आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Invest In Maharashtra, Invest Into Marathwada Conference Concluded

आगामी वर्षांत दोन लाख रोजगारनिर्मिती : एन. श्रीराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उद्योगांना चांगले दिवस येणार असून पाच वर्षांत औरंगाबाद आणि जालना येथील अस्तित्वात असलेल्या कंपन्यांकडून १० हजार ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे ५० हजार प्रत्यक्ष तर दीड लाख अप्रत्यक्ष, अशा दोन लाख रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे भारतीय उद्योग महासंघाचे (सीआयआय) मराठवाडा अध्यक्ष एन. श्रीराम यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) वतीने आयोजित इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्व्हेस्ट इंटू मराठवाडा (आयआयएम-२) या गुंतवणूक परिषदेचा समारोप रुक्मिणी सभागृहात शुक्रवारी झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील खन्ना आणि मराठवाडा उपाध्यक्ष संदीप नागोरी यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्रीराम म्हणाले की, सीआयआयच्या वतीने औरंगाबाद आणि जालना येथील अस्तित्वात असलेल्या कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात या कंपन्यांकडून सुरुवातीच्या काळात २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. त्यातून दोन्ही ठिकाणी अडीच लाख रोजगारांची निर्मिती झाली होती. पुढील पाच वर्षांत ही गुंतवणूक दहा हजार ७०० कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याने तेवढ्याच मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असल्याचे श्रीराम यांनी सांगितले. त्यानंतर खन्ना यांनी आपल्या भाषणात, कंपन्यांच्या भरभराटीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे उद्योगांना चालना मिळाली असल्याचे सांगितले. त्यानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, विश्वसनीयता जपणाऱ्या, कामाच्या नियोजनात सुसूत्रता आणणाऱ्या आणि सातत्य राखणाऱ्या शहरातील कंपन्यांच्या संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तीन प्रकारांत हा पुरस्कार देण्यात आला. यात पाच वर्षे सातत्य प्रगती, प्रगती आणि एकही चूक करणाऱ्या कंपन्यांची निवड करण्यात आली. विवेकानंद कोरंगळीकर आणि पराग पांडे, शिरीष लोहिया, एस. आर. कुलकर्णी यांच्या निवड समितीने ही निवड केली.

या कंपन्यांचा करण्यात आला सत्कार
पाचवर्षांत सेवासातत्य राखणाऱ्या आणि प्रगती करणाऱ्या गटात पहिला पुरस्कार किर्दक ऑटो यांना, तर दुसरा त्रिमूर्ती एंटरप्रायजेस यांना मिळाला. प्रगती करणाऱ्या गटात पहिला पुरस्कार अक्षय उद्योग यांना, तर दुसरा पुरस्कार इंपल इंडस्ट्रीज यांना मिळाला. कामात सुसूत्रता आणल्याबद्दलचा पहिला क्रमांक पुरस्कार टर्मिमेक यांना, तर दुसरा उत्कर्ष ऑटो यांना मिळाला. प्रगती करण्याच्या गटात पहिला पुरस्कार एनआरबी, तर दुसरा व्हेरॉक कंपनीला मिळाला. एकही चूक होऊ देता काम करण्याचा पहिला बहुमान एनआरबीला, तर दुसरा ग्रीव्हज कॉटनला देण्यात आला. या वेळी विशेष योगदान दिल्याबद्दल हेडगेवार हॉस्पिटलचाही गौरव करण्यात आला.