आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीसी कॉइनच्या अवैध चलनात शहरातून रु.10 कोटी गुंतवणूक; एमएलएमच्या नावाखाली परताव्याच्या हमीचे आमिष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काळ्या पैशाची गुंतवणूक करण्यासाठी काही देशांत मोठ्या प्रमाणावर चलनात असलेल्या आणि काही देशांनी बंदी घातलेल्या बीट कॉइनच्या धर्तीवर भारतातही मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावाखाली एटीसी कॉइ.न ही अधिकृत चलनाला पर्यायी क्रिप्टोकरन्सी चालवली जात असून कुठलीही वैधता नसलेल्या या चलनाचे लोण औरंगाबादेतही पोहोचले. औरंगाबादेतून त्यात १० कोटींहून जास्त गुंतवणूक झाल्याची माहिती हाती आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून शहरात जवळपास १०० एजंटांमार्फत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले जात आहे.   

मुंबईच्या सुभाषचंद जेवरिया यांच्या सुपीक डोक्यातून एटीसी कॉइनची संकल्पना निघाली. यंदाच्या मे महिन्यात  १ पाऊंड  प्रदत्त भांडवलासह लंडनच्या कॉव्हेंट गार्डन येथे एटीसी कॉइन लिमिटेड या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी केली.  मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या माध्यमातून खाणकामाची सेवा दिली जात असल्याची माहिती वेबसाइटवर आहे. १२ ते १८ महिन्यांच्या लॉक-इन कालावधीसाठी एटीसी कॉइन १२ टक्के परताव्याची हमी देते. मात्र, प्रत्यक्षात  महिन्याला २४ टक्क्यांपेक्षाही जास्त परताव्याचे आश्वासन एजंटामार्फत दिले जाते.  घोटाळा झालेल्या केबीसीतही अशाच प्रकारे मार्केटिंग झाले होते.
 
 
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी ही डिजिटल संपत्ती आहे. क्रिप्टोग्राफी म्हणजे कूटभाषेद्वारे ती चलन व्यवहारासाठी वापरली जाते. त्याला अल्टरनेटिव्ह करन्सी ही म्हटले जाते. काळ्या पैशांच्या व्यवहारासाठीच मुख्यत: ती वापरली जाते. २००९ मध्ये जपानच्या सातोशी नाकामोटो यांनी बीटकॉइन हे जगातील पहिले क्रिप्टो चलन आणले. एटीसी कॉइन हे बीटकॉइनचाच भारतीय अवतार असल्याचे सांगितले जाते.   
 
 
शेवटच्या फळीच्या पदरी निराशाच
भारतात क्रिप्टो करन्सी मान्य नाही. म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणुकीचे क्षेत्र सरकारच्या कुठल्या ना कुठल्या खात्याशी संलग्न आहेत. तसे क्रिप्टो करन्सीचे नाही. अशा एमएलएम स्कीममध्ये पहिल्या फळीत गुंतवणूक करणाऱ्यांना काही प्रमाणात परतावा मिळतो. ते पाहून अनेक लोक गुंतवणूक करतात. मात्र शेवटच्या फळीतील लोकांच्या पदरी निराशाच पडते.  
- विश्वनाथ बोदाडे, अर्थतज्ज्ञ  
 
असा चालतो एटीसी कॉइनचा बाजार :  खरेदी-विक्री ऑनलाइन होते.  कॉइन खरेदीसाठी एका व्यक्तीला ५ हजार गुंतवावे लागतात. त्याला तीन महिन्यांचा लॉक- इन कालावधी आहे. तो संपल्यानंतरच हे कॉइन खरेदी केलेल्या व्यक्तीला कॉइन खरेदी-विक्रीचा व्यवहार करता येतो.   
 
 
औरंगाबादेतील एजंटाशी ‘दिव्य मराठी’चा थेट संवाद 
एटीसी कॉइन खरेदी करायचे आहेत, असे सांगून ‘दिव्य मराठी’ने एटीसी कॉइनच्या एका एजंटाशी मोबाइलवर संपर्क साधला. त्याच्याशी झालेला हा संवाद...
 
प्रतिनिधी : एटीसी कॉइन का?   
एजंट : हो बोला...     
प्रतिनिधी : मला एटीसी कॉइनची माहिती हवीय. गुंतवणूक करायची होती.     
एजंट  : तुम्हाला अकाउंट उघडावे लागेल. तुमचा मोबाइल नंबर, आयडी, पॅनकार्ड लागते. 
   
प्रतिनिधी : किती रुपयांचे एक कॉइन मिळेल?     
एजंट : वेबसाइटवरील रेटनेच आयडी उघडण्यासाठी  खरेदी करावे लागते. नंतर मी तुम्हाला स्वस्तात देईन.     

प्रतिनिधी : सध्या ३८ चा रेट आहे?    
एजंट : हो. तुम्ही पाच हजारांचे कॉइन या रेटने घ्या. मग पाहू.   

प्रतिनिधी : मी ते कधी विकू शकतो?   
एजंट : तुम्ही जे पाच हजारांचे कॉइन घेतले ते एक-दोन महिन्यांत विकू शकतात. काही वेळ थांबले तर १६० रुपयांपर्यंत भाव मिळेल.     

प्रतिनिधी : ही कंपनी कुठली आहे?    
एजंट : तुमचा व्हॉट्सअॅप नंबर द्या. सगळी माहिती पाठवतो. आवडलं तर गुंतवा. मी भेटूनही माहिती देईन. 
   
प्रतिनिधी : मी ऐकलं होतं, कंपनीच्या लोकांवर मुंबईत गुन्हे दाखल झाले. मी बीटकॉइनमध्ये गुंतवणूक केली आहे.      
एजंट : बीटकॉइनचा रेट हाय आहे. सगळेच ते घेऊ शकत नाहीत. एटीएसी नवी कंपनी आहे. मुंबईचे सुभाष जेवरिया यांनी ती सुरू केली. देशातील पहिली ही डिजिटल करन्सी आहे. मी स्वत: ३०० मेंबर केले आहे.  शहरात हजारो लोकांची गुंतवणूक आहे.
     
प्रतिनिधी : औरंगाबादेत काही फसवणुकीचा प्रकार नाही ना?     
एजंट : मी औरंगाबादेतच आहे. तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला भेटतो.  मला स्वत:ला रॉयल्टीपोटी लाख रुपये महिना येते. माझा नंबर कोणी दिला? 
  
प्रतिनिधी : काही ठिकाणी फसवणुकीच्या बातम्या होत्या. तुमचा नंबर मला मित्राकडून मिळाला.     
एजंट : माझं नाव ------ आहे. (नाव मुद्दाम टाळले आहे)  ते इन्कम टॅक्स स्कॅम होते. एकाच वेळी अॅडव्हान्स इन्कम टॅक्स भरला. त्यामुळे जरा घोटाळा झाला होता. आता सगळे क्लिअर झाले आहे. ज्या बातम्या आल्या त्या चुकीच्या होत्या. तुम्ही मला भेटा. सगळं सांगतो, चिंता करू नका.
 
बातम्या आणखी आहेत...