आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत - पाण्याचे आधी पैसे भरण्यात गैर काहीच नाही, नीलम गोऱ्हे यांचा औरंगाबादकरांना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी आधी पैसे देतो. दूध, फोन, वृत्तपत्र यासाठी आधी आपण पैसे देतो मग समांतरला आधी पैसे भरण्यात गैर काहीच नाही. लोक पैसे देतात तेव्हा त्यांना विश्वास असताे की आपल्याला सेवा मिळणार आहे. सेना-भाजपवर इतकी वर्षे औरंगाबादकरांनी विश्वास दाखवला आहे. तेव्हा आताही दाखवावा आणि समांतर योजना सुरू होण्याआधी पाणीपट्टी वसुली होत आहे, ती नि:संकोचपणे द्यावी, असे मत शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात आल्या असताना "दिव्य मराठी' प्रतिनिधीला दिलेल्या खास मुलाखतीत त्या बोलत होत्या. समांतर योजना करणे फक्त महानगरपालिकेचे दायित्त्व नाही तर राज्य सरकारनेही त्यात लक्ष घालून, ती पूर्ण करण्यासाठी बळ द्यायला हवे होते असे मत त्यांनी व्यक्त केले. औरंगाबाद मनपा युतीच्या हातात असली तरीही राज्य आणि केंद्रात आमची सत्ता नव्हती. आता मात्र केंद्रात, राज्यात आमचे सरकार आहे, त्यामुळे योजना यशस्वी होईल. याशिवाय जनतेने आपल्यापुरता विचार करता थोडा वैश्विक विचार करायला हवा. कारण सोलापूर किंवा इतर महानगरपालिकांमध्येही पाण्याचा प्रश्न आहेच. प्रत्येक ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महिलांच्यासुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा : फक्तहिंदू महिलाच नव्हे तर मुस्लिम महिलांच्यादेखील सुरक्षेचा प्रश्न आहे. मुस्लिम महिलांचे हक्क आणि सुरक्षा याबद्दल कुणीच काही बोलत नाही. एमआयएमनेही याबद्दल शब्द काढला नाही.

नहर अंबरीचे पुनरुज्जीवन
औरंगाबादेतनहर अंबरीसारखा महत्त्वाचा पाण्याचा स्रोत आहे. त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार व्हायला हवा. आगामी काळात शहरात मोठमोठे प्रकल्प येत आहे, शहर वाढणार आहे, विकास होईल तेव्हा समांतरचे पाणीही कमी पडणार आहे. दूरदृष्टीने विकास योजना आखल्यास त्याचा फायदा होईल असेही त्या म्हणाल्या.

पदाधिकाऱ्यांना मुद्दाम डावलले नाही
कुठल्याहीपक्षाची सत्ता यायची असेल तर उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. महिला पदाधिकारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचे योगदान जरूर आहे, पण परिसरातील जनसंपर्क, समस्यांची माहिती, विश्वासाचे वातावरण, विकास या सर्व कामांचा विचार करून तिकीट दिले जाते. ज्या काही गृहिणींना तिकीट देण्यात आले आहे, त्यांना राजकारणाची माहिती नाही असे म्हणता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण हे घरातून सुरू होते.