आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लघु पाटबंधारेच्या दोन अभियंत्यांना अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तलावांची कामे न करताच बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहार करून अपसंपदा जमवणाऱ्या दोन अभियंत्यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. दोघांनाही मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

जालन्याच्या लघु पाटबंधारे विभागातील उपविभागीय अभियंता भास्कर काशीनाथ जाधव यांनी १९९५ ते मे २०१४ या काळात जाफराबाद तालुक्यात पाझर तलाव केल्याची बनावट कागदपत्रे बनवली. काम पूर्ण झाल्याचे दाखवून त्यांनी ९ लाख ६५ हजारांचा अपहार केला होता. तपासात हा पाझर तलाव दाखवलेल्या जागी नसल्याचे उघड झाले.

दुसरे अभियंता श्रीनिवास काळे यांनीही १९८३ ते एप्रिल २०१४ या कालावधीत बदनापूर तालुक्यात दाभाडी येथे पाझर तलाव बांधल्याचे कागदोपत्री दाखवून ४ लाख ६१ हजार ४७८ रुपयांचा अपहार केला होता. याही कामाची तपासणी केली असता प्रत्यक्ष जागी तलावच आढळून आला नाही.

कारवाईनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या उघड चौकशीत उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजेच ५७ लाख २५ हजार ३९९ रुपयांची अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाल्याने श्रीनिवास काळे, पत्नी जयश्रीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात श्रीनिवास काळे यांना अटक करण्यात आली आहे.

एसीबीच्या पथकाने सोमवारी दोन्ही अधिकाऱ्यांच्या एन-३ व एन- ४ परिसरातील घराची झडती घेऊन दोघांना अटक केली. दोन्ही अधिकारी मुकुंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे असल्याने त्यांना मुकुंदवाडी पोलिसांच्या हवाली केले आहे.