आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम-शिवसेना दोन्हींचा औरंगाबादच्या विकासाला धोकाच - भारिप नेते रमेशभाई खंडागळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमआयएम आणि जुनी शिवसेना या दोन्हीही पक्षांपासून शहराला धोका आहे. त्यामुळे आम्ही या दोघांनाही समान अंतरावर ठेवून आहोत, असे भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते रमेशभाई खंडागळे यांनी ‘दिव्य मराठी’च्या ‘गप्पा डावपेचां’च्या या सदरात बोलताना सांगितले. गरज पडल्यास आम्ही शिवसेनेला ऐनवेळी सत्तेसाठी टेकू देऊ पण एमआयएमला अजिबात नाही. कारण सेनेला स्थानिक प्रश्नांची थाेडीफार जाण आहे, असे प्रशस्तीपत्रही देण्यास ते विसरले नाहीत.

परवेज खान: एमआयएम हा पक्ष धार्मिक भावना भडकावून तणाव निर्माण करतोय का?
होय त्यांचे तेवढेच काम आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना सुरक्षित अंतरावर ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना फायदा होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतोय.
रोशनी शिंपी : तुम्ही कोणाला पाठिंबा द्याल?
ते निवडणुकीनंतर ठरेल. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही एमआयएमसारख्या पक्षांना पाठिंबा देणार नाही. वेळ पडल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊ. कारण स्थानिक समस्यांची त्यांना जाण आहे. त्यांना पाठिंबा देऊन वेसण लावण्याचे काम करू.
दत्ता सांगळे: एमआयएमने हैदराबादमध्ये दलित महापौर दिला?
सत्ता दिली पण परिवर्तनाचे काय. यापूर्वीही प्रा. जोगेंद्र कवाडे, हाजी मस्तान एकत्र आले होते. पण ते एक वर्षभरही टिकले नाही. एमआयएमचेही असेच होणार. सत्ता हे तात्पुरते साधन. मात्र अलीकडे ते साध्य झाल्याने फसगत होते.

हरेंद्र केंदाळे : तुमच्या पक्षाचा आवाज आता ऐकू येत नाही ?
आवाज कमी झाला असला तरी तो अगदीच क्षीण झाला, असे म्हणता येणार नाही. आमची चळवळ सुरू आहे. पद्धत बदलली हे मात्र खरे. बदलत्या राजकारणाबरोबरच आम्हीही आमचा ट्रॅक बदलतोय. अलीकडे कार्यकर्त्यांना सर्व काही इंस्टंट हवे आहे. मग सत्ता असो की पैसा त्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. आज, आत्ता, ताबडतोब असा प्रकार झाला.
श्रीकांत सराफ : असे का व्हावे?
ही शिवसेनेची देणगी आहे. त्यांनीच हा पायंडा पाडला. मी ज्या कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर आंदोलन करत होतो आज तो कोटींत खेळतो अन् मी आहे तेथेच आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्तेही त्याच वाटेने चालू लागले. नेतेच तसे वागू लागल्याने कार्यकर्तेही त्याच वाटेने निघाले अन् आता ही वहिवाट झाली. त्याला रोखण्याचे मोठे आव्हान आहे.
प्रवीण ब्रह्मपूरकर: याला फक्त तरुणच दोषी आहे, असे कसे म्हणता येईल?
नाही फक्त तरुणच जबाबदार आहे, असे कोणीही म्हणू शकत नाही. नेतेही तेवढेच जबाबदार आहेत.
विद्या गावंडे: बाळासाहेब आंबेडकर हे अभ्यासू नेते आहेत पण दलित त्यांच्या पाठीशी का नाहीत?
असे का झाले, याची आम्हालाही खंत आहे. मला वाटते यासाठी नेत्यांची मधली फळी कारणीभूत आहे. नेता जो संदेश देतो तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचता करण्याचे काम मधल्या फळीचे असते. ती फळी कमजोर राहिली. सक्षम फळी निर्माण करण्यात आम्हाला यश आले नाही. त्यामुळे असे घडले असावे.
सतीश वैराळकर : अकोला पॅटर्न अन्यत्र का राबवता आला नाही ?
त्याचेही उत्तर मधळी फळी हेच आहे. अकोल्यात बाळासाहेबांनी सात हजार सभा घेतल्या. प्रत्येकाशी संवाद साधला. त्यातून बाळासाहेब आपलेच बोलणे बोलताहेत असे मतदारांना वाटले. त्यामुळे यश आले. मात्र सत्तेत गेल्यानंतर आमच्या लोकप्रतिनिधींना चटक लागली अन् खेळ बिघडला.
भरत जाधव : रिपब्लिकन पक्ष कोणासोबतही जातात, म्हणून दलितांचा नेत्यांवरील विश्वास उडाला असे वाटत नाही का?
- तसे झाले हे खरे आहे. त्यामुळे पक्षांची वाताहत झाली. जे स्वत:च्या धोरणावर टिकून राहत नाहीत, ते पक्ष टिकत नाहीत, हे वास्तव आहे. पण आमचा पक्ष कोणाबरोबरही गेला नाही. आम्ही आमच्या धोरणावर स्वाभिमानाने टिकून राहिलो.
महेश देशमुख: तुमच्याकडून निवडून आलेले नंतर काँग्रेसकडे वळते झाले.
होय खरे आहे. मखराम पवार, भांडेसारखे आमचेच कार्यकर्ते पुढे काँग्रेसमध्ये गेले. कारण आम्ही सत्तेत येऊ शकतो, याची जाणीव शरद पवारांना झाली होती. त्यामुळे त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सत्तेची चटक लावून आपल्याकडे ओढून घेतले. आमच्या केराम नावाच्या कार्यकर्त्याची अक्षरश: खरेदी-विक्री झालेली आम्ही बघितली. १९९५ ला आम्ही एकत्रीकरणाचा प्रयोग केला. आमचे चार आमदार विजयी झाले होते. त्यांनाही काँग्रेसने सत्तेची चटक लावली. त्यानंतर आमच्या आमदारांची वाटचाल काँग्रेसच्याच दिशेने झाली. सत्तेत जाताना एक भान असले पाहिजे, ते आमच्याकडे नव्हते हे खरे.
सुमीत डोळे: तुमचा पक्ष रिडालोसोबत का गेला नाही?
आम्ही त्यांच्याबरोबर नव्हतो, असे म्हणता येणार नाही. त्यामुळेच १९९५ ला आमचे चार आमदार होते. २५ ठिकाणी आमचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, या प्रयोगामुळे पुन्हा एकदा शरद पवार सावध झाले आणि त्यांनी पुन्हा काडी केली. त्यांच्या फोडाफोडीमुळे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न झाले.

भरत जाधव : काँग्रेसने दलित पक्षांचे खच्चीकरण केले, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
अगदी बरोबर. काँग्रेसनेच दलित पक्षांना एकत्र नांदू दिले नाही. संधी मिळेल तेथे त्यांनी फोडाफोडी केली. मात्र त्याचा फटका आता त्यांनाच बसला. आता त्याचे परिणाम काँग्रेस व राष्ट्रवादी भोगताहेत.
सतीश वैराळकर : दलित पक्षांचे एकत्रीकरण न होण्यास कोण जबाबदार?
सर्व दलित पक्षांनी एकत्र यावे, अशी अनेकांची इच्छा होती. त्यासाठी वेळोवेळी प्रयत्न झाले पण प्रत्येक वेळी त्यात काँग्रेसने बिब्बा घातला. त्यामुळे एकत्र आलेले हे पक्ष दूर गेले.

मंदार जोशी : काँग्रेसचे सोडा, आठवले की आंबेडकर ?
आठवले यांचे धोरण कायम धरसोडीचे राहिले आहे. त्यामुळे एकत्रीकरणात कायम खोडा निर्माण झाला. त्यामुळे दलित ऐक्य न होण्यास आठवलेच जबाबदार आहेत.
दिनेश गुप्ता: बाळासाहेब फटकळ का वागतात ?
तो त्यांचा स्वभाव आहे. त्यावर मी काही बोलू शकत नाही किंवा काही करूही शकत नाही. यावर त्यांनीच आत्मपरीक्षण केले पाहिजे.
दत्ता सांगळे : राज्यात जाऊ द्या, शहरात तुम्ही युती का करत नाही?
शक्य नाही. गंगाधर गाडे आणि मी सोबत होतो. गाडे हे चळवळतील लढाऊ नेते आहेत. परंतु त्यांची चुळबुळ सुरू असते. ते कधीच ठाम राहत नाहीत. त्यामुळे विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतो. परिणामी त्यांच्याकडील कार्यकर्ते लगेच दुसऱ्याकडे जातात.
प्रवीण ब्रह्मपूरकर : या निवडणुकीत किती वाॅर्डांतून दलित उमेदवार निवडून येऊ शकतात?
आता तसे सांगणे अवघड आहे. झोपडपट्ट्या या दलितांचे बालेकिल्ले होते. मात्र, त्यानंतरच्या काळात स्थलांतर झाले. झोपडपट्ट्यांचे प्रश्नही मिटले. त्यामुळे एकगठ्ठा दलित मते आता मिळत नाहीत. त्यामुळे आपोआपच प्रभाव कमी झाल्याचे दिसते. पूर्वी मोर्चाला १० हजार लोक यायचे. आता एक हजारही येत नाही. त्यामुळे आम्हाला निदर्शनांवर भागवावे लागते. त्यामुळे नेमके किती वाॅर्ड दलित बहुल आहेत, हे सांगता येणार नाही.
मंदार जोशी: डॉ. आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेतले होते. तुम्ही तसे कधी करणार?
आम्ही तसे प्रयत्न करतो. येत्या काही दिवसांत त्याला यश आलेले दिसेल. कारण केवळ एका जातीवर पक्ष तग धरू शकत नाही. समान प्रश्न असलेले सर्व सोबत असायला हवे.
विद्या गावंडे: ओबीसी समाजाने मंडल आयोगाचा फायदा घेतला आता तेही तुमच्या सोबत नाहीत.
बरोबर. ओबीसी समाज हा कट्टर आहे, अगदी ब्राह्मण समाजापेक्षाही कट्टर. त्यांना मवाळ करून आमच्या सोबत घ्यावे लागेल. परंतु त्यांच्यातील अनेक जण दलित नेतृत्व मान्य करत नाहीत. अलीकडे बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्त्व त्यांच्यातील काही मान्य करू लागले आहेत.
परवेज खान : तुमच्याही पक्षात सोनसाखळ्या घालणारे कार्यकर्ते वाढलेत ?
होय, आमच्याकडेही सत्तेची लागण झाली. ते शिवसेना-भाजपकडून आलेले व्हायरल इन्फेक्शन आहे.
प्रवीण ब्रह्मपूरकर : पालिकेत तुमचे किती नगरसेवक निवडून येतील?
आम्ही औरंगाबाद बचाव मोर्चातून लढतोय. आमच्या वाट्याला १५ जागा आल्या आहेत. त्यातून किमान ५ नगरसेवक निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.

भरत जाधव: नरेंद्र जाधव म्हणाले मी संघ आणि दलितांमध्ये दुवा म्हणून काम करेन ?
हा आत्मघातकी विचार आहे. त्याला धाडसी म्हणता येईल पण तो शहाणपणाचा विचार नक्कीच नाही. संघाने कायम सोयीचे विचार पुढे केले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विज्ञानवादी विचार ते घेत नाहीत. त्यामुळे ते दलितांसाठी काही करतील, असे वाटत नाही.
दिनेश गुप्ता : वांद्रयाच्या निकालाचा काही परिणाम जाणवेल?
वांद्रयात एमआयएमची मते कमी झाली. तशी येथेही असणार आहे. फारसा परिणाम जाणवेल असे वाटत नाहीत.
सुमीत डोळे: शहराच्या प्रमुख समस्या काय ?
समांतर जलवाहिनी पूर्ण करणे, रस्ते आणि साफसफाई या मूलभूत सुविधा देण्यावरच पालिकेने भर दिला पाहिजे. त्यासाठी आम्ही आग्रहाने पाठपुरावा करू.
रोशनी शिंपी: मूलभूत सुविधांमध्ये तुम्ही या पालिकेला किता मार्क द्याल?
मी शेवटचा क्रमांक देईल. १ ते १० असे क्रमांक द्यायचे असेल तर दहाच. गेल्या २५ वर्षांत त्यांनी काहीच केलेले नाही.
विद्या गावंडे: गेल्या काही दिवसांत सामाजिक दरी वाढवण्याचे काम झाले. त्यासाठी काही उपाययोजना?
निवडणुकीनंतर आम्ही तसाउपक्रम हाती घेणार आहोत. सर्व धर्मांना जोडण्यासाठी तो उपक्रम असेल.
शब्दांकन : दत्ता सांगळे, छाया : अरुण तळेकर