आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irragation Jayakwadi Dam Only Remaining For The Drinking Water

सिंचनाचे जायकवाडी धरण उरणार केवळ पिण्याच्या पाण्यापुरते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अनेकांचा विरोध पत्करून 1975 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी धरणाची निर्मिती केवळ सिंचनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केली. मात्र, त्यानंतर वरच्या बाजूला बांधलेल्या धरणांमुळे गेल्या 38 वर्षांपैकी 14 वर्षांत 33 टक्केदेखील पाणी धरणात आले नाही. सात वर्षे या धरणातून शेतीला पाणी मिळालेलेच नाही. त्यामुळे हे धरण पिण्याच्या पाण्यापुरतेच र्मयादित ठेवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप जलतज्ज्ञांनी केला आहे, तर धरण निर्मितीचा मूळ उद्देश हरवला असल्याची भीती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

110 गावे, 34 हजार हेक्टर जमीन, 70 हजार लोकांच्या विस्थापनातून धरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न पेटला आहे. न्यायालये, समिती, मुख्यमंत्र्यांचे आदेश पायदळी तुडवून कालव्याच्या माध्यमातून पाणी पळवून नेण्याचा एककलमी कार्यक्रम नगर, नाशिकमध्ये सुरू आहे. अहमदनगर, नाशिकमधील राजकीय पक्ष मराठवाड्याच्या विरोधात आक्रमक होत आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील 1 लाख 84 हजार हेक्टर जमिनीचे सिंचन या धरणावर अवलंबून आहे. मात्र, 2001 पासून शेतीला पाणी मिळूच द्यायचे नाही. फक्त पिण्यापुरते पाणी वरच्या धरणांतून सोडायचे अशी व्यूहरचना केली जात असल्याची टीका जलतज्ज्ञांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली

पिण्याच्या पाण्यासाठी 205 गावे अवलंबून : औरंगाबाद शहरासह जालना, अंबड, गेवराई, शेवगाव, पाथर्डीसह 205 गावे पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडीवर अवलंबून आहेत. पिण्यासाठी 3.7, तर उद्योगासाठी 1.5 टीएमसी, परळी औष्णिक वीज केंद्रासाठी 6.6 टीएमसी पाणी द्यावे लागते. माजलगाव धरणातही जायकवाडीतून पाणी जाते. आता माजलगावलादेखील पाणी दिले जात नाही. पिण्यासाठी, शेती, उद्योग असा पाणी वापराचा क्रम असला तरी तो प्रत्यक्षात फक्त पिण्यापुरताच र्मयादित राहिला असल्याचे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी सांगितले.

शासन, वजनदारांचा कट : नगर, नाशिकमधील वजनदार मंडळी जायकवाडीत पाणी सोडण्याच्या विरोधात असून त्यात शासन यंत्रणा, मंत्रीदेखील छुप्या पद्धतीने सहभागी झाले आहेत. जायकवाडी धरणाला पाण्याचे डबके बनवणे सुरू असल्याचा आरोप जलतज्ज्ञ या. रा. जाधव यांनी केला. तर जलधोरणात सुधारणा, जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायद्यात बदल, पाणी वितरणाची जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचे पाणी प्रश्नाचे अभ्यासक विजय दिवाण म्हणाले.


आकडेवारी अशी..
0 110 गावे, 34 हजार हेक्टर जमीन, 70 हजार लोकांच्या विस्थापनातून निर्माण झाले होते धरण
04000 कोटी रुपयांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
0 गेल्या 14 वर्षांतील सात वर्षे शेतीला पाणी नाही
जायकवाडीसंदर्भात आमदारांच्या बैठका घेतल्या. मुख्यमंत्र्यांनाही भेटलो. आता पाणी सोडले नाही तर उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. धरणाच्या निर्मितीचा उद्देश उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री


धरणाचा मूळ उद्देश मागे पडत आहे. मराठवाड्यातील जनतेने धार्मिक मुद्दय़ांना पाठिंबा दिल्याची ही शिक्षा आहे. आता नियमांचा खेळ करून पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्ते शासन यंत्रणेला हाताशी धरून मराठवाड्यावर अन्याय करत आहेत. डॉ. भालचंद्र कांगो, सरचिटणीस, भाकप