आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview Of MLA Satish Chavan At Divya Marathi Office

युतीला समांतरमध्ये नव्हे, फक्त टेंडरमध्येच इंटरेस्ट - आमदार सतिश चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीम दिव्य मराठी - शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीला समांतर जलवाहिनीशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना फक्त टेंडरमध्येच इंटरेस्ट आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचा मराठवाड्यातील चेहरा, पदवीधर मतदारसंघातील आमदार सतीश चव्हाण यांनी केला. ‘दिव्य मराठी’च्या ‘गप्पा डावपेचांच्या’ या सदरात चव्हाण त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. प्रत्येक प्रश्नाचे थेट उत्तर देत आपण स्वभावाने फटकळ नसून स्पष्टवक्ते आहोत, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

दत्ता सांगळे - तुमची सत्ता आल्यास समांतरचे भवितव्य काय असेल ? रद्द होईल की कसे ?
चव्हाण-
समांतर अजिबात रद्द होणार नाही. नागरिकांना पाणी हवे आहे. त्यामुळे ती होणारच. ठेकेदार नव्हे, तर महानगरपालिकेकडे पैसे नाहीत. त्यामुळे ही योजना ताब्यात घेऊन राज्य शासनाने त्यात पैसे ओतून नागरिकांवरील भार कमी करावा. पालिकेकडे प्लंबरही नाहीत की साधा पूल बांधू शकतील असे अभियंतेही नाहीत. त्यामुळे त्यांच्या भरवशावर ही योजना होऊ शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत समांतरचे काय झाले, याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी. योजना तातडीने व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील.
शेखर मगर - योजना का लांबली असे वाटते ?
चव्हाण-
मुळात या योजनेत युती किंवा जो कोणी नेता ही योजना माझी आहे, असा दावा करतो, त्यांना अजिबात देणेघेणे नाही. त्यांचा इंटरेस्ट फक्त टेंडर काढण्यात आहे. त्यामुळेच २००५ पासून ही योजना होऊ शकली नाही. टेंडर काढले की त्यांचे काम होते. त्यामुळे त्यांना प्रकल्प पूर्ण व्हावा, असे वाटतच नाही. प्रत्यक्षात ही योजना चांगली असल्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. केंद्राबरोबरच राज्याचा निधीही उपलब्ध करून दिला. गेल्या पाच वर्षांपासून महानगरपालिका याचे व्याज खातेय.
मंदार जोशी - ही योजना त्यांनी पूर्ण करून दाखवल्यास योजनेला खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव देता येईल ?
चव्हाण-
अगदी. मीच तशी मागणी करीन. कारण शहरवासीयांना पाणी हवे आहे.
सतीश वैराळकर- तुम्ही समांतरवर केवळ विरोधक म्हणून आगपाखड करता ?
चव्हाण- अजिबात नाही. आम्ही विरोधात आहोत आणि जे चुकतेय ते जनतेसमोर आणणे हे आमचे काम आहे. या योजनेत इतक्या अनियमितता झाल्या आहेत की सेना-भाजपची युती झाली नसती तर भाजपने याच मुद्द्याला पुढे केले असते. समांतरचा करार बदलण्यात आल्याचे तत्कालीन महापौर तथा भाजपच्या बड्या पदाधिकारी विजया रहाटकर यांनी जाहीरपणे सांगितले तरीही कोणी काही बोलत नाही. आम्ही तर बोलणारच. समांतरची एक श्वेतपत्रिका जारी करावी किंवा एक पत्र तरी प्रशासनाने जाहीर केले पाहिजे. कोठे काय चुकले, का विलंब झाला, २०२० मध्ये पाणीपट्टी किती असेल, प्रकल्पाचा वाढता खर्च पालिका देणार की पुन्हा पाणीपट्टी वाढणार, या गोष्टी जाहीर केल्या पाहिजेत.


संतोष देशमुख - युतीला रोखण्यासाठी तुम्ही काँग्रेससोबत आघाडी का केली नाही ?
चव्हाण-
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी व्हावी ही आमची मनोमन इच्छा होती. आमच्या नेत्यांनीही तसे आदेश दिले होते; परंतु काँग्रेसची इच्छा दिसली नाही. आम्ही रीतसर प्रस्ताव काँग्रेसकडे दिला होता. वरिष्ठांशी चर्चा करून कळवतो, असे त्यांनी सांगितले. मी व्यक्तिश: वारंवार पाठपुरावा केला; पण अर्ज भरण्याची मुदत थोडी राहिली असतानाही निरोप न आल्याने मी उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला. कारण कार्यकर्त्यांची घालमेल वाढली होती. ८ जागांवर दोन्हीही पक्षांकडे तगडे उमेदवार होते. त्यावर निर्णय होत नव्हता. तेव्हा तेथे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता; परंतु त्यावर अजूनही प्रतिसाद मिळाला नाही.
हरेंद्र केंदाळे-आघाडी न होण्यामागे स्थानिक राजकारण आहे काय, काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व अपरिपक्व आहे, असे वाटते का?
चव्हाण-
काँग्रेसच्या नेतृत्वावर बोलण्याचा मला अधिकार नाही; पण वरिष्ठांशी ते बोलत होते, असे समजते. राहिला स्थानिक राजकारणाचा विषय, तर तसे काही असू शकेल, पण ते मला माहिती नाही.
परवेज खान - प्रत्येक वेळी तुम्ही डाव जिंकले आहेत. या वेळी हरलात, असे वाटत नाही का?
चव्हाण-
अजिबात नाही. डाव जिंकण्याचा अन् हरण्याचा प्रश्न नाही.
दीपक पटवे - तुमच्यात आघाडी न झाल्याने युतीला फायदा होईल, असे वाटत नाही का ?
चव्हाण-
आम्ही स्वतंत्र लढत असल्याचा फायदा युतीला काही ठिकाणी नक्कीच होईल, यात शंका नाही; परंतु युतीतही सर्व काही आलबेल आहे, असे नाही. शिवसेनेला सुटलेल्या वॉर्डांत भाजपचे, तर भाजपला सुटलेल्या वॉर्डात शिवसेनेचे बंडखोर आहेत. त्यामुळे अशा १५ ते २० ठिकाणी आम्हालाच फायदा होईल.
दत्ता सांगळे- राष्ट्रवादीचे नेमके किती उमेदवार रिंगणात आहेत ?
चव्हाण-
आमचे अधिकृत ७६ उमेदवार रिंगणात आहेत. अन्य ठिकाणी आम्ही अन्य अपक्षांना पुरस्कृत करतोय. त्याची यादी आम्ही दोन दिवसांत जाहीर करू. आमच्या किमान ४० जागा येतील.
हरेंद्र केंदाळे- काँग्रेस स्वबळावर निवडून येण्याचा दावा करतेय...
चव्हाण- माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही ४० जागा जिंकू हे मी सांगू शकतो. आम्ही केलेल्या सर्व्हेतही तसेच चित्र दिसले.
विद्या गावंडे - पाठिंबा देण्याची वेळ आली तर कोणाला सोबत घ्याल किंवा जाल ?
चव्हाण-
आघाडी झाली असती तर आम्ही १०० टक्के सत्ता मिळवली असती. एकत्र न लढल्याचे काही तोटे नक्कीच आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी शक्तींसोबत आम्ही जाणार नाहीत. समविचारी पक्षासोबतच राहू. अंतिम निर्णय श्रेष्ठी घेतील.
शेखर मगर - एवढ्या मोठ्या पक्षाला ११३ उमेदवार का नाही मिळू शकले ?
चव्हाण-
येथे २५ वर्षांपासून युती सत्तेवर आहे. कार्यकर्त्यांचे रोज पालिकेत काम पडते. शहरात आमच्या पक्षाचा आमदार नाही. मला मर्यादा पडतात. त्यामुळे ज्यांच्याकडे काम असते त्यांच्यासोबत राहण्याचा कार्यकर्त्यांचा कल असतो. त्यामुळे आमचे कार्यकर्ते कमी आहेत. आमची पक्षबांधणी काहीशी विस्कळीत झाले हे मी मान्य करतो. त्याचबरोबर ताकद असेल तेथेच लढा, असे आम्ही ठरवले होते. विधानसभेला सर्व ठिकाणी लढलो. काही ठिकाणी आमच्या उमेदवाराला चार हजारांपर्यंतच मते मिळाली. त्यामुळे ताकद उगाच खर्च न करता निवडून येणाऱ्याच जागा लढाव्यात, असे आम्ही ठरवले.
सतीश वैराळकर - राष्ट्रवादीचे चिन्ह नको, असे म्हणत तुमचेच कार्यकर्ते अपक्ष लढले, त्याचे काय?
चव्हाण-
अशी एखाद दुसरी केस असेल. तुमचा रोख काशीनाथ कोकाटे यांच्याकडे आहे, असे दिसते.
सतीश वैराळकर - त्यांनी विधानसभेला काँग्रेसचे काम केले. आता राष्ट्रवादी बदनाम झाल्यामुळे घड्याळ नको, असे ते म्हणतात..
चव्हाण-
महानगरपालिकेत राष्ट्रवादी बदनाम झाली, असे वाटत असेल तर नगरसेवक म्हणून त्यांनीच बदनाम केली, असे म्हणावे लागेल. काँग्रेस उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्याशी वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यांनी विधानसभेला त्यांचे काम केले. आम्ही त्याकडेही दुर्लक्ष केले. आता ते आमच्याकडे मुलाखतीला आले. आम्ही त्यांना बी फॉर्मही दिला. त्यानंतरही ते अपक्ष लढले. आम्ही त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागवले आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांनी आमच्या पक्षाचे नाव वापरू नये, असे अपेक्षित आहे.
दत्ता सांगळे - १५ वर्षे राज्यात सत्ता असतानाही तुम्हाला मनपात करिष्मा का दाखवता आला नाही?
चव्हाण-
शहरात जातीयवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आम्ही काहीसे मागे पडलो. लोक धर्माच्या नावावर मतदान करतात, याची खंत वाटते. शेवटच्या दोन दिवसांत धार्मिक वातावरण बिघडवले जाते अन् नागरिकही विकास विसरून मतदान करतात. त्यामुळे आताही शेवटच्या दोन दिवसांत शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही.
शेखर मगर - तुमचेच कार्यकर्ते ऐनवेळी तुम्हाला सोडून दुसऱ्या पक्षाकडून लढले. तुम्हाला कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत काय ?
चव्हाण-
याला खूप कंगोरे आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या वॉर्डांत मी आमदार निधीतून काम केले. तेव्हा निवडणूक आमच्या डोक्यात नव्हती. त्यातून काही कार्यकर्ते मोठे झाले; पण ऐनवेळी काहींनी भाजपकडून उमेदवारी मिळवली. याचा मी अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की, हे कार्यकर्ते वयाने लहान आहेत, ही मंडळी विचाराची कास धरत नाही. पक्षनिष्ठा त्यांच्याकडे कमी आहे, हे त्याचे उदाहरण आहे. या वेळी तुम्ही बघाल की सेना व भाजपमध्येही असेच झाले आहे.
विद्या गावंडे - पदवीधर निवडणुकीत तुम्ही मोदी लाट थोपवली, मनपात त्याची पुनरावृत्ती होणार?
चव्हाण-
हे दोन्हीही मतदारसंघ किंवा निवडणुका टोकाच्या आहेत. लहान निवडणूक ही नेहमीच अवघड असते. येथे मुद्दे वेगळे असतात. सहा वर्षांत मी प्रत्येक आश्वासन पाळले. त्यामुळे मला मतदारांनी पुन्हा पसंती दिली. माझा माझ्या कामावर विश्वास होता. काम केल्याची पावती मला मतदारांनी दिली. राहिला महानगरपालिकेचा विषय, तर येथे आम्हाला मतदारांनी काम करण्याची संधीच दिली नाही. तरीही शहरातील तीन उड्डाणपूल उभारण्यासाठी मी पाठपुरावा केला. रस्त्यांसाठी विशेष बाब म्हणून २५ कोटी रुपये आणले. घाटी रुग्णालयासाठी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. खाम नदीवरील तीन पुलांसाठी २२ कोटी रुपये मंजूर करून दिले; पण पुढे महानगरपालिकेने अजिबात पाठपुरावा केला नाही. त्यामुळे राज्य शासन जे करू शकते, तेवढे मी केले. समांतर, ड्रेनेजलाइन यासाठी केंद्र व राज्याने निधी दिला; पण काही करण्याची येथील सत्ताधाऱ्यांची इच्छा नसल्यामुळे आम्ही काय करणार?
हरेंद्र केंदाळे- अनेक कामे तुम्ही केली, मग मार्केटिंगमध्ये कमी पडलात?
चव्हाण-
तसेही नाही. येथे फक्त जातीपातीचे राजकारण चालते. भावना भडकावल्या जातात. अफवा पसरवून दोन समाजांत तेढ निर्माण केली जाते. त्याची किमत औरंगाबादकर मोजताहेत. पिण्यास पाणी नाही, रस्ते नाहीत. शहर बकाल झालेय.
सुरेश पाटील - एमआयएममुळे तुमची व्होट बँक हातून गेली...
उत्तर-
मुळात हा शब्दच चुकीचा आहे. एमआयएम हा विधानसभा निवडणुकीत एक अपघात होता. यापूर्वी मुस्लिम लीगनेही असेच केले होते; परंतु ते टिकले नाहीत. आतापर्यंत मतांच्या ध्रुवीकरणाचा युतीला फायदा होत होता. या वेळी तो एमआयएमला झाला. त्यामुळे आमचा जनाधार काहीसा कमी झाला. मात्र, एमआयएमचे खरे रूप आता समोर आले आहे. त्यांचे अनेक कार्यकर्ते आमच्याकडून लढताहेत. एमआयएमचे प्राबल्य ज्या २३ वॉर्डांत असल्याचे सांगितले जाते तेथे आमचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून येतील.
दत्ता सांगळे - आता तुमच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत, परंतु तुम्ही खूपच फटकळ वागता असे बोलले जाते...
चव्हाण-
असे कोण म्हणतो? मी खरे बोलतो, लोकांना तसे वाटते. त्याला मी काही करू शकत नाही. माझ्याकडे आलेल्या प्रत्येकाला मी स्पष्ट काय ते सांगतो. काम होणार असेल तर हो, नाही तर नाही. पाणी लावत किंवा गोड बोलत बसत नाही. आपल्याकडे अनेक नेते फक्त गोड बोलतात. काम करत नाहीत. मी गोड बोलत नाही, काम करतो. आपल्या जिल्ह्यातील एक नेते तर गेली २५ वर्षे फक्त गोडच बोलताहेत. एकही काम त्यांनी केलेले दिसत नाही. मी कार्यकर्त्यांची कदर करतो. त्यांना योग्य ते सांगतो. त्यामुळे तुम्ही फटकळ म्हणा किंवा आणखी काही. मी माझ्या पद्धतीने काम करत राहणार.
महेश देशमुख - शरद पवारांनी सर्वांना संधी दिली; पण खास करून आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही...
चव्हाण-
संधी देणे हे साहेबांचे काम, तर तिचे सोने करणे हे कार्यकर्त्याचे काम. त्यामुळे काय झाले, काय झाले नाही, हे मी सांगू शकत नाही.
संतोष देशमुख - पदवीधरची निवडणूक डोळ्यासमोर असताना मराठवाडा प्रसारक मंडळ ताब्यात घेण्याची रिस्क का घ्यावीशी वाटली ?
चव्हाण-
रिस्क वगैरे काही नव्हते. सदस्यांची तशी इच्छा होती. कार्यकर्ते म्हणाले की लढावे लागते. लढलो. त्यात कसली रिस्क?
शेखर मगर - त्यामुळे मधुकरराव मुळे तुमच्यापासून दूर गेले...
चव्हाण-
त्या आधीच्या निवडणुकीत ते माझ्यासोबत होते तेव्हा चौथ्या फेरीत ३ हजार मतांनी जिंकलो. या वेळी ते दूर होते तर पहिल्याच फेरीत १६ हजार मतांनी जिंकलो. मुळे हे मास लीडर आहेत का?
रोशनी शिंपी - शहर विकासाची काही ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे काय ?
चव्हाण-
वेगळ्या ब्ल्यू प्रिंटची काय गरज? हे शहर पर्यटननगरी होते, नंतर औद्योगिक नगरी झाले, आता शिक्षणनगरी होतेय. पण येथे मूलभूत सुविधा तरी आहेत का? लोकांना मूलभूत सुविधा हव्या आहेत. मुले, कामगारांना ये-जा करण्यासाठी सिटी बसही येथे नाहीत. रस्ते नाहीत. मनपाने काय केले, असे विचारले तर उत्तर काहीच नाही, असे समोर येते. मूलभूत सुविधा देणे हे मनपाचे काम. निकषाचा विचार केला तर मनपाला शून्य मार्क मिळतील. मूलभूत सुविधा देणे हे पालिकेचे प्रथम कर्तव्य आहे, ते आधी आम्ही करू.
विद्या गावंडे - तुम्ही एक चांगले प्लॅनर आहात. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली तर तुम्ही लक्ष देणार का?
चव्हाण-
नक्कीच. मी मूलभूत सुविधा देण्याकडे लक्ष देईन. केंद्र तसेच राज्य सरकारकडे असलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेईन. पाच वर्षांत शहरवासीयांना मूलभूत सर्व सुविधा मिळतील हे नक्कीच बघेन.
पुढील स्लाईडवर वाचा, सतिश चव्हाण यांची इतर मते...