आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीच्या वारीत भजन गात गायक म्हणून घडलो- ज्ञानेश्‍वर मेश्राम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरीच्या वारीत विठ्ठलभक्तांसह भजन गाताना उत्तम रियाज झाला, भजनाच्या तालावर नाचताना गाण्याचा अचूक ठेका कळला आणि गायक म्हणून मी वारीतच घडलो, असे सारेगमप रिअँलिटी शोच्या व्यासपीठावरून पुढे आलेल्या गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी सांगितले. संगीतकार अवधूत गुप्ते यांनी माझ्या गायकीवर विश्वास दाखवल्याने ‘झेंडा’ चित्रपटात ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती..’ हे गीत गाऊ शकलो, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन त्यांनी संपादकीय सहकार्‍यांशी विविध विषयांवर चर्चा केली. ती त्यांच्याच शब्दांत..‘सारेगमप’च्या व्यासपीठामुळे मी घराघरात पोहोचलो. गायनाची तयारी मात्र वारीत झाली होती. गेल्या 16 वर्षांपासून मी वारीत जातो. माझ्या अगोदर तीन पिढय़ा वारीला जात होत्या. वारीच्या ओढापायी 1993 मध्ये दहावीला असताना केवळ हिंदी विषयाचा पेपर देऊन चांदूर बाजारच्या दिंडीतून पंढरीला गेलो. त्यानंतर सतत भजनाचा आनंद घेतला. रामचंद्र बाबा बोध गुरू या गुरूंच्या आग्रहामुळे पंढरपुरातच राहिलो. तेथेच कीर्तनाचे धडे गिरवले. असे करत अमरावतीचा ज्ञानेश्वर पंढरपूरचा कधी झाला ते कळलेच नाही. पंढरपुरात राहत असलो तरी आजही मी दिंडीतून वारीला न चुकता जातो.

मित्रांच्या सांगण्यावरून ‘सारेगमप’मध्ये ऑडिशन दिल्यानंतर निवड झाली. तेथे मी एकटाच गबाळा वाटायचो. सुरुवातीला थोडे अवघडल्यासारखे वाटले, पण नंतर मात्र आत्मविश्वासाने गाऊ लागलो. या सर्व प्रवासातला महत्त्वाचा आणि गायन क्षेत्रातील माझा अविस्मरणीय प्रसंग म्हणजे आम्हा सर्वांना एकदा ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांना भेटण्यासाठी नेण्यात आले. सर्वजण त्यांची ओळख करून देत असताना माझ्या आधीच ‘माउली ये पुढे ये, खूप मेहनत कर मोठा हो’, कशी कौतुकाची थाप खळे यांनी दिली. त्या कौतुकाने मी भारावून गेलो. आज रिअँलिटी शोच्या माध्यमातून का होईना पण चांगले गायक समोर येत आहेत, परंतु केवळ झगमगाटाने गायकी येत नाही तर त्यासाठी संगीताची आराधना देखील तितकीच आवश्यक आहे. तरच श्रोता वर्ग तुम्हाला स्वीकारतो. म्हणूनच सात ते आठ चित्रपटांसाठी गायनाची संधी मला मिळाली. लवकरच माझे गाणे असलेला उष:काल आणि खेळ आयुष्याचा हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, तर येणार्‍या काळात हिंदी चित्रपटातही गाण्याची इच्छा आहे. माझ्या संगीत क्षेत्रातील यश म्हणजे माउलीचाच चमत्कार आहे.