आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी ‘भाऊ’ मदतीला येईल का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेतकरी ग्राहकांत थेट व्यवहार होऊन दलालीला चाप बसावा यासाठी सरकारने फळे भाजीपाला बाजार समिती कायद्याच्या कचाट्यातून मुक्त केला. यामुळे दलाल आणि व्यापाऱ्यांच्या साखळीला जबर धक्का बसला. याविरोधात अाडत्यांनी बेमुदत बंदही पुकारला होता. त्यामुळे बाजारपेठेतील खरेदीचे व्यवहार ठप्प झाले होते. शेतकरी भाजीपाला अाणि फळे मुक्तपणे विकू शकत असले तरी शेतकरी आणि ग्राहकांत थेट संबंध निर्माण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज आहे. शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडावेत यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी सकाळी मुंबईच्या बाजारात जाऊन शेतमाल विक्रीसाठी पुढाकार घेतला. त्याच धर्तीवर औरंगाबाद बाजारपेठेतही शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

बाजार समितीची निर्मिती शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात आली आहे. मात्र, तेथेच त्यांची लूट होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतमाल आणण्यासाठी नगदी पैसे मोजावे लागतात. बाजारात प्रवेश करत नाहीत तोच बाजार फी, त्यानंतर माल उतरवण्यासाठी हमाली, आडत व्यापारी ठरवेल तो भाव त्यांना घ्यावा लागतो. तोलाईचा खर्चही वेगळा. त्यातही मालाची चाळणी केली जाते. यातून दोन किलो मालाची सहज नासाडी होते. हे सर्व देणे झाल्यानंतरच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडते. हिशेब केल्यास उत्पादन खर्च अधिक अन् उत्पन्न कमी असेच गणित असते. पीक कर्ज तो परतफेड करू शकत नाही. मुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्य या विवंचनेत तो अडकतो . शेवटी नैराश्य येऊन आत्महत्यासारखे पाऊल उचलतो.

थेट विक्रीला प्रतिसाद
बाजारातभुसार धान्याची सध्या आवक नाही. भाजीपाला, फळांना ग्राहकही मिळत आहेत. यात किरकोळ विक्रेत्यांचा सर्वाधिक समावेश आहे. ग्राहक- शेतकरी थेट संबंध प्रस्थापित व्हावेत, शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यास ग्राहकांनी पुढाकार घेतल्यास दोघांची फसवणूक टळेल. याला अधिक चालना मिळावी म्हणून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत मुंबई बाजारात उतरून त्यांनी शेतमाल विक्रीला प्रोत्साहन दिले.
अडवणूक हाणून पाडावी
सरकारने योग्यनिर्णय घेतला. पण मधल्या साखळीने बंद पुकारून शेतकऱ्यांना कोंडीत पकडले होते. अशी अडवणूक त्वरित हाणून पाडावी. यासाठी लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरावे. शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीसाठी शहरातील खरेदीदारांनी पुढे यावे. -देवरावदांडगे, प्रगतिशील शेतकरी, रा. वरूड काझी.
लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच
सरकारने भाजीपाला फळे बाहेर विक्री करण्यास मुभा दिली. अाडतीच्या कचाट्यातून सुटका करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ग्राहक शेतकरी यांचे थेट संबंध प्रस्तापित व्हावेत यासाठीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. - संतोष जाधव, कृषिभूषण पुरस्कार विजेते

आडतीच्या जोखडातून मुक्ती
नैसर्गिक संकटाबरोबरच मानवी लुटीला कायमचा चाप लावण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना अडतीच्या जोखडातून मुक्त केले आहे. शेतमाल थेट विक्री करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले. फळे भाजीपाला बाजार समितीत समितीच्या बाहेर विकण्याची मुभा दिली आहे. शेतमालाच्या प्रथम खरेदी विक्री व्यवहारावरच बाजार फी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मधल्या दलालीला मोठा धक्का बसला. त्यामुळे त्यांनी बंद पुकारून बघितला.
बातम्या आणखी आहेत...