आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: ‘एसआरए, समृद्धी, भायखळा जेल प्रकरणांचे धागेदाेरे मुख्यमंत्र्यांपर्यंत’: धनंजय मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रश्न : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या पावसाळी अधिवेशनात कोणते प्रश्न महत्त्वाचे असतील? 
मुंडे :
 प्रश्न तर भरपूर आहेत. सरकार किती ऐकून घेते की नेहमीप्रमाणे रेटून नेणार हा खरा प्रश्न आहे. खरीप संपत आला, कर्जमाफी एकाही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही. पुनर्गठन केलेले शेतकरी त्यातून वगळले आहेत. त्यांचा त्यात समावेश व्हावा अशी मागणी आम्ही करणार आहोत. खरीप गेलं, रब्बीपर्यंत तरी कर्जमाफीचा लाभ मिळणार का? याचा जाब सरकारला विचारणार. दहा हजारांच्या मदतीचा कुणालाच लाभ झालेला नाही. याबाबत सरकारचा गलथान कारभार उघड करणार अाहाेत.  

प्रश्न : मुंबईतील ‘एसआरए’ घोटाळ्याबद्दलची काय मागणी असेल?  
मुंडे :
 एसआरएचे तर अनेक मुद्दे आहेत. आमच्या पार्टी मीटिंगमध्ये ते ठरतीलच. पण अधिकारी विश्वास पाटलांच्या फक्त एसआरएबद्दलच्याच नाही तर सर्वच निर्णयांची चौकशी करावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. फक्त एसआरआरबाबत निवृत्तीच्या शेवटच्या दिवसात विश्वास पाटलांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी पुरेशी नाही. आतापर्यंतच्या त्यांच्या कारकीर्दीतील सर्वच निर्णयांबाबत आता शंका उपस्थित झालेल्या आहेत. आणि फक्त विश्वास पाटील, प्रकाश मेहताच नाही तर नगरविकास खात्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांकडेच याची पूर्ण जबाबदारी जाते. त्यामुळे या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनाच त्याचे उत्तर द्यावे लागेल. 
 
प्रश्न : ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांचा अधिवेशनावर मोर्चा आहे...  
मुंडे :
बरोबरच आहे, सरकारला नेमकी कोणाची समृद्धी करायची आहे हा आमचा प्रश्न आहे. या महामार्गाची खरंच गरज आहे का? शेतकऱ्यांची संमती नसताना सरकार त्यांच्या जमिनी का घेत आहे याबाबतचे प्रश्न आम्ही उपस्थित करणार आहोत. ‘समृद्धी’साठी जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ नये अशी आमची भूमिका आहे. ‘समृद्धी’बाबत सरकारच्या आकड्यांची जगलरी आम्ही अधिवेशनात उघडी पाडणार आहोत.   

प्रश्न : भायखळा जेलप्रकरणी आपली काय मागणी असेल?  
मुंडे :
हे प्रकरण दाबणाऱ्या पोलिस आणि कारागृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे. व्हॉट्सअॅपच्या मेसेजेसमधून त्यांचे हितसंबंध आणि हेतू उघड झाले आहेत. त्यांच्याकडून चौकशी काढून घेणे पुरेसे नाही. सरकारला या अधिकाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल. खरे तर मंजूषा शेट्ये प्रकरणामुळे भायखळा कारागृहातील अनागोंदी उघड झाली. परंतु राज्याच्या सर्वच कारागृहांमध्ये भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. याबाबत अनेक चौकशा होऊनही त्यात सहभागी असलेल्या किंवा त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत. फक्त भायखळा जेलच नाही, तर सर्वच कारागृहांमध्ये आतापर्यंत झालेले मृत्यू, महिला कर्मचाऱ्यांचे होणारे लैंगिक शोषण हे सर्व प्रश्न आम्ही या अधिवेशनात उपस्थित करणार आहोत.  

अारक्षणाबाबत जाब विचारणार...
 
प्रश्न : नऊ ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. त्याचे अधिवेशनावर पडसाद उमटतील  का?  
मुंडे :
अर्थातच. सरकारने मराठा आरक्षणाचे फक्त आश्वासन दिले. कबूल केलेल्या बाबींची पूर्तता केली नाही. फक्त मराठाच नाही तर धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण याबाबतची आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत. त्याशिवाय सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत झालेला गैरव्यवहार, आदिवासी विकास खात्यातील रेनकोट खरेदीत झालेला भ्रष्टाचार, वैद्यकीय शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार, महिला व बालविकास खात्यातील टीएचआर खरेदी घोटाळा, सरकारी साहित्याच्या विक्रीतील गैरव्यवहार हे प्रश्न आम्ही जनतेच्या वतीने या अधिवेशनात उपस्थित करणार आहोत. सरकारला त्याची उत्तरे द्यावी लागतील. गंगाखेड शुगर फॅक्टरीत शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक झाली. त्यात अजून एकालाही अटक झालेली नाही. हे सर्व मुद्दे आम्ही उपस्थित करणार आहोत.
बातम्या आणखी आहेत...