आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल खेळताना इराकी विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर इराकमधील विद्यार्थ्याचा रविवारी सायंकाळी फुटबॉल खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. इबादी फरहान अतिया (45, ह. मु. एन-11, एल-42, हडको) असे त्याचे नाव आहे. त्याचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी विमानाने मुंबईला पाठवण्यात आला.

मूळचा बगदाद येथील असलेला इबादी अतिया हा सहा महिन्यांपूर्वी एम. एस्सी., नॅनो टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी भारतात आला होता. रविवारी दुपारी तो मित्रांसह विद्यापीठातील तरण तलावाजवळील मैदानावर फुटबॉल खेळत होता. या वेळी त्याला अचानक श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागला. मैदानात बेशुद्ध अवस्थेत पडल्याने मित्र मौतिझ दिया शिनावा याने त्याला तत्काळ घाटीत दाखल केले. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी त्याचे सहकारी पोलिस आयुक्तालयात आले होते. त्यांनी मृतदेह विदेशात नेण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची पूर्तता केली. पोलिसांनी इराकच्या दूतावासाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

घाटीत उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह अहमद याया यांनी ताब्यात घेतला. सायंकाळी अतियाचा मृतदेह विमानाने मुंबईला नेण्यात आला. तेथून तो इराकमध्ये नेण्यात येणार आहे. अतियाला पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता, अशी माहितीही त्याच्या मित्रांनी दिली.