आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Invest In Maharashtra Inaugurated By Haribhau Bagde

शेंद्र्यामधील भूखंडांपासून शेतकरी अजूनही वंचित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसी झाल्यास विकास होईल म्हणून त्या वेळी शेतकऱ्यांनी मोबदला मिळण्याअगोदर जमिनीची ताबापत्रे दिली. मात्र, त्यांना विकसित केलेले भूखंड अजूनही मिळालेे नाहीत, ही खंत कायम असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. "इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्व्हेस्ट इन्टू मराठवाडा' (आयआयएम-२) या परिषदेचे उद््घाटन बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
गुरुवारी एमजीएममधील रुक्मिणी हॉलमध्ये आयआयएम-२ समिटला सुरुवात झाली. महाराष्ट्र शासन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी व्यासपीठावर सीआयआयचे अध्यक्ष अरूप बसू, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सीआयआयचे मराठवाडा अध्यक्ष एन. श्रीराम, कौशल्य सिन्हा यांची उपस्थिती होती. मराठवाड्याचे ब्रँडिंग करणे आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी परिषदेचे आयोजन केल्याचे नारायणन यांनी सांगितले.

युवकांनो,नोकरी देणारे व्हा! : बसूम्हणाले की, राज्यात सर्वाधिक गुंतवणूक होत आहे. सध्या उद्योगासाठी मोठ्या संधी आहेत. त्यामुळे इथे बसलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरी करण्यापेक्षा उद्योग सुरू करून नोकरी देणारे उद्योजक व्हावे.

आणखी टेक्सटाइल्स पार्क
यावेळी बोलताना अपूर्व चंद्रा म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत इलेक्ट्राॅनिक्स धोरण, अनुसूचित जाती-जमातींमधल्या लोकांना प्रोत्साहन देणारी योजना आणि सिंगल विंडो धोरण घोषित करण्यात येणार आहे. देशात सध्या पेट्रोलियमची सर्वाधिक आयात केली जाते. त्याखालोखाल इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंची आयात होते. मात्र, क्रूड तेलाचे भाव घसरल्यामुळे सर्वाधिक आयात इलेक्ट्राॅनिक्सची होणार असून लवकरच इलेक्ट्राॅनिक्स धोरण घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे औरंगाबादला या क्षेत्रात भरपूर संधी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टेक्सटाइल्स पार्क मराठवाड्यात घोषित करण्यात आले असून जागा मिळाल्यास आणखी टेक्सटाइल्स पार्क सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक गौतम नंदावत यांनी केले.

शेतीवर आधारित उद्योग यायला हवेत
बागडेम्हणाले की, शेतीक्षेत्र कमी झाल्यामुळे शेतीतला रोजगार कमी झाला. यामुळे मराठवाड्याचा विकास उद्योगाच्या माध्यमातूनच शक्य आहे. त्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. उद्योग वाढला तर रोजगार निर्माण होतील, त्याचा फायदा कामगारांनाही होईल हे सांगताना त्यांनी बजाज कंपनी आल्यानंतर झालेला संप आणि चिकलठाण्यामध्ये त्या काळात पहिल्यांदाच ग्लोव्हज बनवणारी कंपनी संपामुळे कशी बंद पडली, हा अनुभव सांगितला. मराठवाड्यात सौर ऊर्जानिर्मितीसाठी त्यांचे पॅनल बनवणारा उद्योग सुरू होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसीत शेतकऱ्यांनी जमीन दिली. त्यांना अजूनही विकसित भूखंड मिळाले नाहीत. त्यामुळे डीएमआयसीचा निधी आल्यानंतर तो तातडीने खर्च करा. केवळ व्याज वाढण्याची वाट पाहू नका, असा टोमणा त्यांनी अधिकाऱ्यांना लगावला.