अनुभव येत असतो. कंपूशाही सगळीकडेच असते. आपण ते समजून घ्यायचं की, हे असंच असतं. पण हे असंच असतं त्या पलीकडेही काही असू शकते या भूमिकेतून मी हिंडलो, फिरलो, लोकांना भेटलो. सगळ्यांनी आनंदाने स्वागतही केले आणि प्रेमही दिले. कुणाच्या तरी एकाच्याच वाट्याला सन्मान येणार. कुणाच्याही वाट्याला आला तरी त्याने काही फरक पडत नाही. मी माझा सन्मान आईला सर्मपित केला. आईऐवजी एक व्यापक शब्द आहे जन्मदा. जगातील सगळ्या जन्मदांना मी हा सन्मान सर्मपित केला. आणि जे उन्हातच होते त्यांच्यासाठी धावली अशी बाबासाहेब आंबेडकर ही सामाजिक स्वरूपातील आईच आहे, त्यांना मी हा सन्मान अर्पण करतो. हा सगळ्यांचाच आहे. एक निमित्त कुणाच्या तरी नावाने होत असते; पण जर आपल्या नावाला धरून बसलो तर समाजाला न आवडणारे, आपल्याला न आवडणारे अहंकार निर्माण होतात. अहंकाराच्या पलीकडे जाऊन मी फिरलो, वागलो, लिहीतही आलो.

प्रश्न : तुम्ही कधी तुमचा ग्रुप करायचा प्रयत्न केला नाही का?

फमुं : कधीच नाही. गरजही नाही. ते ग्रुप ग्रामपंचायतीपुरते ठीक आहे. आपण प्रतिभेचे आहोत, प्रशासनाचे नाहीत. आणि प्रतिभेला कुठल्याही ग्रुपची गरज असत नाही. मी सगळ्या प्रदेशांचा आहे. त्यामुळे मी तसा कधीही प्रयत्न केला नाही. मी नवीन लेखकांवर प्रेम करीत आलो. मी नेहमी म्हणत आलो, तरुण मुले म्हणजे लेकरे जर उत्तम लिहीत असतील तरच ज्याला मी लेकरू म्हणतो, लेखक म्हणतो त्याच्यामुळेच बापाची प्रतिमा मोठी होते. बाप स्वत:मुळे मोठा होत नाही. त्यामुळे जवळपास 500 पुस्तकांना मी ब्लर्ब लिहिलं आहे. त्याला आपण पाठराखण म्हणतो. मी त्याला पाठराखण नाही, तर पदर म्हणतो. कारण डोक्यावरचा पदर हेच वैभव असतं आणि पदर पाठीवर पडलेला असतो. त्यांच्या लेखनातला पदर लक्षात घेऊनच मी लिहितो. एक ब्लर्ब दुसर्‍यासारखा नाही. कारण ते लिहिताना लेखकाची प्रतिभा पाहून त्याची भूमी काय आहे आणि भूमिका काय आहे हे पाहून मी लिहिले. मला नवीन मुलाचे लेखनसुद्धा खूप आवडते.

प्रश्न : संमेलनाध्यक्ष झाल्यावर तुम्हाला तुमच्यावरील जबाबदारीत काय वाढ झालीय असे वाटते?

फमुं : काही लोक मला म्हणाले की, तुम्ही आता कसे बोलणार? मी म्हणालो, पूर्वीचेच जे गमतीचे बोलणे आहे ते मी आता गांभीर्याने मांडणार आहे. कारण ती एक शैली आहे. गांभीर्याची गंगोत्री गमतीतूनच जात असते. तुम्ही ज्याला गंमत म्हणता ती गंमत नसतेच मुळामध्ये. फक्त तुम्ही समजून घेतले पाहिजे की, हे काय आहे. सातत्याने समजून घेतले पाहिजे.

प्रश्न : तुम्ही असे म्हणालात की, मी आता भूमिका मांडणार आहे. साहित्यिकांवर असा ठपका आहे की ते भूमिका मांडत नाहीत. दाभोलकरांपासून इतर मुद्दय़ांवर भूमिका मांडणार काय?

फमुं : मला आता लिखित आणि मौखिक अशा दोन्ही परंपरा अनुभवायला मिळतील. मला जे मांडायचे आहे ते मी लोकांना देणारच आहे; पण मी हातात कागद न घेता बोलणार आहे. भाषण वाचून दाखवणार नाही. मी सर्व विषयांवर बोलेन. नरेंद्र दाभोलकर हा माझा अरे-तुरेचा मित्र. मी म्हटले, असे का घडले, याचे उत्तर हवे असेल तर आधी आपल्या भारतीयांची नैतिकता तपासून पाहायला हवी. नैतिकतेच्या अंगानेसुद्धा मला ते मांडावे लागेल. अनेक घटनांच्या संदर्भात. ते मी मांडणार आहे.

प्रश्न : पण साहित्यिक भूमिका का घेत नाहीत?

फमुं : भूमिका घ्यायला पाहिजे. मला विचारले, तुम्ही आंदोलनात भाग घेणार का, तर मी म्हणालो, मी चळवळीतला माणूस आहे. मला त्यात नवीन काही नाही. नामांतरापासून अनेक सामाजिक चळवळींपर्यंत आम्ही चळवळीतूनच आलो आहोत. चळवळ हेसुद्धा एक चैतन्य आहे. भूमिका घ्यायला पाहिजे. कोषात अडकल्यासारखे वाटतात, असेही पुष्कळ ठिकाणी आहे. आम्ही नाहीत आणि ते कोषात अडकले आहेत अशी टीकासुद्धा नाही करत. आणि टीका न करतासुद्धा समाज सर्वांना ओळखून असतो. तो कोणत्या भूमीवर आहे, कोणत्या भूमिकेने आणि धारणेने लेखन करतो हे लोक ओळखतात. योग्य वेळी आपले अभिप्राय देत असतात. सगळेच कविता लिहीत नसतात; पण मी असे पाहिलेले आहे की न लिहिणारी माणसे मनाने फार मोठी आहेत. आम्ही लिहितो, एकमेकांच्या लेखनासंबंधी बोलतो; पण मनाचा मोठेपणा घेऊन अभिप्राय देऊ याची खात्री नाही. म्हणून सत्तेतले राजकारण परवडले; साहित्यातले नको, असाही अनुभव अनेकदा येतो. आणि मी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन सांगतो, एक कविता लिहिली की मी तिथे दोन-पाच वर्षे अडकून पडत नाही. मी नेहमी सांगतो, मी कविता लिहिली हे तर तुम्हाला वाचता येईल; पण ज्या कागदावर कविता लिहिली त्याच्या पाठीमागचा कागद कोरा असतो. कोरा कागद ज्याला वाचता येतो तोच पुढच्या कवितेकडे जाऊ शकतो. अक्षराचा तर कुणीही अनुभव घेऊ शकतो. पाठमोरी व्यक्ती, पाठकोरा कागद ज्याला वाचता येतो त्याचे मन नेहमी प्रसन्न असते. त्या प्रसन्न मनाने मी जगत आलो. त्या प्रसन्न मनानेच मी गंभीर कविता लिहीत आलो. गांभीर्यालासुद्धा प्रसन्नता खूप आवश्यक असते. आणि शेवटी गांभीर्य म्हणजे तरी काय आहे? तुम्ही जमिनीवर आहात की नाही, याच्यावर गांभीर्य अवलंबून असते. नाही तर आपल्याकडे हवेत गोळीबार पोलिसही करतात आणि वक्तेही करतात. लेखनातून अनेक लेखकही करतात. त्याने काही होत नाही. मी गेल्या चाळीस वर्षांपासून ठिकठिकाणी माझ्या कविता घेऊन लोकांसमोर जातो. अनेक कविसंमेलनांमध्ये इतरही कवी त्यात सहभागी असतात. रामदास फुटाणे आहेत, नायगावकर आहेत. 35-40 हजारांच्या उपस्थितीसमोर आम्ही कविसंमेलने करतो. दहा लोकांच्या समोरही कविसंमेलने करतो. त्याला दहा लोक आहेत की 35 हजार याची कधी चिंता वाटली नाही. सार्थकता मी अनुभवत आलो.

प्रश्न : संमेलने चंगळवादी, असे तुम्ही म्हणालात..

फमुं : मी चंगळवाद हा शब्द वापरला नाही. मीडियाने विचारले की, साहित्य संमेलने खर्चिक होत आहेत, तुमचा अभिप्राय काय? मी म्हणालो, ती जर कमी खर्चात साधेपणाने झाली तर हवीच आहेत; पण इतका खर्च वाढला आहे आणि हा मराठीचा वार्षिक सोहळा आहे, तो थाटात झाला तरी हरकत नाही. मला असे वाटते, लेखक साहित्यिकाने हा जर मराठीचा वार्षिक महोत्सव असेल आणि मी जर मराठीचा असेल तर आपल्या खर्चाने आले पाहिजे; पण येत नाही. आम्ही मानधन घेतल्याशिवाय, राहण्या-जेवण्याची उत्तम बडदास्त झाल्याशिवाय जात नाही, इतकेच मी बोललो. चंगळवाद हे इंटरप्रिटेशन केले गेले. चंगळवाद हा जीवनशैलीचा भाग असतो. तो सगळ्यांच्याच जीवनशैलीचा भाग असतो. हा मी वापरलेला शब्द नाही. साहित्यातील चंगळवाद बाजूला राहून मूलत: चंगळवाद काय आहे त्यावरच चर्चा झाली.

प्रश्न : येणारा काळ निवडणुकीचा आहे. संमेलनावर राजकीय छाया असेल, अशा परिस्थितीत तुमची भूमिका काय?

फमुं : मी पुढार्‍यांकडे, राजकीय नेत्यांकडे माणूस म्हणून पाहतो. मी कोणतीही अस्पृश्यता पाळत नाही. मग साहित्य संमेलनात सत्ताधारी असावेत की नसावेत, याला महत्त्व नाही. त्याला रसिकता असते, त्याचे लग्न होते, त्याला मुलेबाळे होतात आणि तोही कधी एकांतात रडत असेलच की. मग तुम्ही माणूस या नात्याने पाहिले की साहित्यप्रेमी, वाचक या नात्याने राजकारणातल्या माणसानेही उपस्थित राहिले पाहिजे. बहुतेक वेळा आपण असे पाहतो की आयोजक संस्था, संस्थेशी संबंधित मंडळी राजकीय असतात. ज्याला आपण सत्ता म्हणतो ती समाजाने दिलेलीच एक गोष्ट आहे. संमेलन ही साहित्यिक, वाड्मयीन घटना तर आहेच; पण मी संमेलनाला सामाजिक घटना समजतो. समाज आणि साहित्य याचे जवळचे नाते आहे. किंबहुना आधी समाज आहे म्हणून साहित्य आहे. साहित्य नंतर आले. साहित्याने काही समाज तयार केलेला नाही. समाजातून प्रेरणा घेऊन आम्ही लिहितो, सगळे करतो. सत्ताधारी असो, विरोधी पक्षातील असो, ही समाजात राहणारी माणसेच आहेत ना. आपण मतदान करतो, एक सामाजिक घटना म्हणून करतो; राजकीय घटना म्हणून करीत नाही. जोपर्यंत गांधीछाप येत नाही तोपर्यंत माणसे जर मतदानाला जात नसतील तर लोकशाहीमध्ये आपणच कानकोंडले आहोत. स्वातंत्र्य हे नेहमी सत्तेच्या वर असले पाहिजे; पण तसा अनुभव येत नाही. गोरगरिबांना दिले फक्त भय, स्वातंत्र्याचे वय वाढताना. असा आम्ही अभंग लिहिला आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितले की, स्वातंत्र्यही कसे दहशतीखाली.. वाहते पखाली सत्तेच्या.. स्वातंत्र्याने सत्तेच्या पखाली वाहायला सुरुवात केली की लोकशाही धोक्यात येते; पण आपल्याकडे चांगले नेतृत्व आपण पाहिले आहे. आपण असेही पाहिले की, इंग्रजांच्या काळात माणूस जेवढा निर्भय होता त्याच्या शतपटीने स्वातंत्र्यात भयभीत झाला आहे. या निर्भयतेच्या पाठीमागे जे उभे आहेत ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांनीही संमेलनात सहभागी झाले पाहिजे.

प्रश्न : तुमच्या जीवनातील ही दुसरी निवडणूक..

फमुं : हो, मी एकदा राजकीय निवडणूक लढवली आहे. मी अपक्ष उभा होतो. मला बापू काळदाते म्हणाले, मी तुला तिकीट देतो. जनता दलाचा उमेदवार झालो. राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार असल्याने मतदार याद्यांसाठीचे पाच हजार रुपये वाचले. मी बापूंना म्हणालो, मी निवडून नाही येणार. मला फिरायचंय. ते म्हणाले, फिरायला निवडणुकीचे निमित्त का? तर आपल्याकडे निमित्त लागत असते. लग्न तर करायचंच बायकोशी; पण मग प्रेमाचं निमित्त लागतं तसं. मी सगळ्या गावांत फिरलो. माझी ही भली मोठी पोस्टर्स लागली. लोकांना वाटले की, हा आल्यातच जमा आहे; मला जाणीव होती. त्या सालात जनता दलाच्या इतर उमेदवारांचे झाले तेच माझे झाले; पण मी आनंद घेतला त्याचा. लोक म्हणायचे, तुम्हाला टेन्शन कसे येत नाही? मी म्हणायचो, निवडून येण्याच्या वाईट हेतूने मी उभा राहिलेलो नाही; पण त्या वेळी माणसे पाहता आली. लोकशाही काय आहे, तिचे अधिष्ठान काय हे पाहता आले, हा एक अनुभव वेगळा होता. त्याचे एक पुस्तक लिहितोय.