आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधार्‍यांपोटी 52 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे एकूण 4 उपविभाग आहेत. औरंगाबाद, वैजापूर, कन्नड आणि सिल्लोड. त्यातील सिल्लोड उपविभागाअंतर्गत सिल्लोड, फुलंब्री आणि सोयगाव हे 3 तालुके येतात. प्रत्येक उपविभागात 1 उपअभियंता, 5 शाखा अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक अशी पदे आहेत. त्यानुसार प्रत्येक उपविभागाला कामांचे समान वाटप होणे अपेक्षित होते, परंतु मनुष्यबळ कमी असतानाही सिल्लोड उपविभागालाच जास्त कामे देण्यामागचे गौडबंगाल काय? हा प्रश्न उपस्थित होतो. 2007 ते 2010 या काळात जिल्ह्यामध्ये विविध लेखाशीर्षाअंतर्गत जवळपास 500 कोल्हापुरी बंधारे आणि पाझर तलावांची कामे घेण्यात आली. यातील बहुतांश कामे सिल्लोड उपविभागाअंतर्गत घेण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रगतिपथावरील, इतर योजनेतील आणि दुरुस्ती अशी 200 च्या वर कामे एकट्या सिल्लोडला देण्यात आली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झालेल्या जि. प. जलव्यवस्थापन समितीच्या सभेत 121 कोल्हापुरी बंधार्‍यांच्या दुरुस्तीचा ठराव मंजूर केला आहे. यामध्येही सिल्लोड उपविभागाला झुकते माप देण्यात आले. 121 पैकी 41 कामे एकट्या सिल्लोड उपविभागाला वाटण्यात आली.

सिल्लोड उपविभागावर मेहरबान
नियोजन विभागाच्या निधीतून घेण्यात आलेल्या एकूण 166 कामांपैकी 79 कामे एकट्या सिल्लोड उपविभागाला देण्यात आली. त्या कामांवर आतापर्यंत 48 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 2011-12 मध्ये सिल्लोड व फुलंब्री तालुक्यातील प्रगतिपथावरील तब्बल 31 कामांना 2 कोटी 76 लाख रुपये वितरित करण्यात आले. लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर) विभागालाही 2011-12 मध्ये फुलंब्री तालुक्यातीलच 13 कामांना 57 लाख रुपये निधी देण्यात आला. 2010 ते 2013 या 3 वर्षांच्या काळात जि. प. उपकर निधीतून एकूण 82 दुरुस्तीच्या कामांपैकी एकट्या सिल्लोड उपविभागाने 30 कामे घेतली. यासाठी 1 कोटी 17 लाख 17 हजार रुपये खर्च करण्यात आले.

केस स्टडी
1. सुलतानपूर, कोल्हापुरी बंधारा
फुलंब्री तालुक्यातील हा कोल्हापुरी बंधारा आहे. 16 एप्रिल 2008 मध्ये याची मूळ किंमत 25 लाख होती. नंतर काम अपूर्ण राहिल्यामुळे किंमत वाढून 1 कोटी 36 लाख रुपये एवढी झाली आणि त्यावर खर्चही तेवढाच करण्यात आला. आज या बंधार्‍याची स्थिती वाईट आहे. या बंधार्‍याला जागोजागी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी न साठता वाहून जाते.

2. बाभूळगाव, कोल्हापुरी बंधारा
फुलंब्री तालुक्यातील कोल्हापुरी बंधार्‍याच्या कामास 11 नोव्हेंबर 2005 रोजी 23 लाख रुपये एवढी मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर त्याचे काम प्रलंबित ठेवत त्यावर दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले. सद्य:स्थितीत हा बंधारा शोभेची वास्तू बनला आहे. पाणी तर सोडाच, त्याला दरवाजेसुद्धा नाहीत.

मराठवाडा पॅकेज
> एमआयएन-6
> जलसंधारण महामंडळ
> नियोजन विभाग
> राष्ट्रीय कृषी विकास योजना
> जिल्हा परिषद उपकर (सेस फंड)

हे आहेत निधीचे स्रोत
1. दीड कोटी रुपये खचरून बांधण्यात आलेला बाभूळगाव (ता. फुलंब्री) येथील हा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा कोरडाठाक आहे. त्याचे दरवाजे गंजले आहेत. लोक तेथे दररोज घाण करतात.

इतर योजनेतूनही निधी मिळतो
शासनाच्या निधीतून घेण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधारे आणि पाझर तलावांच्या कामांसाठी इतर योजनेतूनही निधी मिळतो. कारण कोणत्याही कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे कामे प्रलंबित राहतात. इतर योजनेचा निधी या वेळी कामी येतो आणि कामे पूर्ण केली जातात.- यशवंत गच्चे, कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे

राजकीय परिस्थिती कारणीभूत
एकाच उपविभागाला जास्त कामे दिली जातात, असे मुळीच होत नाही. सिल्लोड उपविभागातील राजकीय परिस्थिती आणि आमदारांकडून केला जात असलेला पाठपुरावा, यामुळे जास्त निधी मिळतो. राजकीय आणि भौगोलिक परिस्थितीमुळे कामांचे प्रमाण कमी-अधिक होत असते, परंतु एकाच भागाला जाणूनबुजून जास्त कामे दिली जातात, असा त्याचा अर्थ होत नाही.-दीपक सोंदनकर, कार्यकारी अभियंता, जि. प. सिंचन