आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संशोधकांनाही लागले औरंगाबाद विमानतळाचे वेड, विमानतळावर दोघांचे संशोधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - संशोधकांनाही आता औरंगाबाद विमानतळाचे आकर्षण वाटत असून गेल्या तीन महिन्यांत दोन पोस्ट ग्रॅज्युएट संशोधकांनी विमानतळावर संशोधन सुरू केले आहे. दोन वर्षांपूर्वीही विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने विमानतळ हा विषय घेऊनच आपले संशोधन पूर्ण केले होते. बाहेरच्या व्यक्तीकडून होत असलेल्या या संशोधनाला विमानतळ प्राधिकरण सकारात्मकरीत्या घेत असून संशोधनातील निष्कर्षांचा वापर इथला दर्जा सुधारण्यासाठी केला जाणार आहे.
विमानतळाचे दरवाजे सर्वसामान्यांना नेहमीच बंद असतात. मात्र, गेल्या वर्षी विमानपत्तन निदेशक म्हणून रुजू झालेले आलोक वार्ष्णेय यांनी विमानतळ अधिकाधिक लोकाभिमुख बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी विद्यार्थी वर्गाला येथे संशोधनासाठी निमंत्रित करण्यास सुरुवात केली. याची सुरुवात झाली ती विद्यार्थ्यांच्या विमानतळाला भेटीपासून. शाळा मुलांना विमानतळाची माहिती देण्यासाठी येथे घेऊन येतात. मधल्या काळात बंद झालेली ही प्रथा वार्ष्णेय यांनी जाणीवपूर्वक सुरू केली आणि मुलांना तिकिटात ५० टक्के सूट देऊन बोलावण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून मे महिन्यांपर्यंत १०० शाळा आणि १३ अभियांत्रिकी महाविद्यालयांनी येथे भेट दिली.
सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या अभ्यासक्रमात विमानतळाचा समावेश आहे. यामुळे या मुलांना विमानतळावरील प्रत्यक्ष भेट पर्वणी ठरते. अशाच एका भेटीदरम्यान संशोधनाचा विषय निघाला आणि वार्ष्णेय यांनी त्यास परवानगी दिली. यानुसार एमजीएम मॅनेजमेंट महाविद्यालयातील अनिकेत पुजारी या विद्यार्थ्याने अभ्यासक्रमातील वार्षिक प्रोजेक्ट विमानतळावर केला. “स्टडी ऑफ डिटरमायनिंग ऑप्टिमम मार्केटिंग स्ट्रॅटेजी फॉर रिटेलर्स इन औरंगाबाद एअरपोर्ट’ या विषयावर त्याने लघु प्रबंध तयार केला आहे. तीन महिन्यांत पुजारी याने विमानतळाचा भौगोलिक, पर्यावरणीय, व्यावसायिक, तांत्रिक अंगांनी अभ्यास केला. प्रवाशांचे प्रोफाइल जाणून घेतले. यावरून विमानतळावर उद्योग करण्यासाठी एखाद्या ब्रँडला काय अपेक्षित आहे, हे समोर येणार आहे.

अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या अमितेश चौधरीने दीड महिन्याच्या इंटर्नशिपमध्ये एव्हिएशन मॅनेजमेंटवर काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संसद सचिव करुणा जाधव यांनी औरंगाबादहून विविध शहरांच्या कनेक्टिव्हिटीवर लघु प्रबंध सादर केला होता. विद्यार्थ्यांना ज्या विषयाचा अभ्यास करायचा त्या विभागातील अधिकारी, तंत्रज्ञांनी सहकार्य करण्याची सूचना वार्ष्णेय देतात. यामुळे संशोधनात अडसर येत नाही. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांनी विमानतळावर संशोधन करण्याचे आवाहन वार्ष्णेय यांनी केले आहे.

फायदा घेणार
^विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत संस्थांकडून विमानतळाविषयी सातत्याने सर्वेक्षणे, संशोधने होत असतात. गेल्या आठवड्यात आमची नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काैन्सिलची टीम इथली पाहणी करून गेली. मात्र, अशा पद्धतीच्या थर्ड पार्टी सर्वेक्षण करणाऱ्यांचे आम्ही स्वागत करतो. त्यांना खास सुविधा उपलब्ध करून देतो. या संशोधनातील निष्कर्षांचा वापर आम्ही विमानतळाचा दर्जा सुधारण्यासाठी करू. -आलोकवार्ष्णेय, विमानपत्तन निदेशक, अौरंगाबाद.
बातम्या आणखी आहेत...