आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याचा ‘पाझर’ सुरूच एक किलो घबाड जप्त, अभियंतेच्या लॉकरमधून 1 किलो 5 तोळे सोने ताब्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लघु पाटबंधारे विभागातील दोन पाझर तलावांच्या कामातील गैरव्यवहारातून अद्यापही सोन्याचा पाझर सुरूच आहे. या घोटाळ्यातील एक आरोपी शाखा अभियंता श्रीनिवास काळेच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमधून 1 किलो 53 ग्रॅम सोने आणि 67 हजारांची रोकड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवारी हस्तगत केली.

दोन पाझर तलावांच्या कामातील भ्रष्टाचारप्रकरणी एसीबीने शुक्रवारी औरंगाबादेतून चार अधिका-यांसह पाच जणांना अटक केली होती. या अधिका-यांच्या निवासस्थानांवर टाकलेल्या धाडीत दहा किलोंपेक्षा अधिक सोन्यासह बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक सव्वासहा किलो सोने उपविभागीय अभियंता भास्कर जाधव यांच्या घरून जप्त केरण्यात आले होते. भ्रष्ट अधिका-यांच्या संपत्तीचा ‘पाझर’ दुस-या दिवशीही सुरूच होता.एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुरेश वानखेडे, रामनाथ चोपडे आणि जालन्याचे पोलिस उपअधीक्षक एच. व्ही. गिरमे यांनी ही कारवाई केली आहे.

दस्तऐवज जप्त करणार
आरोपींच्या हस्ताक्षराचे नमुने, त्यांच्या दौरा नोंदवह्या, क्षेत्र नोंदवह्यांसह संबंधित दस्तावेज पोलिसांकडून जप्त केले जाणार आहेत. यामुळे गुन्ह्याचे स्वरूप लक्षात येऊन त्यानुसार न्यायालयात तपास अहवाल सादर करण्यास मदत होईल. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अ‍ॅड. मुकुंद कोल्हे यांनी न्यायालयात बाजू मांडली.

शिराळा तलावातही अपहार
जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील पाझर तलावाच्या कामात 26 लाख 86 हजार 600 रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी रघुवीर यादवसह 15 जणांवर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात 28 मार्च 2013 गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अ‍ॅड. रामकिसन बनकर यांनी फिर्याद दिली होती. यातील 14 आरोपींना जिल्हा न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळालेला असून एका आरोपीस अद्याप जामीन नाही. दरम्यान, हा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी बनकर यांनी अ‍ॅड. सुदर्शन सोळंके यांच्यामार्फत औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

काळेचा भर सोने गुंतवणुकीवर
काळेकडे शुक्रवारी 17 तोळे सोन्यासह 81 लाख 13 हजारांची बेहिशोबी संपत्ती मिळाली होती. शिवाय, सोन्याच्या दोन विटाही आढळल्या. आता याच काळेच्या औरंगाबादमधील एन-4 सिडको येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पुन्हा एक किलो सोने व 67 हजार जप्त करण्यात आले.