आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ विकासाच्या नावावर सेना-भाजपने जिंकून दाखवावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत विविध राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांना काय वाटते, त्यांनी जिंकण्यासाठी कोणते डावपेच रचले आहेत, प्रचारात त्यांचे विरोधकांना काय आव्हान आहे, हे जाणून घेण्यासाठी "दिव्य मराठी"ने 'गप्पा डावपेचाच्या' हा उपक्रम सुरू केला आहे. त्यात संपादकीय सहकारी रोज एका पक्षाच्या नेत्यांशी गप्पा मारणार आहेत. पहिल्याच दिवशी मनपा निवडणुकीत काँग्रेस प्रचार समितीचे सदस्य आमदार सुभाष झांबड यांनी त्यांची व्यूहरचना स्पष्ट केली.
काँग्रेसची लढत एमआयएमशी नव्हे, तर परंपरागत प्रतिस्पर्धी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीशीच असल्याचे स्पष्ट करतानाच या पक्षाने गेल्या अडीच दशकांत फक्त जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप झांबड यांनी केला. युतीने केवळ आणि केवळ विकासाच्या नावावर जिंकून दाखवावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले. काँग्रेस पालिकेची सत्ता काबीज करेल, असा विश्वास व्यक्त करताना सत्तेवर आल्यास तातडीने समांतर योजना पूर्ण करणे, शहराला मूलभूत सुविधा देण्याबरोबरच देशातील टॉप-१० मध्ये शहर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

दीपक पटवे : महानगरपालिका निवडणुकीत तुमचा खरा शत्रू कोण आहे? एमआयएम की युती?
झांबड : अर्थातचशिवसेना आणि भारतीय जनता पक्ष म्हणजेच युती. एमआयएम या पक्षाला औरंगाबाद शहरात कोणताही बेस नाही. त्यामुळे त्या पक्षाशी स्पर्धा असण्याचे काहीही कारण नाही. तो पक्ष ना आमचा शत्रू आहे, ना आमचा प्रतिस्पर्धी. आमची लढत ही युतीशीच आहे. एमआयएमला विधानसभा निवडणुकीत प्रतिसाद मिळाला हे खरे असले तरी मुस्लिम समाजाचा आता भ्रमनिरास झाला आहे. एमआयएमची लाट असल्याचे जे बोलले जाते तो फुगा आता फुटला आहे. त्यामुळे या पक्षाला येथे कोणतेही स्थान असणार नाही. त्यांचे ओवेसी नावाचे नेते येतात, जोरदार भाषण ठोकतात अन् निघून जातात. त्यांच्या भाषणाने काही जण नक्कीच प्रभावित होतात; पण असा प्रभाव फार काळ टिकत नसतो. राज ठाकरे यांच्याही अशाच सभा व्हायच्या. लाखोंची गर्दी व्हायची; पण आता हा पक्ष निवडणुकीतून बाहेर पडला आहे. लोकांना केवळ भाषणे नकोत, तर प्रत्यक्ष काम हवे आहे. ते आम्ही करणार आहोत, याची कल्पनाही मतदारांना आहे.
श्रीकांत सराफ : सेना-भाजपची युती झाली, तुमची आघाडी का झाली नाही?
धर्मनिरपेक्षतसेच समविचारी पक्षासोबत आघाडी होऊन मतविभाजन टळावे, अशी आमची इच्छा होती; परंतु जागांवर दोन्हीही पक्षांनी दावा केल्याने आमच्यात आघाडी होऊ शकली नाही. आम्ही प्रयत्न केले. जातीयवादी युतीला सत्तेपासून दूर करण्यासाठी एकत्र लढण्याचा आमचा विचार होता; परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागा मागितल्या होत्या. त्यातील १३ जगांवर मतभेद होते. आम्ही त्यातील जागा राष्ट्रवादीला दिल्या; पण जागा अशा होत्या की तेथे आमचेही तगडे उमेदवार होते. त्यामुळे शेवटच्या क्षणी आघाडी होत नाही, असे दिसले. त्यामुळे मी स्वत: राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवले की ते वॉर्ड आम्ही सोडू शकत नाहीत, तेव्हा तुम्ही ११३ वॉर्डांची तयारी करा. जे झाले ते जाहीरपणे झाले. त्यात कसलाही रोष नव्हता. पार्लमेंटरी बोर्डाने नकार दिल्यानंतरही मी एकदा पुन्हा चर्चा केली; पण ते शक्य झाले नाही. जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला होता, पण जेथे ताकद आहे तेथे मैत्रीपूर्ण लढती अन् जेथे कमकुवत आहोत तेथे आघाडी हे काही पटले नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढतोय.
प्रवीण ब्रह्मपूरकर : जातीयवादी म्हणजे युती की एमआयएमही?
दोन्ही ही जातीयवादीच आहेत.
दत्तासांगळे : एमआयएमही जातीयवादी पक्ष आहे?
होतर. तो पक्ष मोठा जातीयवादी आहे. एमआयएम हा रझाकारांचा पक्ष आहे. रझाकारांनी हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करून जातीयतेचे विष पेरले. आता एमआयएम हा पक्ष तेच करत आहे. 'फोडा आणि राज्य करा' ही ब्रिटिश नीती आता एमआयएम राबवतो आहे. एमआयएम हे रझाकारीचे दुसरे रूप आहे.
महेश देशमुख : निवडणुकीनंतर सत्तेसाठी काँग्रेस-एमआयएम अशी युती होऊ शकते, अशी चर्चा आहे..
कदापिनाही. अजिबात नाही. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाहीत. जे सत्तेसाठी हपापलेले असतात ते अशी अभद्र युती करतात. वेळप्रसंगी आम्ही विरोधात बसू, पण कोणत्याही परिस्थितीत एमआयएम या जातीयवादी पक्षाशी युती करणार नाही म्हणजे नाहीच.
सतीश वैराळकर : युतीला पराभूत करण्यासाठी काय नियोजन केले आहे?
आम्हीप्रत्येक वॉर्डाची जबाबदारी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या हाती दिली आहे. युतीकडून विकासाचा नामोल्लेख होणारच नाही. ते भावनिक मुद्दे पुढे करतील याची आम्हाला कल्पना आहे. त्या दिशेने आम्ही तयारी चालवली आहे. युती आतापर्यंत केवळ धार्मिक तसेच भावनिक मुद्द्यावरच सत्तेवर आली आहे. माझे त्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर जिंकून दाखवावे. ते कधीही विकासाच्या मुद्द्यावर निवडून येणार नाहीत. गेल्या दोन निवडणुकांत भाजपने फक्त स्वप्न विकले. प्रत्यक्षात काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आम्ही नियोजनबद्ध लढतोय. विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. हिंदुत्वाच्या बाता करणारे हे दोन्ही पक्ष औरंगाबादकरांना पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत याची बददुवा त्यांना नक्कीच लागेल.
शेखर मगर : काँग्रेसचे उमेदवार ठरवताना पैसे घेतल्याचा आरोप झाला...
अशातक्रारी माध्यमांतून आम्हाला समजल्या; पण तुम्हीच मला सांगा, पैसे घेऊन उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसची कोणती परिस्थिती होती? ज्या वॉर्डात पैसे घेऊन उमेदवार दिल्याचे सांगतात तेथे काँग्रेसची अवस्था नाजूक आहे. नाजूक ठिकाणी उमेदवारीसाठी कोण पैसे देईल? त्या वॉर्डाचा सर्व्हे मी बघितला. तेथे उमेदवार मिळाला हेच मोठे आहे. राजकारणात असे आरोप होत असतात अन् निवडणूक आली म्हणजे आपणही अशा तक्रारींना सामोरे जाण्यासाठी तयार असावे लागते.
विद्या गावंडे : मग काँग्रेसचे उमेदवार कोणी कसे ठरवले?
इतिहासातप्रथमच काँग्रेसचे उमेदवार अत्यंत पारदर्शकपणे ठरवण्यात आले आहेत. आम्ही प्रत्येक वॉर्डाचा सर्व्हे केला. किमान चार वेळा हा सर्व्हे झाला. बी फॉर्म देण्याच्या काही तास आधी जे उमेदवार निश्चित होताहेत ते निवडून येतील की नाही असाही सर्व्हे आम्ही केला. त्यामुळेच आम्ही ११३ वॉर्डांतील उमेदवारांची यादी जाहीर करू शकलो. ही यादी अत्यंत पारदर्शक होती. माझ्या कार्यकर्त्याला उमेदवारी असावी म्हणून कोणात वाद झाला नाही. काही ठिकाणी आम्हाला ऐनवेळी दुसऱ्या पक्षातील आयत्या उमेदवाराला बी फॉर्म द्यावा लागला, पण तो देण्याआधी आम्ही तटस्थपणे पुन्हा सर्व्हे केला. काँग्रेसची प्रतिमा तसेच त्या वॉर्डातील त्या उमेदवाराची प्रतिमाही विचारात घेतली. युतीला फायदा नको म्हणून पाच ठिकाणी आम्ही अपक्षांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला.
रोशनी शिंपी : महिला आघाडीने अन्याय झाल्याची तक्रार केली त्याबद्दल..
हो,शहराध्यक्षा डॉ. विमल मापारी यांचीच तक्रार होती, पण त्यांनी उमेदवारीच मागितली नव्हती. शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी मागितली तेव्हा त्यांच्याकडे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. त्यांनी दोन उमेदवार दिले होते. त्यातील एका वॉर्डात ऐनवेळी उमेदवार बदला, असे त्यांनी सुचवले. आम्ही त्यांनाच ठरवण्याचे सांगितले, तर त्यांनी ते आमच्यावर सोपवले. शेवटी एकाला उमेदवारी द्यावी लागली. त्यामुळे त्या नाराज झाल्या असतील; पण हा निर्णय कोणी एकाने घेतला नाही. त्यांनाही आम्ही विश्वासात घेतले होते.