आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज वाटत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मोठी संमेलने तर हवीतच, पण छोटी छोटी संमेलनेही झालीच पाहिजेत. महाराष्ट्रात होत असलेल्या छोट्या संमेलनांची संख्या पाहता मराठीच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज नाही हे स्पष्टच आहे, असे उद्गार 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांनी काढले.

संमेलनाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच औरंगाबादेत आलेल्या प्रा. शिंदे यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी संपादकीय सहकार्‍यांशी दिलखुलास गप्पा मारल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत, त्यांनी लढवलेल्या निवडणुकीपासून साहित्यातील राजकारणापर्यंत विविध विषयांवर त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. मराठी भाषेच्या भवितव्याबाबत आपण नि:शंक असल्याचे सांगत फमुं म्हणाले की, ज्यांची मुले इंग्रजी शाळेत जातात ते लोक मराठीच्या भवितव्याची चिंता करतात. मराठीची चिंता करण्याची गरज नाही, असे माझे मत आहे.

माणसावर कायम छापील अक्षरांचा संस्कार होत असतो. माध्यमे आता कोणतीही असोत. आज लिहिले जाते, तेवढेच वाचलेही जाते. वर्तमानपत्रांची संख्या वाढते आहे, पुस्तकांची संख्या वाढते आहे, वाचकांची संख्या वाढते आहे. आयुष्य हे शेवटी वाचण्याचेच असते. माणूस पुस्तकं वाचतो, चेहरे वाचतो, तसे संस्कार होतात.

साहित्य संमेलने आणि मराठीचे भवितव्य या विषयावर ते म्हणाले की, मी स्वत: 40 संमेलनांचा अध्यक्ष राहिलो आहे. आता या मोठय़ा संमेलनाचा अध्यक्ष झालो आहे. मोठी संमेलने हवीतच, पण छोट्या संमेलनांमध्ये एक संवाद असतो, उत्कटता असते, तिथे जास्त चर्चा होते. अशी छोटी संमेलने झाली पाहिजेत आणि होतही आहेत. या छोट्या संमेलनांची संख्या पाहता मराठीची चिंता करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.

मराठी साहित्य दर्जेदारच

मराठी साहित्य जगातील कुठल्याही भाषेतील साहित्याच्या तुलनेत उत्तम आणि दर्जेदारच आहे, असे सांगत फमुं म्हणाले की, आता इतर भाषांतील साहित्य मराठीत अनुवादित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मराठीचे साहित्यही इतर भाषांत अनुवादित होऊन गेले पाहिजे. जे साहित्य इतर भाषांत गेले त्याचे खूप कौतुकही झाले आहे. त्यामुळे मराठी साहित्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्हच नाही.(संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्याशी झालेला संपूर्ण मुक्तसंवाद वाचा बुधवार, दि. 6 नोव्हेंबरच्या अंकात)