आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी टोळीच्या चोराकडून तीन मंगळसूत्रे, दुचाकी, मोबाइल जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मंगळसूत्र हिसकावणार्‍या इराणी टोळीतील एका भामट्याला वाहतूक शाखेचे हवालदार गजानन मांटे यांनी पकडले. महंमद ऊर्फ जंगल फेरोज खान (रा. परळी वैजनाथ, शिवाजीनगर, इराणी गल्ली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीची तीन मंगळसूत्रे, दुचाकी, मोबाइल असा दोन लाख दहा हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी आठ वाजता बाबा पेट्रोल पंप चौकात घडली.

जिल्हा सत्र न्यायालयाकडून महावीर चौकाकडे काळ्या रंगाची; परंतु पुढच्या प्लेटवर नंबर नसलेल्या दुचाकीवरून दोन इराणी तरुण जात असल्याचे मांटे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी दुचाकी थांबवली आणि चौकशी केली. या दोघांनी त्यांना उडावाउडवीची उत्तरे दिली. मांटे यांनी त्यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. दरम्यान, पाठीमागे बसलेल्या त्याच्या साथीदाराने खिशातून दुसरी चावी काढून गाडी सुरू केली. पसार होण्याच्या प्रयत्नात त्याने हवालदाराच्या पायावरून दुचाकी घातली. मांटे यांचे सहकारी गणेश डोईफोडे त्यांच्या मदतीला धावून आले. दोघांनी मिळून दुचाकी चालवणार्‍यास पकडले. मात्र, मागे बसलेल्या त्याच्या मित्राने पळ काढला. भामट्यांच्या या कृत्याने पोलिसांचा संशय बळावला व त्यांची झडती घेतल्यानंतर चार मंगळसूत्रे आढळली. मांटे यांनी ही माहिती तातडीने नियंत्रण कक्षाला दिली आणि क्रांती चौक पोलिसांची मोबाइल टू व्हॅन बोलावून भामट्याला त्यांच्या स्वाधीन केले.

दोन लाखांचा ऐवज हस्तगत
परळी येथील या भामट्याकडे ठाण्याची पासिंग असलेली दुचाकी कशी काय, याचा तपास पोलिस घेत आहेत. दुचाकीदेखील चोरीची असावी, असा संशय आहे. शिवाय जप्त केलेला सॅमसंग गॅलेक्सी मोबाइलचीही चौकशी सुरू आहे. जप्त केलेल्या मंगळसूत्रांपैकी एक बनावट असल्याचे स्पष्ट झाले. शहरातील पाच महिलांची मंगळसूत्रे हिसकावल्याची कबुली भामट्याने दिली. जप्त मंगळसूत्रे कोणत्या ठिकाणांहून पळवली याचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक उन्मेष थिटे तपास करत आहेत.